Home > News Update > नेमकं कोणत्या आनंदात हा माणूस हे वाद्य वाजवत असावा?

नेमकं कोणत्या आनंदात हा माणूस हे वाद्य वाजवत असावा?

आग्र्यामध्ये मृतदेह जाळण्यासाठी तीन दिवसांची वेटिंग आहे आणि वाराणसीत मृतदेहाला खांदा द्यायला पाच हजार रुपये भाव सुरू आहे... कदाचित या गोष्टींमुळे ते समाधानी असतील नाहीतर एवढ्या मोठ्या पदावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींची असं वाद्य हाती घेण्याची इच्छा झाली नसती, असं सांगताहेत डॉ.प्रकाश कोयाडे...

नेमकं कोणत्या आनंदात हा माणूस हे वाद्य वाजवत असावा?
X

श्र्वास पुरत नाही म्हणून ऑटोमध्ये आपल्या नवऱ्याला तोंडाने ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न करणारी बायको आणि तिथेच जीव सोडणारा नवरा... कदाचित या आणि अशा हजारो कुटुंबियांसाठी वन्स मोअर म्हणत हे वाद्य वाजवत असतील.


रस्त्यावर ऑक्सिजनसाठी तडफडणारे भारतीय वयस्क आणि तरुण किंवा स्त्री आणि पुरुष असो किंवा एक लहान मुलगा जो आपल्या आईचा मृतदेह स्ट्रेचरवर ढकलत नेतोय... किंवा आजूबाजूला घडणाऱ्या हजारो मृत्यूपैकी कोणीही असो, कदाचित त्यांच्या मृत्यूची मंगल धून वाजवण्याच्या तयारीत हे असतील.

असं म्हणतात की, रोम जळत असताना तिथला निरो नावाचा बादशहा फिडल नावाचं वाद्य वाजवत होता. खरंतर हे खोटं आहे, असं काही तेव्हा झालंच नव्हतं. ती केवळ अफवा होती. सत्यघटना तर आत्ता भारतात घडत आहे... तेही नुसता देश नाही तर देशातील लोक जळत असताना!

दवाखान्यांना लागत असलेल्या आगी, अॅम्ब्युलन्सचे कानठळ्या बसतील असे आवाज आणि एकाच चितेवर जळत असलेले पंधरा-वीस मृतदेह की लॉकडाऊनमुळे होणारी उपासमार आणि आत्महत्या नेमकं कशाचा आनंद होतोय यांना. नाहीतर कोण अशा दु:खी प्रसंगी वाद्य वाजवतो.

अख्ख्या जगातील वर्तमानपत्रे थू थू करत आहेत. पाकिस्तान भारताला मदत करण्याची इच्छा दाखवतोय. परदेशी लोक मदत करू इच्छित आहेत... ही कौतुकाची गोष्ट निश्चितच नाही. हा होऊ घातलेल्या महासत्तेचा अपमान आहे आणि कदाचित यामुळेच देशाची वाटचाल पाहून यांनी आनंदाने हे वाद्य हाती घेतलं असावं.

दोन लाख लोक आत्तापर्यंत मृत्यू पावले आहेत. साडेतीन लाख नवे रुग्ण आढळत आहेत. दररोज ओळखीचं कोणी तरी सोडून जात आहे. 'शववाहिका' 'स्मशान' अखंड ओसांडून वाहात आहेत. पिशवीत गुंडाळलेले मृतदेह बघून घशाखाली घास उतरत नाही आणि हे 'साजरं' करत आहेत.

काल संध्याकाळी फोन आला, डॉक्टरसाहेब करमाळ्याहून बोलतोय, माझ्या बापाला श्र्वास घेता येत नाही, रक्ताच्या उलट्या होत आहे काहीतरी करा... काय करणार? डोळ्यासमोर हा फोटो आला! निवडणूक महत्त्वाची आहे ना!

परवा अॅडमिट असताना दवाखान्याच्या सहाव्या मजल्यावरील खिडकीतून संध्याकाळी असंच बाहेर पाहात उभा होतो. बाजूला कामगार सफाई करत होता. दूरवर पाहात मी बोललो, "मामा, एखाद्या कंपनीत आग लागली वाटतं." कामगार म्हणाला, "नाही सर, ती पिंपरीतील स्मशानभूमी आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून तिथली आग बंद झाली नाही!"

काल भारतात तीन हजार दोनशे पंचाऐंशी लोकांचा मृत्यू झाला. केवळ अॉक्सिजन आणि औषधं न मिळाल्याने मरणाऱ्यांची संख्या दररोज वाढत आहे. अशावेळी देश संकटात असताना अगदी छद्मी हसू चेहऱ्यावर आणत हे वाद्य हाती घेणं म्हणजे मरणाऱ्या लोकांचा 'मृतोत्सव' साजरं करण्यासारखं आहे!

डॉ. प्रकाश कोयाडे

Updated : 28 April 2021 7:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top