Home > News Update > ठाकरे साहेब किती घटनांच्या चौकश्या करणार?

ठाकरे साहेब किती घटनांच्या चौकश्या करणार?

ठाकरे साहेब किती घटनांच्या चौकश्या करणार?
X

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाल्याने निष्पाप २२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज विरारमधील एका रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. ही आग हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात लागली. या आगीत एक मजला पूर्णपणे खाक झाला आहे. मात्र, या आगीत नंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना अतीव दु:ख, दोषींवर कडक कारवाई केली जाणार, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश, पंतप्रधानांची मृत व्यक्तींना श्रद्धांजली अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध होतील. मृत व्यक्तींना काही लाखांची मदत जाहीर केली जाईल.

मात्र, या घटना पुन्हा होऊ नये म्हणून आपण काय केलं. हॉस्पिटलच्या फ़ायर ऑडीटचं काय झालं? नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती होताच सर्व हॉस्पिटलचा मेटेन्स रिपोर्ट का मागवला गेला नाही. किंवा सर्व हॉस्पिटलचा मेंटन्स चेक करा असे आदेश शासनाने दिले का?. नक्की महाराष्ट्रात काय सुरु आहे. कधी कोव्हिड रुग्णालयाला आग लागते. तर कधी कोव्हिड रुग्णालयातील ऑक्सिजन लिक होतो. या सगळ्या घटनांना जबाबदार कोण? आणि किती घटनांच्या नुसत्या चौकश्या करणार? किती चौकश्यांचे अहवाल आले? या अहवालातून आपण काही धडा घेतला नसेल तर या चौकश्या काय कामाच्या?

काय धडा घेतला?

भंडारा, भांडूपच्या जळीतकांडानंतरही सरकारने काही धडा घेतला नाही का? नागपूरमध्ये खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये अग्नितांडव रूग्णांचा मृत्यू होतो. भांडूपमध्ये 10 रुग्णांचा जळून मृत्यू होतो. कोव्हिड रुग्णालयात महिलांचा विनयभंग होतो. रुग्णालयातच रुग्ण सुरक्षित नसतील तर त्यांनी कुठं जायचं. त्यातच या घटना वारंवार घडत असताना या घटनांमधून आपण काही धडे घेणार आहोत का??

अशा घटना पुन्हा घडूच नयेत. यासाठी योग्य पावलं उचलण्यात ठाकरे सरकारचे हात कोणी रोखले आहेत का? की फक्त चौकश्या लावल्या जातील. दररोज जर महाराष्ट्रात अशा घटना घडल्या तर महाराष्ट्रातले अधिकारी कोव्हीडच्या लढाई पेक्षा चौकश्यांमध्ये व्यस्त होतील. त्यामुळं सरकारने चौकश्या करण्या पेक्षा अशा घटना घडू नये म्हणून कृती करणं गरजेचं आहे.

वसईतील वल्लभ कोव्हिड रुग्णालयातील लागलेली आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळं रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले होते की नव्हते हा प्रश्न उपस्थित होईल. झाले नसतील तर अधिकारी निलंबित होतील. सगळं शांत होतंय तोपर्यंत दुसरी घटना समोर येईल. त्यांचे आदेश दिले जातील. आपण निगरगठ्ठ होऊन बातम्या वाचून शांत बसू. रुग्णाला बेड मिळत नसल्यानं मिळेल त्या हॉस्पिटलला रुग्ण आता दाखल होत आहेत.

त्या हॉस्पिटलच्या बाकी सर्व सुविधा आहेत का? हे पाहिलं जात नाही. किंबहुना या महामारीच्या काळात हे पाहणं शक्य होत नाही. मात्र, आता रुग्णांच्या नातेवाईकांनी सरकार च्या भरवश्यावर न बसता हॉस्पिटलचं फायर ऑडीट झालंय का? मेटेन्स झालाय का? हे पाहणं गरजेचं आहे. किंबहुना या सर्व हॉस्पिटलने सदर रुग्णालयाच्या बाहेर या संदर्भात सर्वांना दिसेल अशा दर्शनी ठिकाणी हॉस्पिटलच्या मेटेन्सची माहिती द्यायला हवी. चौकश्या तर सुरुच राहतील, राजकारण्यांना अतीव दु:ख तर होईल. मात्र, गेलेले जीव परत येणार नाहीत. त्यासाठी चौकश्यांपेक्षा कृती करण्याची गरज आहे.

Updated : 23 April 2021 4:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top