Home > मॅक्स ब्लॉग्ज > ममता बॅनर्जी यांनी नंदीग्रामची निवड का केली?

ममता बॅनर्जी यांनी नंदीग्रामची निवड का केली?

कोण कोणाच्या चक्रव्युवहात अडकलं? ममता यांच्या नंदीग्रामच्या रणनीतिने भाजप घायाळ, काय होती तृणमूल कॉंग्रेसची रणनीति? ममता यांची रणनीति दोन पावलं पुढे असते. असं का म्हटलं जातं? वाचा मॅक्समहाराष्ट्रचा स्पेशल रिपोर्ट

ममता बॅनर्जी यांनी नंदीग्रामची निवड का केली?
X

कटप्पाने बाहुबली को क्यू मारा? गेले काही वर्ष हा प्रश्न भारतात विचारला जात होता. अगदी तसाच सवाल ममता बॅनर्जी यांच्या बाबत विचारला जात आहे. पश्चिम बंगालमध्ये 200 पेक्षा अधिक जागा जिंकणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी स्वत:चा सुरक्षित मतदारसंघ सोडून नंदीग्रामची निवड का केली? नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांचा निसटता पराभव झाला. तरीही 200 पेक्षा अधिक जागा मिळवणाऱ्या ममतांना स्वत:साठी एक सुरक्षित मतदारसंघ मिळाला नाही का? असं प्रश्न सोशल मीडियावर विचारले जात आहेत.

वास्तविक पाहता ममता बॅनर्जी यांचा भवानीपूर हा पारंपरिक विधानसभा मतदारसंघ आहे. मात्र, यावेळी ममता बॅनर्जी यांनी थेट बंडखोरांच्या मतदारसंघातून लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं सुरुवातीला त्या नंदीग्राम मधून आणि भवानीपूरमधून अशा दोनही मतदारसंघातून निवडणूक लढवणार? असं वाटत असताना भाजप नेते शुभेंदू अधिकारी (Shubhendu adhikari) यांनी मुख्यमंत्री ममता बनर्जी (Mamata Banerjee) यांना केवळ नंदीग्राम मधून निवडणूक लढण्याचं चॅलेंज दिलं आणि ममता यांनी ते स्वीकारलं.

ममता यांनी ते चॅलेंज स्वीकारलं नसते तर...

काय झालं असतं....?

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) विरुद्ध भाजप (BJP) असा सरळ सामना आपल्याला पाहायला मिळाला. कोणत्याही राज्यात निवडणूक म्हटलं की भाजप मध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या मोठी असते. या प्रवेशामुळं भाजप एक वातावरण निर्मिती करते. विरोधकांवर मानिसक दबाव टाकण्याचा हा भाजपचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात देखील निवडणुकी अगोदर अशीच रणनीति भाजपने आखली.

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांपैकी विखे पाटील सोडता बाकी नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, निवडणुकीच्या अगोदर तयार करण्यात आलेल्या या वातावरणांमुळे विरोधक संपल्यात जमा आहेत. आता कोणी विरोधक नाही. असा प्रचार भाजप करत असते.

कदाचित देवेंद्र फडणवीस यांचं ते वाक्य तुम्हाला आठवत असेल...

'शरद पवार के राजनीति का इरा अब खत्म हो चुका है'

असं म्हणत फडणवीस यांनी राज्यात फक्त भाजप. आणि आम्हाला कोणी विरोधकच नाहीत असं वातावरण तयार केलं होतं. मात्र, महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागल्यानंतर चित्र वेगळं होतं. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने जरा जोर लावला असता तर चित्र काही वेगळं असतं. असं मत राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केलं.

एकंदरित महाराष्ट्रातील पक्ष भाजपच्या या वातावरण निर्मितीपुढे अर्धे हरले होते. मात्र, ममता बॅनर्जी यांनी या प्रचाराला बळी न पडता भाजपच्या या वातावरण निर्मिती विरोधात रणनीति तयार केली.

ऐन विधान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमधून बंडखोरी होत असताना ममता बॅनर्जी यांनी स्वत:चा मतदार संघ सोडून नंदीग्राम येथून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय घेणं तितकं सहज आणि सोप्प होतं का?

