Home > Election 2020 > 'हिंदुस्थानातही 'बुरखा' तसेच 'नकाब' बंदी करा', उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी

'हिंदुस्थानातही 'बुरखा' तसेच 'नकाब' बंदी करा', उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी

हिंदुस्थानातही बुरखा तसेच नकाब बंदी करा, उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी
X

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशात बुरखा किंवा नकाब परिधान करण्यावर बंदीची मागणी केली आहे. श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून हिंदुस्थानातही ‘बुरखा’ तसेच ‘नकाब’ बंदी करावी, अशी मागणी शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. राष्ट्रहितासाठी ही मागणी करत असल्याचं शिवसेनेनं आजच्या ‘सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

''फेस मास्क किंवा इतर साधनांनी चेहरा झाकणाऱ्या व्यक्ती राष्ट्रीय आणि सामाजिक सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा नकाब परिधान करणे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य ठरेल, असे जाहीर करून श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल यांनी साहस व धैर्याचे दर्शन घडवले. रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार? असा सवाल करत फ्रान्समध्येही दहशतवादी हल्ला होताच तेथील सरकारने बुरखा बंदी केली. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियात व ब्रिटनमध्येही हेच घडले आहे. मग याबाबतीत हिंदुस्थान मागे का? पंतप्रधान मोदी आज अयोध्येला निघाले आहेत, म्हणूनच हा प्रश्न’’, असं म्हणत देशात ‘बुरखा’ तसेच ‘नकाब’ बंदी करावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

'श्रीलंकेत भीषण बॉम्बस्फोट झाले असले तरी हिंदुस्थानला त्याचे हादरे बसले आहेत. शेजारधर्म तर आहेच, पण लंकेशी आपले धार्मिक आणि भावनिक संबंधदेखील आहेत. सरकारी आकडा काहीही असला तरी कोलंबोतील बॉम्बस्फोट मालिकेत पाचशेहून जास्त निरपराध्यांचा बळी गेला आहे. लिट्टेच्या दहशतवादातून मुक्त झालेला हा देश आता इस्लामी दहशतवादाचा बळी ठरला. हिंदुस्थान, विशेषतः हिंदुस्थानचा जम्मू आणि कश्मीर प्रांत त्याच इस्लामी दहशतवादाने त्रस्त आणि जर्जर झाला आहे. प्रश्न इतकाच आहे की, श्रीलंका, फ्रान्स, न्यूझीलंड आणि ब्रिटनसारखी राष्ट्रे जी कठोर पावले उचलतात तशी पावले आपण कधी उचलणार? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनातून विचारला आहे.

आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो…

विद्यमान सरकारने ‘ट्रिपल तलाक’विरोधात कायदा करून पीडित मुस्लिम महिलांचे शोषण वगैरे थांबवले हे मान्य, पण भीषण बॉम्बस्फोटांनंतर श्रीलंकेत बुरखा आणि नकाबसह चेहरा झाकणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर बंदी घालण्यात आली आहे. एक तर असंख्य मुस्लिम तरुणींना बुरखा झुगारायचा आहेच व दुसरे म्हणजे बुरख्याआडून नेमके काय सुरू असते याचा अंदाज येत नाही.राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला असल्याचे राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांनी जाहीर केले. आम्ही या निर्णयाचे स्वागत करीत आहोत व पंतप्रधान मोदी यांनीही श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून हिंदुस्थानातही ‘बुरखा’ तसेच ‘नकाब’ बंदी करावी, अशी मागणी राष्ट्रहितासाठी करीत आहोत’.

भ्रमात किंवा अंधश्रद्धेत येथील मुसलमान…

'बुरख्यांचा वापर करून देशद्रोह, दहशतवाद घडवला जात असल्याची उदाहरणे समोर आली. तुर्कस्तान हे तसे इस्लाम मानणारे राष्ट्र, पण केमाल पाशाला बुरख्याआड काही घडत असल्याचा संशय येताच त्याने त्याच्या देशात मुसलमानी तरुणांची दाढी व बुरख्यांवर बंदी आणलीच होती. मुळात बुरख्याचा इस्लामशी काडीमात्र संबंध नाही व हिंदुस्थानातील मुसलमान अरबस्तानातील समाजव्यवस्थेचे अनुकरण करीत आहेत. अरबस्तानातील वाळवंट व उन्हांच्या तप्त झळांपासून बचाव करण्यासाठी महिलांनी चेहरा झाकून बाहेर पडण्याची प्रथा कधीकाळी पडली. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चढतो तेव्हा सायकल, स्कूटरवरून प्रवास करणार्‍या तरुणी चेहर्‍यास ओढणी किंवा रुमाल गुंडाळूनच बाहेर पडतात. पण हे तेवढ्यापुरतेच असते. मात्र ‘नकाब’ किंवा ‘बुरखा’ घालणे हा जणू कुराणाचा आदेश आहे अशा भ्रमात किंवा अंधश्रद्धेत येथील मुसलमान वावरत आहेत’, असं म्हणत ‘नकाब’ किंवा ‘बुरखा’ घालणे ही एक अंधश्रद्धा असल्याचं ठाकरे यांनी म्हटलं आहे.

'बहुपत्नी प्रथेला कोणी विरोध केला किंवा सक्तीच्या कुटुंबनियोजनाची भाषा केली, ट्रिपल तलाक आणि बुरखा बंदीविरोधात कोणी आवाज उठवला तर इस्लाम संकटात आल्याची बांग मारली जाते. खरे म्हणजे मुसलमानांना त्यांचाच धर्म नीट समजलेला नाही असाच त्याचा अर्थ. (अर्थात काही हिंदूंच्या बाबतीतही तेच म्हणावे लागेल.) ‘राष्ट्र नंतर, आधी धर्म’ हा मुसलमान समाजाचा प्राधान्यक्रम आहे. पुन्हा हा धर्मदेखील फालतू रूढी-परंपरांच्या बेड्यात अडकलेला आहे. मुसलमानांत कोणी फुले, शाहू निर्माण झाले नाहीत. किंबहुना होऊ दिले गेले नाहीत. त्यामुळे शहाबुद्दीन, आझम खान, ओवेसी बंधू व अबू आझमी या धर्मांध माथेफिरू नेत्यांचे फावले. ही धर्मांधता व त्यांच्यातील रूढी, परंपरा राष्ट्रीय सुरक्षेच्या आड येत असतील तर त्या मोडून काढल्या पाहिजेत. मोदी यांनी हे सर्व करून घेतले पाहिजे. सर्जिकल स्ट्राइकइतकेच हे कार्य धाडसाचे आहे’. असं आजच्या ‘सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

Updated : 1 May 2019 3:26 AM GMT
Next Story
Share it
Top