राज्याची आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी काय करणार? काय म्हणाले मुख्यमंत्री

Courtesy: Social Media

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात विविध उपाययोजना करण्यात येत असून दर्जेदार आरोग्य सुविधांची उभारणी करण्यात येत आहे. मात्र, भविष्यात कोरोना विषाणूसारखे कोणतेही संकट आले तरी राज्याची आरोग्य यंत्रणा तत्पर करुन ती अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य सुविधांना प्राथमिकता देण्यात येत आहे. निरोगी, सशक्त महाराष्ट्र करण्यावर भर असून त्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या वतीने मुंबईतील गोकुळदास तेजपाल रुग्णालय (जी.टी. हॉस्पिटल) येथे राज्यातील शंभराव्या कोरोना विषाणू रुग्ण चिकित्सा प्रयोगशाळेचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ई-लोकार्पण करण्यात आले, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, पालकमंत्री अस्लम शेख यांच्यासह वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. संजय मुखर्जी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने आदी मान्यवर सहभागी झाले होते.

मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल, वरळीतील एनएससीआयचा डोम, गोरेगाव येथे युद्धपातळीवर कोविडसाठी ‘फिल्ड हॉस्पिटल्स’ उभारण्यात आली आहेत. कोरोनाविरुद्धच्या उपाययोजनांमध्ये महाराष्ट्र देशात पुढेच आहे. आज आपण महाराष्ट्रात उभारलेल्या फिल्ड हॉस्पिटल्सप्रमाणे दिल्लीत देखील असेच हॉस्पिटल्स उभारण्यात येत आहेत. मुंबई, ठाण्यात सर्व सुविधायुक्त रुग्णालयांची निर्मिती होते, ही कामगिरी थक्क करणारी असून हे आपल्या सर्वांच्या प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे. आपण रुग्णालये, आरोग्य सुविधा निर्माण करीत आहोत, मात्र त्याचा वापर करण्याची वेळ येऊ नये अशी प्रार्थनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना चाचण्या- मुख्यमंत्री

आज आपण महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना तपासणी केंद्रे सुरू केली आहेत, त्या ठिकाणी आवश्यक तज्ज्ञ-तंत्रज्ञ नियुक्त केले आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना चाचण्या झाल्या आहेत. आज आपण ऑक्सिजन, डायलिसिस मशीन्स, व्हेंटिलेटर्स याची उपलब्धता करण्याबरोबरच प्लाझ्मा थेरपीसाठीही प्रयोगशील आहोत. त्यामुळे आपण कोणत्याही बाबतीत उपचारात मागे नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव, पावसाचे दिवस हे सगळे लक्षात घेऊनच यापुढील काळात कोरोना चाचणी केंद्रांची संख्या अधिक वाढवावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here