"नंदीग्राम माझ्यासाठी पवित्र आहे. त्यामुळे मला असे वाटते मी इथून निवडणूक लढवली पाहिजे. आमच्या प्रदेशाध्यक्षांना मी विनंती करते की त्यांनी मला यासाठी परवानगी द्यावी."

असं म्हणत ममता यांनी भाजप विरोधात रणनीतिचं पहिलं पाऊल टाकलं.

भाजपचा डाव भाजपवर उलटला...

हिंदी सिनेमात एक चांगला संवाद आहे. 'हारकर जितनेवालो को बाजीगर कहते है' ममता बॅनर्जी या बंगालच्या निवडणूकीमधील बाजीगर आहेत. पराजय झाल्यानंतर ते म्हणतात...

नंदीग्रामची काळजी करु नका. ते विसरा. संघर्षात काही मिळवण्यासाठी काही गमवावं लागतं. नंदीग्राम ची जनता जो विचार करेल. त्याचा मी स्वीकार करेल. मला कसलीही भीती नाही. आपण 221 पेक्षा अधिक जागा जिंकत आहोत. आणि भाजप निवडणूक हारली. केंद्र सरकारने लाख प्रयत्न केले तर आम्ही मोठा विजय मिळवला आहे. हा विजय बंगाल आणि बंगालच्या जनतेचा आहे. बंगालच्या लोकांनी देशाला वाचवलं आहे. मी सांगितलं होतं आम्ही द्विशतक करणार... हा विजय बंगालच्या लोकांनी खेचून आणला. आम्ही सांगितलं होतं. को 'खेला हौबे', खेळ झाला आणि शेवटी आम्ही जिंकलो.

ममता यांची ही प्रतिक्रिया बोलकी आहे. ममता यांच्यासाठी नंदीग्राम हे खेळातील एक प्याद आहे. आणि हे प्याद पुढं सरकवून ममता यांनी राजाला चेक मेट केलं आहे. ममता या निवडणूक जिंकणारच होत्या. मात्र, ममता या 'ये दिल मांगे मोर' या महत्त्वकांक्षेच्या आहेत... जरा इस्कटून पाहू....





शुभेंदू अधिकारी ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला सोडून गेल्यानंतर पक्षातील नेत्यांचं मोरल डाऊन झालं होतं. शुभेंदू अधिकारी म्हणजे लहान नेते नाहीत. शुभेंदू अधिकारी यांना ममता यांना 2011 ला मुख्यमंत्र्याची खुर्ची मिळवून देण्यात महत्त्वाचा रोल निभावला आहे. ममता बॅनर्जी यांचा उत्तराधिकारी कोण सवाल उपस्थित केला असता शुभेंदू अधिकारी यांचं नाव घेतलं जात होतं. मात्र, अचानक शुभेंदू यांच्या ऐवजी अभिषेक बॅनर्जी यांचं नाव समोर आलं. आणि थिनगी पडली. आणि शुभेंदू यांनी पक्ष सोडण्य़ाचा निर्णय घेतला.

कोण आहेत शुभेंदू अधिकारी?

राजकारणी घराण्यातून येतात. त्यांच्या घरात शुभेंदू अधिकारी एकटेच राजकारणात नाहीत. अधिकारी परिवार नंदीग्राम विधानसभा मतदारसंघाशिवाय तामलूक व कंठी हे दोन लोकसभा मतदारसंघ या घराण्याच्या ताब्यात आहेत.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग सरकारमध्ये ग्रामविकास खात्याचे राज्यमंत्री राहिलेले कंठी लोकसभा मतदारसंघाचे २००९ पासूनचे तृणमूल काँग्रेसचे खासदार शिशीर कुमार अधिकारी हे शुभेंदू अधिकारी यांचे वडील. शुभेंदू यांचे बंधू व शिशीर अधिकारी यांचे दुसरे चिरंजीव तामलूक लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. एक भाऊ कांथी नगरपालिकेचे खासदार आहेत. पश्चिम बंगालच्या 6 जिल्ह्यात अधिकारी परिवाराचा प्रभाव आहे.

