Home > News Update > राजरत्न आंबेडकरांचा नवा पक्ष महाराष्ट्रात यशस्वी होईल का ?

राजरत्न आंबेडकरांचा नवा पक्ष महाराष्ट्रात यशस्वी होईल का ?

राजरत्न आंबेडकरांचा नवा पक्ष महाराष्ट्रात यशस्वी होईल का ?
X

भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष २९ जागा लढवेल असेही त्यांनी घोषित केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात राजरत्न आंबेडकर कितपत यशस्वी ठरतील ? त्यांचे सामाजिक योगदान काय आहे ? याचा लेखा जोखा मांडणारा जयश्री इंगळे यांचा हा लेख नक्की वाचा…

ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राजरत्न आंबेडकरांनी नुकतीच नवीन आरपीआय गट स्थापन केल्याची घोषणा केली आहे . त्यांच्याविषयीचे जनमत तपासून बघायला ते 29 उमेदवार देखील उभे करणार आहेत. राजरत्न आंबेडकर महाराष्ट्रात पॉलिटिकल स्पेस शोधू पाहताहेत हे आता स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्रातील दलित चळवळीची स्थिती

लोकसभा निवडणुकीनंतर वंचितच्या लोकप्रियतेला सुरुंग लागलेला दिसत आहे. आठवले यांचा आरपीआय गट भाजपात स्वाहा झाला आहे. बाकी कवाडे, गवई गटाचे अस्तित्व देखील शून्य झालेले आहे. आनंदराज यांची रिपब्लिकन सेना प्रभावहीन आहे. मायावतींच्या बसपाचे महाराष्ट्रातील अस्तित्व नगण्य आहे.

या पार्श्वभूमीवर येत्या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राजरत्न महाराष्ट्रात आपला जम बसवू इच्छित आहेत. यामध्ये त्यांना भारत मुक्ती मोर्चाचे वामन मेश्राम यांचे देखील समर्थन प्राप्त आहे. याशिवाय इतरही काही राजकीय समीकरने जुळवायचे प्रयत्न ते करतील असे एकंदरीत दिसत आहे.

राजरत्न आंबेडकर यांची कारकीर्द

राजरत्न आंबेडकर यांची आतापर्यंतची कारकीर्द बघता, राजकीय चळवळीत किंवा धम्म चळवळीत त्यांनी अजून पर्यंत कुठलेही उल्लेखनीय सामाजिक आंदोलन किंवा लोकोपयोगी कार्य केलेले नसल्यामुळे मास लीडर म्हणून महाराष्ट्राला त्यांची अजून ओळख नाही.

महाराष्ट्रातील वंचितचा मतदार हा वैचारिक बैठक असलेला प्रगल्भ मतदार आहे. नवबौद्ध असलेला आंबेडकरी समाज इथे वैचारिक दृष्ट्या dominant आहे. येथील आंबेडकरी चळवळ ही वंचित बहुजन समाजाच्या सामाजिक न्याय हक्कांकरिता लढे, आंदोलन, संघर्ष यातून उभी राहिलेली आहे. त्यामुळे राजरत्न आंबेडकर ह्यांचे आज पर्यंत चळवळीत कुठलेही भरीव योगदान नसताना निवडणुकीच्या तोंडावर केवळ आंबेडकर या नावाचा फायदा घेऊन पक्ष स्थापन करून आणि उमेदवार उभे करून राजकीय पोळी भाजण्याचा त्यांचा प्रयत्न फसवा ठरणार आहे .

द बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया आणि राजरत्न आंबेडकर

खुद्द डॉ.बाबासाहेब आंबडकरांनी स्थापन केलेल्या " द बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया " ह्या संस्थेचे " राजरत्न आंबेडकर हे ट्रस्टी आहेत. त्यांचे कालकथित वडील आ. अशोक आंबेडकरांनी मरणोपरांत त्यांना ह्या संस्थेचे ट्रस्टी म्हणून नोमिनेट केले होते. मात्र एवढ्या महत्त्वाच्या संस्थेचा कारभार हातात असूनदेखील ते या संस्थेमार्फत काहीच करू शकलेले नाहीत.बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडियाची चळवळ संपूर्ण भारतात आणि भारताबाहेर देखील नेण्याकरिता त्यांना अजूनही वाव आहे.

