Home > News Update > कोणी काय खावं? जेएनयूमध्ये राडा...

कोणी काय खावं? जेएनयूमध्ये राडा...

कोणी काय खावं? जेएनयूमध्ये राडा...
X

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) रविवारी रात्री दोन विद्यार्थी संघटनांमध्ये झालेल्या संघर्षात १६ विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी झालेले विद्यार्थी जेएनयू विद्यार्थी संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या दोन संघटनेचे आहेत. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

जेएनयू स्टुडंट्स युनियन, एसएफआय, बीएसएफ आणि एआयएसएने दिलेल्या तक्रारीच्या आधारे एबीव्हीपीच्या अज्ञात विद्यार्थ्यांविरुद्ध विविध कलमांखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुरावे गोळा करत असून आरोपींची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी रविवारी रात्री दिल्ली पोलिस मुख्यालयात डाव्या विद्यार्थी संघटनांनी निदर्शनेही केली.

जेएनयूच्या कावेरी वसतिगृहात अनेक मुली जखमी झाल्या आहेत. जेएनयूमध्ये यापूर्वीही अभाविप समर्थक विद्यार्थी आणि डावे संघटनांच्या विद्यार्थ्यामध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

एबीव्हीपीच्या नेत्यांनी रविवारी रामनवमीच्या दिवशी कोणत्याही वसतिगृहात मांस दिले जाणार नाही. अशी भूमिका घेतली होती. मांस पुरवठादाराला अशा कोणत्याही नोटीसची माहिती नव्हती. मांस विक्रेते हे मांस घेऊन कावेरी वसतिगृहाच्या मेसमध्ये पोहोचले असता अभाविपचे नेते तेथे पोहोचले होते.

त्यानंतर डावे समर्थक विद्यार्थीही तेथे आले आणि त्यांनी अभाविप नेत्यांच्या गदारोळाचा निषेध केला. यानंतर कावेरी हॉस्टेलजवळ काही मुलींना मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेच्या शेअर केलेल्या फोटोमध्ये अनेक विद्यार्थिनींच्या डोक्यातून रक्त टपकताना दिसत आहे.


जेएनयूमध्ये रविवारी मांसाहार आणि शाकाहारी पदार्थ तयार केले जातात. मात्र, आज मांसाहार केला जाणार नाही, असा इशारा अभाविपने दिला होता. अभाविपचे म्हणणे आहे की, आम्ही कावेरी वसतिगृहात पूजेचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र रामनवमीच्या पूजेचा अनादर करण्यासाठी तेथील मेसमध्ये मांस मागवण्यात आले. ABVP समर्थक मते काही लोक एक दिवस मांस खाणे बंद करू शकत नाहीत का? असा सवाल एबीव्हीपी ने केला आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून जेएनयू मध्ये होत असलेल्या वादांमुळे शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेलं जेएनयू विद्यापीठ आता या वादामुळे बदनाम झालं आहे.

Updated : 11 April 2022 10:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top