News Update
Home > मॅक्स रिपोर्ट > ...अन्यथा मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची पूजा करू देणार नाही

...अन्यथा मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची पूजा करू देणार नाही

...अन्यथा मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची पूजा करू देणार नाही
X

उजनी धरणाच्या पाणी प्रश्नावरून सोलापूर जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून मंजूर झालेली पाणी योजना रद्द नाही केल्यास येत्या आषाढी वारीला मुख्यमंत्र्यांना विठ्ठल मंदिरात पाऊल ठेवू देणार नाही. अशी भूमिका जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर (भैया) देशमुख यांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी आषाढी वारीला विठ्ठलाच्या पूजेला येत असताना इंदापूर तालुक्याला पाणी देण्याची मंजूर केलेली योजना रद्द करूनच यावे. आम्ही त्यांचा सन्मान करू, मुख्यमंत्र्यांनी याबाबत शिवसेनेचे संपर्कप्रमुख आणि सोलापूर जिल्ह्याच्या दोन्ही विभाग प्रमुखांशी अधिक चर्चा करून ही योजना रद्द करावी.

उजनी धरणातील पूर्ण पाण्याचे वाटप झाले असताना सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी इंदापूरला पळविले जात आहे. सुप्रिया सुळे यांचा मतदारसंघ सुरक्षित ठेवण्यासाठी हा सर्व घाट घातला जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील सिंचन योजना अपूर्ण आहेत. मंगळवेढा तालुक्यातील 35 गावाचा पाणी प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. मंगळवेढा तालुक्याला पाणी देण्याची योजना मंजूर असतानाही त्यांना पाणी दिले जात नाही. उजनी धरणावर सोलापूर जिल्ह्याची तहान भागत नसताना मंजूर केलेली योजना रद्द करण्यात यावी,अन्यथा येत्या आषाढी वारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विठ्ठलाची पूजा करू देणार नाही. अशी भूमिका जनहित शेतकरी संघटनेने घेतलेली आहे. त्यामुळे येत्या काळात उजनीचा पाणी प्रश्न अधिक पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर पाणी पळविल्याचा होतोय आरोप

सोलापूर जिल्ह्यात उजनी धरणातील पाणी पळविल्याच्या निषेधार्थ सर्वच राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटनांच्या वतीने आंदोलने करण्यात येत आहेत. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांच्यावर उजनी धरणातील पाणी पळवून नेहल्याचा आरोप होत आहे. पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांच्या आडून बारामतीकर डाव खेळत असल्याच्या चर्चांना सध्या सोलापूर जिल्ह्यात उधाण आले असून तसा आरोप ही करण्यात येत आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी दररोज उजनी धरणातून पाणी पळविल्याच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन,धरणे आंदोलन सुरू आहेत.

पालकमंत्र्यांना पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उजणीचे पाणी पळवून नेत असल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत इंदापूरला पाणी देऊ द्यायचे नाही असा निर्धार सोलापूर जिल्ह्यातील राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटनानी केला आहे. यापूर्वी ही उजनी धरणातून इंदापूर तालुक्याला पाणी देण्याची योजना मंजूर करण्यात आली होती. सोलापूर जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांनी त्यावेळी आंदोलने,मोर्चे करून ती योजना रद्द केली होती. परंतु परत दुसऱ्यांदा लाकडी निंबुडी येथून इंदापूर तालुक्याला वाढीव पाणी देण्याची योजना मंजूर करण्यात आली आहे.

त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात सध्या पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांच्या विरोधात आंदोलन,मोर्चे सुरू आहेत. राज्य सरकारने लाकडी निंबुडी योजनेला दिलेले वाढीव पाणी थांबवावे आणि मंजूर केलेली योजना रद्द करावी. अशी मागणी आंदोलकांची आहे. उजनी धरणाच्या पूर्ण पाण्याचे वाटप झाले असताना लाकडी निंबुडी योजनेला वाढीव पाणी आणले कोठून असा सवाल आंदोलक विचारत आहेत. या योजनेसाठी सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे पाणी नेहण्यात येत असल्याने सध्या सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांत असंतोष आहे. उजणीचे पाणी इंदापूर ला दिल्यास सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या योजनेला राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटना विरोध करत आहेत.