पूर्व मोदिनीपूर, पश्चिम मोदिनीपूर, बांकुडा, पुरुलिया या भागात यांच्या परिवाराचे मोठं प्रस्थ आहे. शुभेंदू देखील 2006 मध्ये कांथी दक्षिण मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेचे आमदार झाले. त्यानंतर दोन वेळा ते खासदार झाले. 2016 ला ते पुन्हा आमदार झाले. ते ममता यांच्या सरकारमध्ये परिवहन मंत्री राहिले आहेत.

आता इतकी मोठी ताकद असलेला माणूस पक्ष सोडून गेल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या पक्षात हा झालेला मोठा भूकंपच म्हणावा लागेल. राजकीय दृष्ट्या विचार केला तर साधारण 50 विधानसभा मतदार संघावर अधिकारी यांच्या कुटुंबाची पकड असल्याचं माध्यमांनी केलेल्या वार्तांकनात वाचायला मिळतं. त्यामुळं शुभेंदू अधिकारी गेल्यानं टीएमसीच्या कमीत कमी 50 सीट धोक्यात आल्या होत्या. म्हणून ममता यांनी जरा रिव्हर्स प्लॅन केला. आणि थेट नंदीग्राममधून उभ्या राहिल्या.

त्यामुळं शुभेंदू अधिकारी यांचं पूर्ण राजकीय परिवार आपल्या घरातील व्यक्तीचा पराभव होऊ नये म्हणून इतर मतदारसंघामध्ये फिरकला नाही. आणि विशेष बाब म्हणजे स्वत: शुभेंदू यांच्यासाठी ही आरपार ची लढाई होती. नव्हे ती ममता यांनी स्वत: तयार केली होती. कारण ममता यांचे उत्तर अधिकारी मानले जाणाऱ्या अधिकारी यांना ममता यांचं निवडणुकीचं गणित पूर्ण माहिती होतं. म्हणून ममता यांनी एक हातचा राखत थेट नंदीग्राम येथूनच निवडणूक लढवली. सुरक्षित मतदारसंघ भवानीपूर सोडून ममता यांनी नंदीग्राममधून निवडणूक लढवल्याने मनोबल उंचावलं गेलं. स्वत: शुभेंदू यांच्याकडे ममता यांच्या विरोधात बोलण्यासाठी खूप काही असताना देखील त्यांना नंदीग्रामच्या बाहेर निघता आलं नाही. हा ममता यांचा माइंड गेम होता. त्यात शुभेंदू अधिकारी फसले. ममता बॅनर्जी यांच्या खेळी मुळे आजुबाजूच्या मतदारसंघावर मोठा परिणाम झाला. आणि भाजपला एका सिटच्या बदल्यात अधिकारी यांना ज्या उद्देशासाठी पक्षात घेतले होतं. तो उद्देश मात्र सफल होताना दिसत नाही,

भवानीपूर का सोडले?

ममता यांनी नंदीग्राम हे मोरल लेव्हल वाढवण्यासाठी निवडलं असलं तरी भवानीपूर या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघात त्यांची नक्की काय परिस्थिती होती?

2011 आणि 2016 ला त्या या ठिकाणाहून निवडून आल्या होत्या. मात्र, त्यांच्या मतांचं margin घटलं होतं. 29 टक्क्यांनी ममता यांची मत कमी झाली होती. विशेष म्हणजे ममता यांच्या स्वत:च्या मतदार संघात

2019 च्या लोकसभा निवडणूकीत Lok Sabha elections तृणमूल कॉंग्रेसला भवानीपूर मतदारसंघातून अवघ्या 3,500 मतांचं लीड होतं.

त्यामुळं ममता यांनी भवानीपूर आणि नंदीग्राम या दोन मतदार संघाऐवजी एकाच मतदारसंघावर फोकस करण्याचा निर्णय घेतला. ममता यांचा नंदीग्राममधून पराभव झाला. मात्र, ममता यांनी पश्चिम बंगालमधून विजय मिळवला. ममता यांच्या या विजयाला एकच शिर्षक योग्य आहे. ते म्हणजे गड आला पण सिंह गेला...

Updated : 3 May 2021 12:54 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top