ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा, देऊन रुग्णांची लूट थांबणार का?

213

कोविड-19 च्या काळात रुग्णांसाठी अत्यावश्यक अशा ऑक्सिजनची कमतरता असल्याचं वारंवार माध्यमांमधून समोर येतं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात ऑक्सिजन ची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार या वाहनांना रुग्णवाहिकेसारखा दर्जा देण्याची अधिसूचना गृह विभागाने आज जारी केली आहे.

त्यामुळे आता वैद्यकीय ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या या वाहनांवर सायरन असणार. तसेच या वाहनांची वाहतूक रोखता येणार नाही. कोविड-19 रुग्णांवर वेळेत उपचार करण्यासाठी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन वायूचा पुरवठा सहजपणे उपलब्ध व्हावा. यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 (2005 चा.53) चे कलम 38 चे उप कलम (1) आणि उपकलम (2) मधील खंड (एल) आणि साथ रोग अधिनियम- 19871897 चा 3) चे कलम 2 अन्वये यासाठी या वाहनांना रुग्णवाहिका चा दर्जा देण्यात आला आहे.

त्यानुसार आपत्ती काळात पुढील एक वर्षासाठी वैद्यकीय कारणास्तव वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिजन वायूची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिका समकक्ष वाहन तसेच आपत्ती व्यवस्थापन कर्तव्यार्थ वाहन म्हणून समजण्यात येणार आहे.  अशा वाहनांना केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 108 च्या उप नियम (7) तसेच नियम 119 च्या उप नियम (3) च्या तरतूदी लागू करण्यात येत आहे, असे गृह विभागाने काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.

दरम्यान या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा दिल्याने ऑक्सिजन हॉस्पिटल पर्यंत पोहोचेल खरा, मात्र, ऑक्सिजनच्या नावाखाली, इतर सुविधांच्या नावाखाली खासगी रुग्णालयात रुग्णांची होणारी लूट कशी थांबणार? असा सवाल आता उपस्थित होतो.

Comments