परमपूज्य बाबासाहेबांनी ही सोसायटी स्थापन करताना अनेक भव्य योजना ,भव्य स्वप्न साकारण्याचे ठरवले होते. खरतर या अमूल्य संस्थेमार्फत बाबासाहेबांची स्वप्न साकार करण्याकरीता राजरत्न आंबेडकर यांनी पाठपुरावा केल्यास त्यांना जास्त पॉलिटिकल किंवा पर्सनल मायलेज मिळू शकेल.

राजरत्न यांना राजकीय यश कितपत मिळेल?

आंबेडकरी चळवळीत शॉर्टकटला स्थान नाही.राजरत्न आंबेडकर यांच्याकडे कुठलीही सामाजिक किंवा धार्मिक चळवळीचा अनुभव नसताना तळागळातील जनतेपर्यंत पोहोचण्याकरता विधानसभा निवडणुकांच्या शॉर्टकटला बहुजन जनता प्रतिसाद देणार नाही हे नक्की आहे.

खरतर सोशल मीडियावरील फॉलोअर्स मतांमध्ये परिवर्तित होतील हा शुद्ध गैरसमज राजरत्न आंबेडकर यांनी मनातून काढायला हवा. त्यांनी आतापर्यंत मीडियामध्ये पॉलिटिकल स्टेटमेंटस् देण्याशिवाय आणि छोट्या मोठ्या सभा घेण्यापलीकडे आंबेडकरी चळवळी करिता ठोस असे कुठलेही कार्य केलेले नाही. नुसत्या सभा घेऊन, इमोशनल आवाहन करून आणि भारत मुक्ती मोर्चातील काही शेकडा लोकांच्या जीवावर निवडणुकीत टिकाव लागणार नाही हे त्यांनी समजून घ्यायला हवे.

राजरत्न आंबेडकर गेली काही वर्ष उत्तर भारतात ऍक्टिव्ह आहेत आणि भारत मुक्ती मोर्चातील निधीतून परदेश वाऱ्या करत आहेत, लोकसंपर्क करीत आहेत, त्यांना बऱ्यापैकी सपोर्ट देखील मिळत आहे मात्र महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत केवळ मतदात्यांच्या मतांवरच राजरत्न यांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे.

बाळासाहेब आंबेडकरांच्या मास लीडरशिपचा आवाका बघता ,त्यांच्या पॉलिटिकल स्पेस मध्ये छेद करण्याचे धाडस राजरत्न ह्यांना नक्कीच भारी जाईल हे स्पष्ट आहे.

विधानसभा निवडणुकीत वंचितची स्थिती

वंचितांची आघाडी किंवा वंचितांचा पक्ष उभा राहू नये यासाठी सर्वच प्रस्थापित पक्ष आणि त्यांचे नेते सातत्याने प्रयत्न करीत असतात. केवळ भाजपच नव्हे तर महाराष्ट्रातील काँग्रेसची सोशल मीडिया टीम आणि काँग्रेसी विचारवंत देखील सातत्याने वंचित पक्षाबद्दल आणि बाळासाहेब आंबेडकरांविरुद्ध अपप्रचार करीत असतात. त्यांचे अर्धवट स्टेटमेंटस् छापून त्यांच्याबद्दल गैरसमज पसरवत असतात. मात्र बाळासाहेब आंबेडकरांची चळवळ ही सामाजिक लढ्याची चळवळ आहे त्यामुळे निवडणुकीतील यश अपयशापेक्षा बहुजनांच्या न्याय हक्कांच्या संरक्षणाकरिता लढा त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचा आहे.

कोअर बुद्धिस्ट आणि काही प्रमाणात बहुजन मतदारांची मतं वंचितला मिळतील हे स्पष्टच आहे

मात्र वंचितने लोकसभेतील चुका रिपीट न केल्यास, आणि आयाराम गयारामांना संधी न देता स्वच्छ चारित्र्याच्या योग्य आणि विश्वासू उमेदवारांना संधी दिल्यास विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळू शकेल. राजरत्न आंबेडकर जिथे जिथे उमेदवार उभे करतील तिथे काही अंशी वंचीतची मतं विभागल्या जातील इतकाच काय तो इम्पॅक्ट होऊ शकेल.

जयश्री इंगळे

Updated : 12 Aug 2024 9:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top