Home > Top News > मोदी सरकारच्या मंत्र्याच्या मुलाने चालवली आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी? तीन शेतकऱ्यांचा मृत्यू

मोदी सरकारच्या मंत्र्याच्या मुलाने चालवली आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी? तीन शेतकऱ्यांचा मृत्यू

मोदी सरकारच्या मंत्र्याच्या मुलाने चालवली आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी? तीन शेतकऱ्यांचा मृत्यू
X

उत्तर प्रदेशातील लखीमपूर जिल्ह्यात मोठा हिंसाचार उफाळून आला आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने उत्तर प्रदेशमधील लखीमपूरमध्ये आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी चालवल्याचा आरोप केला जात आहे. यामध्ये 3 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा भारतीय किसान युनियन ने केला असून त्यानंतर या भागात काही संतप्त शेतकऱ्यांनी जाळपोळ केल्याचंही वृत्त समोर आलं आहे.

आज रविवार, 3 ऑक्टोबर ला लखीमपूर-खेरी येथे, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य लखीमपूर-खेरी येथील काही प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार होते. त्यानंतर त्यांना केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचे मूळ गाव बनबीरपूरला जायचे होते. उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाची माहिती मिळताच शेतकरी नेते काळे झेंडे दाखवण्यासाठी अजयकुमार मिश्रा यांच्या गावात पोहोचले होते. मात्र, केशव मौर्य यांच्या आगमनापूर्वीच भाजपच्या काही नेत्यांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये वाद झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी उपस्थित असलेल्या भाजप नेत्यांनी शेतकऱ्यांवर गाडी घातली. या अपघातात अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. भाजप नेत्यांच्या या कृत्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तेथे उभ्या असलेल्या अनेक वाहनांना आग लावली. गोंधळ पाहता घटनास्थळी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

घटनास्थळी पोलिस अधिकारी पोहोचले आहेत. या घटनेनंतर स्थानिक अधिकारी बोलण्याचे टाळत आहेत.

तीन शेतकऱ्यांचा मृत्यू

दुसरीकडे, भारतीय किसान युनियनने या अपघातात 3 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. परंतु जिल्हा प्रशासनाने अद्याप याला दुजोरा दिलेला नाही. भारतीय किसान युनियनने ट्विट करून केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मुलावर कार चालवल्याचा आरोप केला आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत गाझीपूरहून लखीमपूर-खेरीला रवाना झाले आहेत.

राज्यमंत्र्याच्या मुलाने चालवली गाडी...

केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाने शांततेत कृषी कायद्याला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पायदळी तुडवणे हे अत्यंत अमानवी आणि क्रूर कृत्य आहे. अशा शब्दात अखिलेश यादव यांनी निशाणा साधला आहे.

माध्यमांनी प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार उपमुख्यमंत्री मार्ग बदलून अजय मिश्रा टेनी यांच्या निवासस्थानी गेले, मात्र, काही काळानंतर अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा टेनी, त्याच्या 4-5 जोडीदारांसोबत 80-90 च्या वेगाने गाडी चालवत शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणावरून गेला. यावेळी आशिष टेनीच्या गाडीने तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, तर काही लोक जखमीही झाले. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी अजय मिश्रा टेनीच्या मुलाची गाडी पेटवली.

सध्या या ठिकाणचा तणाव पाहता येथील इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच स्वत: ला आपण 'पॉवरफुल'' ''ठिकाण्यावर लावणारा नेता सांगत शेतकऱ्यांना ठीक करण्याचा दावा टेनी मिश्रा यांनी केला होता. त्यावरून देखील शेतकऱ्यांमध्ये रोष पाहायला मिळत आहे.


Updated : 4 Oct 2021 7:23 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top