Home > News Update > जिल्हाधिकाऱ्यांकडे चुकीचे ठराव सादर केल्याने दोन ग्रामसेवकांवर निलंबनाचा बडगा

जिल्हाधिकाऱ्यांकडे चुकीचे ठराव सादर केल्याने दोन ग्रामसेवकांवर निलंबनाचा बडगा

जिल्हाधिकाऱ्यांकडे चुकीचे ठराव सादर केल्याने  दोन ग्रामसेवकांवर निलंबनाचा बडगा
X

विक्रमगड तालुक्यातील देहर्जे प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असताना प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी साखरे आणि खुडेद ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे चुकीचे ठराव सादर केल्याची बाब त्याच्या चांगलीच अंगलट आली असून साखरे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक रमेश गोविंद भोईर ह्यांची नियुक्ती रद्द तर खुडेद चे ग्रामसेवक विश्राम वेडगा ह्यांचे निलंबन करण्यात आल्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ ह्यांनी काढले आहेत.

विक्रमगड तालुक्यातील सुकसाळे येथे देहर्जे नदीवर सिंचनासाठी धरण बांधण्याचा प्रस्ताव अनेक वर्षापासून प्रलंबित होता. या धरणासाठी २३५ हेक्‍टर खाजगी व ४४५ हेक्टर वन जमीन अशी सुमारे ६८० हेक्टर जमीन बुडीत क्षेत्रात जाणार आहे. यामध्ये साखरे जांभे व खुडेद या गावातील चार पाड्यातील ४०२ कुटुंबे विस्थापित होणार आहेत. प्रकल्पग्रस्तांचे संपूर्ण पुनर्वसन झाल्यानंतरच धरणाचे काम सुरू करावे अशी भूमिका प्रकल्पग्रस्तांनी घेतल्याने त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज पर्यंत अनेक बैठका पार पडल्या आहेत.प्रकल्पबाधित संघर्ष समिती आणि प्रकल्पग्रस्तांची समिती स्थापन करण्यात आली होती.

साखरे ग्रामपंचायतीने १७ जानेवारी २०२२ तर खुडेद ग्रामपंचायतीने ७ फेब्रुवारी २०२२ रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करून पुनर्वसनासाठी ठरविलेल्या जागेला बहुमताने पसंती दर्शविणारा ठराव संमत केला.परंतु गावातील काही ग्रामस्थांनी पुनर्वसनासाठी निवडलेल्या खरिवली गावाच्या ठिकाणचा विरोध करून त्या संदर्भातील पत्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिले. यामध्ये जागा निवडी संदर्भातील ग्रामसभेत ठराव खोटा असल्याची तक्रार करण्यात आली असून त्या ठिकाणी पुनर्वसन करण्यास ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे.ग्रामसभेचा ठराव ची वैधता तपासणीबाबत उपजिल्हाधिकारी संदीप पवार ह्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहून गटविकास अधिकारी,विक्रमगड ह्यांच्याकडून चौकशी अहवाल मागविण्यात आला होता.

अहवालात खुडेद व साखरे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत अनियमितता झाल्याचे स्पष्ट उल्लेख करीत ग्रामसेवकानी चुकीचा व बेकायदेशीर ठराव दिल्याचे अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.असे असताना ह्या प्रकरणी खुडेद ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक वेडगा,साखरे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक भोईर,संबंधित खात्याचे कार्यकारी अभियंता व काही दलालांच्या संगनमताने बनावट ठराव बनवीण्यात आल्याची तक्रार करीत त्याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा जिप सदस्य संदेश ढोणे ह्यांच्यासह समितीने दोन महिन्यांपूर्वी केली होती.त्या अनुषंगाने झालेल्या चौकशीत साखरे ग्रामपंचायतचे कंत्राटी ग्रामसेवक रमेश भोईर यांचे बाबत सादर केलेल्या चौकशी अहवाल ची तपासणी केली असता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केलेली माहिती व दिनांक 14 फेब्रुवारी 2022 रोजी ची साखरे ग्रामपंचायत ग्रामसभेच्या इतिवृत्तामध्ये प्रथमदर्शनी तफावत दिसून आली.

तर दुसरीकडे ग्रामसेवक विश्राम वेडगा ह्यानीही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केलेली माहिती व दि.७फेब्रुवारी २०२२ रोजी ग्रामसभेच्या इतिवृत्तामध्ये प्रथमदर्शनी तफावत दिसून आली.यावर ह्या दोन्ही ग्रामसेवकांना बाजू मांडण्याची संधी दिली असता त्यांनी सादर केलेले इतिवृत्त सदोष असून जिल्हाधिकारी कार्यालयाची दिशाभूल केल्याचे स्पष्ट होत असल्याने त्यांचा खुलासा अमान्य करण्यात आला. ग्रामसेवक रमेश भोईर ह्यांची ग्रामसेवकांची नियुक्ती रद्द करण्यात आली.दुसरीकडे ग्रामसेवक विश्राम वेडगा ह्यांना जिल्हापरिषद सेवेतून निलंबित करण्यात आल्याचे आदेश सिद्धाराम सालीमठ ह्यांनी ५जुलै च्या पत्रान्वये काढले आहेत.

Updated : 10 Aug 2022 9:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top