कोणत्या पक्षात जाणार वसंत मोरे ?
X
Pune : मनसेचे फायरब्रँड नेते म्हणून वसंत मोरे यांची पुण्यात मोठी ओळख होती, मात्र वसंत मोरे यांनी आता मनसेचा राजीनामा देत राज ठाकरे यांना अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. माझ्या विरोधात शहर पातळीवर पक्षांतर्गत राजकारण केले जात असून माझी प्रतिमा मलीन करण्याचे काम चालू आहे. असा आरोप करत मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी मनसेच्या सदस्य पदाचा आणि इतर सर्व पदांचा राजीनामा आज दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरे वारंवार आपली नाराजी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून व्यक्त करत होते. मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या एका कार्यक्रमांमध्ये शर्मिला ठाकरे यांनी 'साईनाथ बाबर जर दिल्लीत गेले तर दुधात साखर' अशा प्रकारचे वक्तव्य करत साईनाथ बाबर यांचं पुणे लोकसभेसाठी उमेदवारी असू शकते अशा पद्धतीचे संकेत दिले होते. त्याच काळापासून वसंत मोरे यांची पक्षांमध्ये घुसमट सुरू झाली. वसंत मोरे यांनी वारंवार पुणे लोकसभा मतदारसंघावर मनसेकडून आपणच उमेदवार असणार असा दावा अनेक वेळा केला होता. मात्र मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी देखील पुणे लोकसभेवर माझाच दावा आहे. असं ठणकावून सांगितलं होतं. यातच शर्मिला ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वसंत मोरे काहीसे नाराज पाहायला मिळत होते. दरम्यानच्या काळात वसंत मोरे यांच्या विरोधात शहरामध्ये पक्षांतर्गत सुडाचे राजकारण होत आहे, असा आरोप वसंत मोरे यांनी केला होता. याची प्रचिती अमित ठाकरे यांनी पुणे विद्यापीठावर काढलेल्या मोर्चादरम्यान देखील वसंत मोरे यांनी व्यक्त करून दाखवली होती.
वारंवार आपल्याबरोबर सुडाचं राजकारण केलं जात आहे. यामुळे माझी आता घुसमट होत आहे. असं म्हणत वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. मनसेतून वसंत मोरे यांच्या जाणाने मोठा धक्का मनसेला बसला असून. निवडणुकीच्या काळात याचे मोठे नुकसान पुणे मनसेला होणार आहे.