उजनी धरणाच्या पाणी प्रश्नावरून 2013 साली अजित पवार यांना द्यावा लागला होता राजीनामा

2013 साली सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी परस्थिती भयावह झाली होती. त्यावेळी सोलापूर जिल्ह्याच्या पाणीप्रश्ननावरून जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांनी मुंबई येथील आझाद मैदान येथे तब्बल 121 दिवस आंदोलन केले होते. 2013 साली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार होते. त्यावेळी त्यांनी उजनी धरणाच्या पाण्यावरून बेताल वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. याही वेळेस उजनीच्या पाणी प्रश्नावरून जनहित शेतकरी संघटना आक्रमक झाली असून येत्या आषाढी वारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विठ्ठलाची पूजा करू देणार नाही,अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसेना काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, बार्शी,माढा, करमाळा, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट,सांगोला तालुक्यातील सिंचन योजना अपूर्ण

महाराष्ट्रातील मोठ्या धरणांपैकी उजनी धरण एक आहे. यामध्ये जास्त प्रमाणात पाणी साठवले जाते. या धरणात येणारे सर्व पाणी पुणे जिल्ह्यातून येते. सुरुवातीच्या काळात उजनी धरणाची निर्मिती फक्त सोलापूर जिल्ह्याचा पाणी प्रश्न मिटवा यासाठी करण्यात आली होती, असे सांगण्यात येते. उजनी धरण सोलापूर जिल्ह्यात असून ही 'धरण उशाला कोरड सोलापूर जिल्ह्याच्या घशाला' अशी म्हणण्याची वेळ सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांवर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बराच भाग दुष्काळी म्हणून गणला जातो. मंगळवेढा तालुक्यातील 35 गावचा पाणी प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. तेथील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून पाण्यासाठी आंदोलने करीत आहेत. पण त्यांचा पाण्याचा प्रश्न काही मिटेना गेला आहे. तसेच जिल्ह्यातील बार्शी,करमाळा,दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, सांगोला या तालुक्यांना पाण्याच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील अनेक सिंचन योजना अपूर्ण आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे पाणी इंदारपूर तालुक्याला देण्याची योजना मंजूर झाल्याने सध्या सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांच्या विरोधात आंदोलने सुरू आहेत. मंजूर केलेली पाणी योजना रद्द करण्याची मागणी सोलापूर जिल्ह्यात जोर धरू लागली आहे.

...अन्यथा मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची पूजा करू देणार नाही

मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना प्रभाकर भैया देशमुख यांनी सांगितले,की सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मनमानी कारभार करून उजनी धरणातील 5 टीएमसी पाणी गेल्या वर्षी सुद्धा इंदापूर तालुक्याला नेहण्याचा प्रयत्न केला होता. जनहित शेतकरी संघटना आणि इतर संघटनांनी आंदोलने केल्यानंतर ही योजना रद्द करण्यात आली होती. पाणी पळविण्याचा प्रकार शरदचंद्र पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सांगण्यावरून केला जात आहे. योजना रद्द झाली असतानाही परत इंदापूर तालुक्याला 2 टीएमसी पाणी देण्याची योजना मंजूर करण्यात आली आहे. पालकमंत्र्यांना खासदार सुप्रिया सुळे यांचा मतदार संघ सुरक्षित ठेवायचा आहे. त्यामुळेच पाणी पळविण्याचा घाट घातला जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनेक सिंचन योजना अपूर्ण आहेत.

मंगळवेढा तालुक्याचा पाणी प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. त्यामुळे उजनीचे पाणी इंदापूर तालुक्याला देण्यात येवू नये. याबाबत सोलापूर जिल्ह्यातील आमदारांनी आवाज उठवावा. अन्यथा त्यांच्या ही गाड्या अडवल्या जातील. मुंबईतून पंढरपूरला विठ्ठलाच्या पूजेला येत असताना मुख्यमंत्र्यांनी उजनी धरणातील पाणी नेहण्याची योजना रद्द करूनच यावे. जिल्ह्यातील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून पाणी नेहण्याची योजना रद्द नाही झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विठ्ठलाच्या मंदिरात पाऊल ठेवू देणार नाही. अशी भूमिका प्रभाकर भैया देशमुख यांनी बोलताना मांडली.


Updated : 2022-06-15T19:56:23+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top