Home > News Update > काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य, आणि जिगरबाज मयूर शेळके

काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य, आणि जिगरबाज मयूर शेळके

काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य, आणि जिगरबाज मयूर शेळके
X

सध्या सोशल मीडियावर एका रेल्वे स्टेशनच्या फलाटावरून एका तरुणाने वाचवल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओ बाबत सामाजिक कार्यकर्ते समीर गायकवाड यांनी फेसबूक पोस्टद्वारे माहिती दिली आहे.

वांगणी स्टेशनवर शनिवारी संध्याकाळी पाच वाजून तीन मिनिटांनी एक मुलगा आपल्या अंध आईसोबत प्लॅटफॉर्मवर चालत होता. पण चालत असताना त्या लहानग्याचा तोल गेला आणि तो मुलगा ट्रॅकवर पडला. लहान मुलगा जेव्हा रेल्वेच्या ट्रकवर पडला नेमक्या त्याच वेळेला उदयन एक्सप्रेस त्या मुलाच्या दिशेने येत होती. त्या मुलाची अंध आई आपला मुलगा नेमका कुठे पडला हे चाचपडत होती. बिचारी कावरी बावरी झाली होती. तिला कळेना की नेमका तो कुठे पडला असावा. त्याच वेळी स्टेशनच्या दिशेने उदयन एक्सप्रेसचा धडधड आवाज वेगाने वाढत होता.

तो लहानगा अजून सावरला पण नव्हता आणि ट्रेनही जवळ येत होती. तो मुलगा प्लॅटफॉर्मवर चढायचा प्रयत्न करत होता, पण प्लॅटफॉर्मची उंची जास्त असल्याने तो वर चढू शकत नव्हता. तितक्यात एक व्यक्ती जिवाच्या आकांताने त्या मुलाच्या दिशेने धावत गेली.

ती व्यक्ती आपल्या जिवाची पर्वा न करता त्या मुलापर्यंत पोहोचली. पटकन त्याने मुलाला उचललं आणि प्लॅटफॉर्मवर फेकून दिलं आणि तो स्वतः विजेच्या गतीने प्लॅटफॉर्मवर चढला. तो व्यक्ती म्हणजे रेल्वेचा पॉइंटमन मयूर शेळके. मयूर कर्तव्यावर होता. त्याही परिस्थितीत त्याने आपल्या हातातील हिरवा झेंडा सोडला नाही.

मयूर हा पॉईंटमन आहे. पॉईंटमन म्हणजे ट्रेनला पुढे जाण्यासाठी ट्रॅक सुरक्षित आहे म्हणून हिरवा झेंडा दाखवण्याचं काम असो की, जिथे ट्रॅक एकमेकांत गुंतलेले असतात तिथे सगळं आलबेल आहे हे पाहण्याचं काम करतात. मयूर नसता तर त्या मातेने आपल्या मुलाला कायमचं गमावलं असतं. मोठा अपघात आणि दुर्दैवी घटना होण्यापासून मयूर शेळकेने वाचवलं. मयूर शेळकेच्या धैर्याला सलाम !

मयूर हा खराखुरा हिरो आहे, मयूर नसता तर त्या मुलाला वाचवले कठीण झालं असतं. कदाचित मयूरचा स्वतःचाही या झटापटीत जीव गेला असता किंवा त्याला अपंगत्व आलं असतं. पण या सगळ्याची पर्वा न करता त्याने त्याला वाचवलं. मयूरचे काम इतरांसाठीही आदर्श घेण्यासारखे आहे.

देव असला तर माणसातच असतो हे अशा घटनांतून अधिक प्रकर्षाने जाणवतं...

असं समीर गायकवाड यांनी त्यांच्या फेसबूक पोस्ट मध्ये म्हटलं आहे.

Updated : 19 April 2021 8:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top