Home > News Update > पिंपरीत 'दृश्यम' स्टाईलने पत्नीच्या प्रियकराची हत्या

पिंपरीत 'दृश्यम' स्टाईलने पत्नीच्या प्रियकराची हत्या

पिंपरीत दृश्यम स्टाईलने पत्नीच्या प्रियकराची हत्या
X

पिंपरी चिंचवड // पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरुन पतीने पत्नीच्या प्रियकराची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर मृतदेह हातभट्टीत टाकून जाळण्यात आला. तसेच पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपीने 'दृश्यम' चित्रपटाच्या कथानकाशी साधर्म्य असलेली परिस्थिती निर्माण केली. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीतील बावधन येथे हा प्रकार घडला.

आरोपीने मृतदेह संपूर्णपणे जळाल्यानंतर त्या मृतदेहाची हाडे आणि त्यासोबत एक शेळी मारुन तिचा मृतदेह पोत्यात भरून जवळ असलेल्या नाल्यात टाकला. जेणेकरुन पोलिसांची दिशाभूल होईल. मात्र, हिंजवडी पोलिसांनी या हत्येचा उलगडा करत तिघा जणांना अटक केली. तर एका अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेण्यात आलं आहे.

लंकेश रजपुत उर्फ लंक्या, गोल्या ऊर्फ अरूण रजपुत, सचिन तानाजी रजपुत अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.

बावधन येथील भूषण चोरगे यांचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. 21 ऑक्टोबरला भरतने महिलेला तिच्या मोबाईलवर दोन मिस कॉल दिले. त्यावेळी जवळच असलेल्या पतीने विचारणा करत महिलेला मारहाण सुरु केली. ही मारहाण सुरू असताना त्या महिलेने घरामधून पळ काढला.

त्यावेळी महिलेशी संपर्क न झाल्याने तिचा प्रियकर महिलेला भेटण्यासाठी घराजवळ आला. मात्र, भरत चोरगे तिथे आल्याचं समजताच महिलेच्या पतीने आणि त्याच्या दोन साथीदारांनी मिळून त्याची धारदार शस्त्राने वार करत हत्या केली.

भरतचा मृतदेह चारचाकी वाहनातून उरवडे गावात असलेल्या हातभट्टीमध्ये दोन दिवस जाळला. भरतचा मृतदेह जाळल्यानंतर त्याची राख आणि इतर अवशेष हे घोटावडे परिसरातील नाल्यात आणि नदीत टाकून पुरावा नष्ट केला. त्यानंतर मुख्य आरोपी हा मध्य प्रदेशमध्ये पळून गेला.

दरम्यान भूषण चोरगेच्या कुटुंबीयांनी हिंजवडी पोलिसांत तो मिसिंग असल्याची तक्रार दिली. त्याच दिवशी भरत याच्या आईला त्याची चप्पल आरोपी लंकेश राजपूत याचा घराजवळ दिसली. हिंजवडी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत लंकेश राजपूतला ताब्यात घेतले. सर्व आरोपींना अटक केल्यानंतर त्यांनी हा घटनाक्रम सांगितला.

ज्याप्रमाणे 'दृश्यम' चित्रपटात मृतदेह सापडत नसल्याने पोलीस आरोपींना पकडू शकत नाहीत, तसेच आपणही पकडले जाणार नाही, असे समजून आरोपींनी सर्व कट रचत ही हत्या केली. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Updated : 4 Nov 2021 3:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top