शेतकऱ्यांची वीज तोडणी तूर्तास थांबवणार : उर्जामंत्री नितीन राऊत यांची विधानसभेत घोषणा
X
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या वीज तोडणीचा मुद्दावरुन विरोधकांनी संताप व्यक्त केल्यानंतर गरीब शेतकऱ्यांची वीज तोडू नका, असा आग्रह विरोधकांनी केला. त्यानंतर उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी वीज तोडणी तूर्तास थांबवण्याची घोषणा केली.
ठाकरे सरकार (सुलतानी पद्धतीने शेतकऱ्यांची वीज कापतंय, असा आरोप करत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आजच या प्रश्नी शेतकऱ्यांच्या बाजूने घोषणा झाली पाहिजे, असा आग्रह धरला. फडणवीस यांनी उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेची आठवण करून दिली. वीज कनेक्शन कापणार नाही, असे उपमुख्यमंत्री म्हणाले होते, त्याचे काय झाले, असाव सवाल करत शेतकरी कुणालाही माफ करणार नाही, असा इशारा महाविकास आघाडी सरकारला दिला. या प्रश्वावरून विधानसभेत एकच गोंधळ सुरु झाला आणि सभागृहाचं कामकाज स्थगित करावं लागलं.
ज्या प्रकारे सावकार आणि सुल्तानी पद्धतीने हे सरकार वागते आहे, त्या विरोधात आम्ही एल्गार केला. आमची मागणी एकच आहे. स्वतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी मागच्या अधिवेशनात स्पष्टपणे घोषणा केली होती की, मे पर्यंत कोणत्याही शेतकऱ्याची वीज कापली जाणार नाही. मग अधिवेशनात दिलेलं आश्वासन पूर्ण का होत नाही, का ठाकरे सरकार सुलतानी पद्धतीनं वागतंय, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपचे आंदोलन
दुपारी एक वाजता विधानसभेचे कामकाज स्थगित झाल्यानंतर देवेंद्र फडवणीस आणि भाजप नेते बाहेर आले. तेव्हादेखील विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपने हाच मुद्दा लावून धरत आंदोलन केले. सरकार जोपर्यंत यावर चर्चा करत नाही, तोपर्यंत हा मुद्दा आम्ही लावून धरू असं फडणवीस म्हणाले.
शेतकऱ्यांच्या वीज तोडणीवरुन विरोधकांनी गोंधळ घातल्यानंतर विधीमंडळाचे कामकाज तूर्तास स्थगित झाले होते. पाच ते दहा मिनिटांच्या विश्रांतीनंतर कामकाज पुन्हा सुरु झाले. यावेळी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ही मोठी घोषणा केली. ते म्हणाले, तूर्तास महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र सभागृहाच्या प्रत्येक सदस्याला, प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना, संबंधित खासदारांना विनंती केली आहे की, महावितरण कंपनीची आर्थिक अडचण लक्षात घेऊन सर्व वीज ग्राहकांनी सर्वप्रकारच्या महावितरण कंपनीची वीज बिलं वेळेवर फेडावीत, या महावितरण कंपनीला सहकार्य करावं, असं आवाहन त्यांनी विभानसभेत केलं.






