Home > News Update > परमबीर सिंह यांच्यावर कारवाई का नाही?

परमबीर सिंह यांच्यावर कारवाई का नाही?

मनसुख हिरेन खून प्रकरणात परबमीर सिंह यांच्यावरही NIAच्या चार्जशीटमध्ये धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. खंडणीचे ४ गुन्हे, सायबर एक्स्पर्टला ५ लाख रुपये दिल्याचा आरोप या सगळ्यामुळे परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांच्या सत्यतेबाबत संशय़ निर्माण झाला आहे. पाहूया एक स्पेशल रिपोर्ट

परमबीर सिंह यांच्यावर कारवाई का नाही?
X

अंबानी स्फोटकं प्रकरणी परमबीर सिंह यांनी सायबर एक्स्पर्टला ५ लाख रुपये का दिले?

परमबीर सिंह यांनी अंबानी स्फोटकं प्रकरणात अहवाल का बदलला?

NIAच्या आरोपपत्रात गंभीर माहिती समोर येऊनही परमबीर सिंह आरोपी का नाहीत?

परमबीर सिंहांविरोधात खंडणीचे ४ गुन्हे, NIAच्या आरोपपत्रात गंभीर माहिती असूनही अटक का नाही?

अनिल देशमुख यांच्यावरील परमबीर सिंहांच्या आरोपांची सत्यता काय?

असे प्रश्न आता निर्माण झाले आहेत आणि याला कारण ठरले आहे ते NIAचे आरोपपत्र...अंबानी यांच्या घरापुढील स्फोटकं आणि त्यानंतर झालेल्या मनसुख हिरेन हत्या प्रकरणी आता NIAच्या चार्जशीटमध्ये परमबीर सिंह यांच्यावरही आरोप झाले आहेत. स्फोटकं सापडल्यानंतर जैश-उल-हिंद या संघटनेने टेलिग्राम चॅनेलद्वारे याची जबाबदारी घेतली होती. पण यासंदर्भातला अहवाल बदलण्यासाठी परमबीर सिंह यांनी आपल्याला ५ लाख रुपये दिले होते, असा जबाब मुंबई पोलिसांच्या सायबर एक्स्पर्टने दिला आहे. यामुळे परमबीर सिंह अडचणीत आले आहेत. माजी पोलीस अधिकारी धनंजय वंजारी यांच्या मते बारचालकांकडून १०० कोटींच्या वसुलीपेक्षा परमबीर सिंहांवरील ५ लाख रुपये दिल्याचा आरोप जास्त गंभीर आहे. पण हे प्रकरण उघड झाले तेव्हाच तत्कालीन गृहमंत्र्यांनी परमबीर सिंहांवर कारवाई का केली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सचिन वाझेने प्रदीप शर्माला सुपारी दिली. सचिन वाझेला मुंबई पोलिसांच्या सेवेत पुन्हा घेण्याचा निर्णय परमबीर सिंह यांनी घेतला. सचिन वाझे मास्टरमाईंड असलेल्या अंबानी स्फोटकं प्रकरणात परमबीर सिंह यांनी अहवाल बदलण्यासाठी ५ लाख रुपये दिल्याची माहिती सायबर एक्स्पर्टने आपल्या जबाबात दिली आहे. या सगळ्या गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड दिसत आहेत. तर NIA ने आपल्याच आरोपपत्रात परमबीर सिंह यांनी ५ लाख रुपये दिल्याची माहिती दिली आहे. मग त्यांना आरोपी का केले नाही, यामागे भाजपचे षडयंत्र आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची तातडीने दखल घेऊन कामाला लागणाऱ्या ईडीला परमबीर सिंह यांच्यावरील खंडणीचे ४ गुन्हे, सायबर एक्स्पर्टचा जबाब या गोष्टी समोर येऊनही त्यांची चौकशी करावीशी का वाटत नाही, असा सवाल उपस्थित झाला आहे. परमबीर सिंह यांनी भाजपची ढाल करत स्वताचा बचाव केल्याचे मत पत्रकार जयंत माईनकर यांनी व्यक्त केले आहे.

एकीकडे हे प्रश्न समोर आले आहेत, तर दुसरीकडे अनिल देशमुख यांच्यावरील १०० कोटी रुपये वसुलीच्या आरोपांबाबत सीबीआयच्या हाती अजूनही काही ठोस लागलेले नाही. अनिल देशमुख यांची ४ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. याच मालमत्तेची किंमत ३०० कोटी असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. पण ईडीनेच या मालमत्तेची किंमत ४ कोटी २० लाख असल्याचे सांगितले आहे. अनिल देशमुख यांची सीबीआय, ईडी चौकशी सुरू आहे, पण अजूनही ठोस माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे परमबीर सिंह यांचे आऱोप कोणत्या पार्श्वभूमीवर झाले याचा विचार करुन परमबीर सिंह यांचीही चौकशी होण्याची आता गरज आहे. पण केंद्रीय यंत्रणा परमबीर सिंह यांची चौकशी का करत नाही हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो आहे.

Updated : 9 Sep 2021 12:42 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top