Home > News Update > Jhonson & Jhonson चा परवाना महेश झगडेंनी का केला होता रद्द?

Jhonson & Jhonson चा परवाना महेश झगडेंनी का केला होता रद्द?

Jhonson & Jhonson चा परवाना महेश झगडेंनी का केला होता रद्द?
X

जॉन्सन्स बेबी पॉवडर हे ऐकल्यावर लहानपणी टीव्हीवर मालिका आणि चित्रपटांच्या ब्रेकमध्ये दिसणारी जाहीरात आपल्याला आठवत असेल. एक लहान बाळ रडायचं आणि त्याची आई त्याला न्हाऊ घातल्यानंतर जॉन्सन्सची बेबी पॉवडर लावते आणि ते बाळ हसू लागतं. इतकंच काय आपल्यावर देखील लहानपणी या पॉवडरचे प्रयोग झाले आहेत. आईला विचारून पहा हो असंच उत्तर येईल. पण पुढील वर्षापासून ही पॉवडर धोकादायक असल्याने जगभरात विकायची बंद होणार आहे. पण आपल्याला ठाऊक आहे का की ८ वर्षांपुर्वी एका मराठी अधिकाऱ्याने या जगप्रसिध्द कंपनीच्या कारखान्याचं लायसन्स याच कारणास्तव रद्द केलं होतं. कोण होते हे अधिकारी हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी ही नवजात बालकांना उपयुक्त उत्पादनं बनवण्यासाठी ओळखली जाते. साबण, पावडर, क्रिम, बॉडी लोशन अशा उत्पादनांचा वापर आपण आजपर्यंत केला आहे. पण यामधील पॉवडर मध्ये कॅन्सर होण्यास उपयुक्त असलेलं अॅस्बेस्टस वापरलं जातं ही माहिती समोर आली आणि सगळीकडे एकच खळबळ उडाली. कारण जगभरातील बहुतांशी आया आपल्या लहान मुलांसाठी जॉन्सन बेबी पॉवडर वापरायच्याच. याच कारणास्तव जगभरात या कंपनी विरोधात तब्बल ३८००० खटले आजपर्यंत दाखल झाले आहेत आणि त्यामुळेच शुक्रवारी जॉन्सन्स बेबी पॉवडर ची २०२३ पासून संपूर्ण जगभरात विक्री थांबवली जाणार आहे असं पाऊल कंपनीला उचलावं लागलं असल्याचं म्हटलं जात आहे. जगभरात जरी पुढील वर्षी पासून विक्री बंद होणार असली तरी अमेरीका आणि कॅनडामध्ये या पॉवडरची विक्री दोन वर्षांपुर्वी २०२० मध्येच बंद करण्यात आली होती. त्यामुळे कंपनीच्या फॅमिली फ्रेंडली इमेजला धक्का बसलाय.

कंपनीने नेमकं काय म्हटलंय.

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने या प्रकरणात आपली बाजू मांडली आहे ती अशी, "जागतिक पातळीवर उत्पादनाच्या पुनर्तपासणीचा भाग म्हणून , आम्ही सर्व बेबी पावडरचं उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलाचा परिणाम म्हणून, जॉन्सन्स बेबी पावडरची 2023 मध्ये जागतिक स्तरावर विक्री बंद केली जाईल. आमच्या प्रसाधनांच्या सुरक्षिततेबद्दल आमची भुमिका बदललेली नाही. जॉन्सन्स बेबी पावडर सुरक्षित असल्याची पुष्टी करणाऱ्या जगभरातील वैद्यकीय तज्ञांच्या दशकांच्या स्वतंत्र वैज्ञानिक विश्लेषणाच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत. ज्यात एस्बेस्टोस नसतो आणि त्यामुळे कर्करोग होत नाही असं म्हटलं गेलं आहे."

८ वर्षांपुर्वी लायसन्स रद्द करणारे ते अधिकारी कोण?

निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे असं या अधिकाऱ्याच नावं आहे. ते FDA आयुक्त असताना त्यांच्या लक्षात कंपनीची वरील बाब लक्षात आली होती त्यामुळे त्यांनी कंपनीच्या मुलूंड येथील कारखान्याचं लायसन्स रद्द केलं होतं. यावरून त्यांना त्यांच्या वरीष्ठांकडून फैलावर घेतलं गेलं होतं, निर्णय बदलायला सांगितला होता पण त्यांनी आपला निर्णय बदलला नाही उलट सडेतोड उत्तर देखील दिलं. तसा किस्साच त्यांनी ट्विटर वरून शेअर केला आहे. "जॉन्सन अँड जॉन्सन च्या बेबी पावडरमध्ये कर्करोगास कारणीभूत होणारे रसायन वापरले व त्याचे सुमारे ६०,००० पॅकेट्स विकून भारतातील लहान मुलांच्या जीवावर केवळ पैसा कमाविण्यासाठी त्या कंपनीने गुन्हेगारी कृत्ये केले म्हणून त्यांच्या मुलुंड येथील कारखाण्याचे ८ वर्षांपूर्वी FDA आयुक्त असतांना लायसन्स रद्द केले होते. त्याचा जगभर गवगवा झाला होता. आता त्या कंपनीने हि पावडर विक्री जगभर थांबविली आहे. त्या वेळेस केलल्या कारवाईमुळे अनेक जीव वाचतील हे समाधान आहे. पण वाईट याचे वाटते कि त्यावेळेस राज्यातील सर्वोच्च अधिकाऱ्याने मला चांगलेच फैलावर घेऊन "तुम्ही जे केले तेअयोग्य आहे, भारतातून मल्टीनॅशनल कंपन्यांना अशा लायसन्स रद्द करण्याची कृती करून तुम्ही पळवून लावणार आहात का? तुम्हाला काही समजते का? लायसन्स रद्द करण्याचा आदेश मागे घ्या!". माझे त्यावर निक्षून उत्तर होते " पैशासाठी जर या कंपन्या लहान मुलांच्या जीवावर उठत असतील तर त्यांच्या बाबतीत हीच कारवाई योग्य!" मी लायसन्स रद्द करण्याचे आदेश मागे घेतले नाहीत. त्या अधिकाऱ्याने आता हे वाचावे अशी अपेक्षा.

या किस्स्यावरून एक गोष्ट नक्की लक्षात येते की आपण घेतलेल्या निर्णयांवर ठाम राहायला हवं. हे दुरदृष्टी असलेल्या महेश झगडे यांच्या या कृतीवरून दिसून येतं.

Updated : 13 Aug 2022 2:32 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top