#UkraineRussia : रशियाच्या हल्ल्यात १३७ जणांचा मृत्यू
X
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत १३७ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १० लष्करी अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे, अशी माहिती युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमीर झेलेन्स्की यांनी दिली आहे. तसेच ३१६ जण आतापर्यंत जखमी झाले आहेत. तसेच शुक्रवारी सकाळी रशियन फौजांनी युक्रेनची राजधानी कीव शहरात प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे कीव शहरावरुन जाणारे रशियान लष्करी विमान पाडल्याचा दावा युक्रेनने केला आहे. दरम्यान युक्रेनने १८ ते ६० वर्षांच्या आतील व्यक्तींना देश सोडून जाण्यास बंदी घातल्याचेही वृत्त काही माध्यमांनी दिले आहे.
तर दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाची आर्थिक कोंडी करण्यासाठी मोठा निर्णय जाहीर केले आहेत. रशियन बँकांची अमेरिकेतील मालमत्ता गोठवण्यात आली आहे. तसेच रशियाने जर नाटोचे सदस्य असलेल्या देशांमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तर अमेरिका त्याला जशास तसे उत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांना समजवावे असे आवाहन युक्रेनने केले होते. या दरम्यान गुरूवारी रात्री पंतप्रधान मोदी यांनी पुतीन यांच्याशी फोनवरुन संवाद साधला आणि रशिया तसेच नाटोमधील वाद चर्चेतून शांततेच्या मार्गाने सुटू शकतो, असे आवाहन केले आहे.