महागाईवरील प्रश्नामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भडकले, पत्रकाराला दिली शिवी
X
जनतेच्या मुलभूत प्रश्नांवर आणि राज्यकर्त्यांना अडचणीचे ठरतील असे प्रश्न विचारले तर राजकारण्यांचा तोल कसा सुटतो हे आपण नेहमी पाहतो. असाच प्रकार जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याबाबतही घडला आहे. जो बायडेन यांनी एका पत्रकार परिषदेत पत्रकाराला शिवी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
जो बायडेन यांच्या आधीचे अमेरिकेचे अध्यक्ष डोलान्ड ट्रम्प आणि अमेरिकेन मिडीयाचा संघर्ष कायम चर्चेत असायचा. पण बायडेन यांची प्रतिमा मात्र वेगळी आहे. त्यांचे मीडियाशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पण तरीही सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जो बायडेन यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा प्रकार घडला. जो बायडेन यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर सर्व पत्रकार बाहेर पडत होते, पण त्यावेळी फॉक्स न्यूजच्या पीटर डूसी या पत्रकाराने वाढत्या महागाईबाबत त्यांना सवाल विचारला. यावेळी त्याच्या उत्तराने संतापलेल्या जो बायडेन यांनी पुटपुटत उत्तर दिले. पण त्यांचा मायक्रोफोन यावेळी सुरू असल्याने त्यांचा आवाज रेकॉर्ड झाला, यामध्ये त्यांनी त्या पत्रकाराला उत्तर देत "महागाई ही तर असेट आहे, सन ऑफ ए बीच" असे म्हटले.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जो बायडेन यांनी संबंधित पत्रकाराला फोन करुन आपण वैयक्तिक कुणावर टिप्पणी केली नाही, असे सांगून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान त्यावेळी जो बायडेन काय बोलले ते आपल्याला ऐकू आले नाही आणि लगेचच त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी आम्हाला बाहेर जायला सांगितले, पण नंतर तो व्हायरल व्हिडिओ आपण पाहिला, असे पीटर डूसी या पत्रकाराने सांगितले आहे. तसेच जो बायडेन यांनी आपल्याला फोन करुन आपण वैयक्तिक टिप्पणी केली नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे, असेही डूसी याने फॉक्स न्यूजच्या लाईव्ह कार्यक्रमात सांगितले.