Home > News Update > फ्रान्समधील हल्ले आणि जागतिक राजकारण

फ्रान्समधील हल्ले आणि जागतिक राजकारण

मोहम्मद पैगंबर यांच्या वादग्रस्त कार्टून प्रकरणामुळे फ्रान्समध्ये काही हल्ले झाले आहेत. पण याचे पडसाद आता सर्व इस्लामिक राष्ट्रांमध्ये उमटू लागल्याने त्याचे परिणाम जगाच्या राजकारणावर होणार आहेत.

फ्रान्समधील हल्ले आणि जागतिक राजकारण
X

फ्रान्समध्ये गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांमुळे पुन्हा एकदा मुस्लिम देश विरुद्ध फ्रान्स असा संघर्ष निर्माण झाला आहे. मोहम्मद पैगंबर यांचे वादग्रस्त कार्टून शाळेत दाखवले म्हणून एका शिक्षकाची विद्यार्थ्याने गळा चिरुन हत्या केल्यानंतर फ्रान्समध्ये वातावरण तापले आहे. यानंतर फ्रान्स सरकारने देशातील मुस्लिम संघटनांविरोधात कारवाईला सुरूवात केली आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यनुएल मॅक्रॉन यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या वादग्रस्त कार्टूनप्रकरणी माफी मागण्यास नकार देत हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विषय असल्याचे म्हटल्याने अनेक मुस्लिम राष्ट्रांमध्ये फ्रान्सविरोधात निदर्शने केली जात आहेत. दोनच दिवसांपूर्वी फ्रान्समधील एका चर्चमध्ये हल्लेखोराने एका महिलेचे शिर धडापासून वेगळे करत आणखी दोघांची हत्या केली. या हल्ल्याच्या वेळी त्याने अल्ला हू अकबर अशा घोषणा दिल्याचा दावा फ्रान्सच्या पोलिसांनी केला आहे.


मोहम्मद पैगंबरांच्या कार्टूनचा वाद काय आहे?

या संपूर्ण घटनाक्रमाला महंमद पैगंबर यांच्या वादग्रस्त कार्टूनची पार्श्वभूमी आहे. मोहम्मद पैगंबर यांचे वादग्रस्त कार्टून काही वर्षांपूर्वी डेन्मार्कमधील एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर जगभरातील मुस्लिम देशांमध्ये आणि मुस्लिम समाजामध्ये त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली होती आणि हिंसक आंदोलने झाली होती. फ्रान्समधल्या शार्ली हेब्दो'या नियतकालिकाने पुन्हा एकता ते वादग्रस्त व्यंगचित्र छापले. याची संतप्त प्रतिक्रिया पुन्हा एकदा मुस्लीम जगात उमटली. शार्ली हेब्दो'नियतकालिकाला धमक्याही देण्यात आल्या होत्या. त्यानंतर या वृत्तपत्राच्या ऑफिसमध्ये घुसून दोन जणांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात १२ कर्मचारी मृत्यूमुखी पडले होते. मुस्लीम समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या मोहम्मद पैगंबर यांना कोणत्याही दृष्य स्वरुपात दाखवणे निषिद्ध मानले आहे. या हल्ल्यानंतर फ्रान्समध्ये मुस्लिम समाजाविरोधात तीव्र संताप निर्माण झाला होता.

शिक्षकाच्या शिरच्छेदाचे कारण काय?

दरम्यान शार्ली हेब्दोवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींविरोधात फ्रान्समध्ये खटला सुरू झाल्यानंतर शार्ली हेब्दोने ते वादग्रस्त कार्टून पुन्हा छापले. यावर प्रतिक्रिया देताना फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यनुएल मॅक्रॉन यांनी कार्टून पुन्हा प्रसिद्ध केल्याचा निषेध करण्यास नकार दिला. फ्रान्समध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, असे त्यांनी म्हटले. त्यानंतर काही दिवसांनी पॅरिसमधील एका उपनगरात एका शिक्षकाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उदाहरण देण्यासाठी वर्गात विद्यार्थ्यांना मोहम्मद पैगंबरांचे ते वादग्रस्त कार्टून दाखवले. त्यामुळे संतप्त झालेल्या चेचेन वंशाच्या एका 18 वर्षीय विद्यार्थ्याने त्या शिक्षकाचा शिरच्छेद केल्यानंतर वातावरण पुन्हा पेटले.

वादग्रस्त वक्तव्य आणि तीव्र पडसाद

एकीकडे वातावरण तापलेले असताना "फ्रेंच लोकांना मारण्याचा मुस्लिमांना अधिकार आहे", असे ट्विट मलेशियाचे माजी पंतप्रधान महातिर मोहम्मद यांनी केल्याने वातावरण आणखी तापले. इस्लामिक राष्ट्रात फ्रान्सविरोधात संतापाची लाट आहे.

पाकच्या नागरिकांना फ्रान्समध्ये बंदीची मागणी

पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये तर लोक फ्रान्सविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. बांगलादेशमध्ये फ्रान्सच्या उत्पादनांवर बंदीची मागणी होते आहे. तर पाकिस्तानमध्ये आंदोलकांनी दगडफेक केल्याने पोलिसांना अश्रूधूर सोडून आंदोलकांना पांगवण्याची वेळ आली. दरम्यान फ्रान्समधील नॅशनल रॅली पार्टीच्या मरीन ला पेन यांनी पाकिस्तानी नागरिकांना फ्रान्समध्ये बंदी घालण्याची मागणी केली आहे.

भारतात पडसाद, मुंबईत आंदोलन

फ्रान्समधील नीस शहरात चर्चमध्ये घुसून हल्लेखोराने ३ जणांची निर्घृण हत्या केली. तसंच त्याआधी एका शिक्षकाचे शिर कापण्यात आले. यामुळे फ्रान्स सरकारने धर्मांध मुस्लिमांविषयी कडक भूमिका घेत कारवाईला सुरूवात केली. त्याच्या निषेधार्थ मुंबईत रझा अकदामीने भेंडी बाजारमध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅनुएल मॅक्रॉन यांचे पोस्टर्स रस्त्यांवर टाकले. त्यावरुन वाहने जात होती. या मुद्द्यावरुन भाजपने महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. सांबित पात्रा यांनी ट्विट करत "महाराष्ट्रात हे काय चाललं आहे? जो जिहाद फ्रान्समध्ये सुरू आहे, त्या विरोधात भारत फ्रान्ससोबत असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितेल आहे. मग मुंबईच्या रस्त्यांवर फ्रान्सच्या अध्यक्षांचा अपमान का केला जातोय? असा सवाल त्यांनी विचारला आहे.





दरम्यान फ्रान्सने विविध देशांमधील दुतावासांची सुरक्षा वाढवण्यास सांगितले आहे. तसेच विविध देशांमधील फ्रेंच नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुसरीकडे फ्रान्समध्ये अल्पसंख्याक असलेल्या मुस्लिम समुदायाविरोधात झालेल्या गुन्ह्यांचा पाठपुरावा करणाऱ्या Collective Against Islamophobia in France (CCIF) या संघटनेवर बंदीचा प्रस्ताव फ्रान्सच्या गृहमंत्र्यांनी मांडल्याने मुस्लिम समाजामध्ये भीतीचे वातावरण असल्याचे वृत्त अल जजीरा या वृत्त वाहिनेने दिले आहे.

Updated : 31 Oct 2020 12:39 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top