Home > News Update > एस.टी.कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण

एस.टी.कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण

एस.टी.कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण
X

ठाणे : महाराष्ट्र राज्य एस. टी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी महामंडळातील विविध संघटनांनी एकत्र येऊन आज संपूर्ण महाराष्ट्रासह ठाण्यातील विभागीय कार्यालयाबाहेर लाक्षणिक उपोषण केले.

शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एस.टी कर्मचाऱ्यांना ही २८ टक्के महागाई भत्त्याचा दर लागू करावा, वार्षिक वेतनवाढ २ वरुन ३ टक्के मान्य केलेल्या तारखेपासून लागू करावी तसेच सातव्या वेतन आयोगानुसार केंद्र व राज्य शासनाने लागू केलेला घरभाडे भत्ता सुधारीत दराने लागू करावा यासाठी गेले काही महिने एस.टी तील सर्वच युनियन एस.टी प्रशासनाकडे पाठपुरावा करत होत्या.

परंतु , शासनाने एस.टी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत केवळ ५ टक्के महागाई भत्ता जाहीर करून एक प्रकारे कर्मचाऱ्यांची थट्टा केल्याची भावना कर्मचांऱ्यामध्ये निर्माण झाली आहे, दिवाळी तरी आनंदात जाईल अशी कर्मचाऱ्यांची अपेक्षा होती.

महागाईचा भडका उडालेला असताना कर्मचाऱ्यांना २५०० रुपये व अधिकाऱ्यांना ५००० रुपये दिवाळी भेट एस.टीने जाहीर केली आहे. ती अगदीच तुटपुंजी आहे. या तुटपुंज्या रक्कमेत दिवाळी कशी साजरी करायची? हा एस.टी कर्मचाऱ्यांनी सरकारला थेट प्रश्न विचारला आहे.

मुलांच्या शिक्षणाचा खर्च , आजारपण त्यातच वेळेवर न मिळणारा पगार, या विवंचनेतुन आतापर्यंत २५ पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचललेले असताना, अजुन किती आत्महत्या व्हाव्यात असे सरकारला वाटते? असा सवाल केला आहे.

महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना एस.टी प्रशासनाने दिलेली ५ टक्के महागाई भत्त्यात केलेली वाढ मान्य नाही. ती २८ टक्के लागू करावी , तसेच वार्षिक वेतनवाढीचा दर २ वरुन ३ टक्के करणे तसेच केंद्र व राज्य शासनाप्रमाणे सुधारित दराने घरभाडे भत्ता लागू करणे या एसटी कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्या आहेत, प्रशासनाने या मागण्या मान्य न केल्याने एस.टीत कार्यरत असलेल्या सर्व कामगार युनियन एकत्र येऊन आंदोलन आणखी तीव्र करतील असा इशारा यावेळी देण्यात आला.

ठाणे विभागातही विभाग नियंत्रक कार्यालयासमोर आजपासुन बेमुदत उपोषण करण्यात आले. आता मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही असा निर्धारच कृती समितीतील नेत्यांनी व्यक्त केला तसे संयुक्त पत्र प्रसिद्धीस दिलेले आहे.

Updated : 27 Oct 2021 11:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top