Home > News Update > "त्वंम ज्ञानमय विज्ञानमयोसी" हेच गणपतीचे खरे स्वरूप - महेश म्हात्रे

"त्वंम ज्ञानमय विज्ञानमयोसी" हेच गणपतीचे खरे स्वरूप - महेश म्हात्रे

त्वंम ज्ञानमय विज्ञानमयोसी हेच गणपतीचे खरे स्वरूप - महेश म्हात्रे
X

आज गणेश जयंती. आज गणेश जन्माचा उत्सव सर्वत्र साजरा होताना दिसतो. आपल्या सर्वांचा लाडका गणपती हा "गुणपती" म्हणूनही ओळखला जातो... त्वंम ज्ञानमय विज्ञानमयोसी हेच गणपतीचे खरे स्वरूप. आणि म्हणूनच, गणेशाची उपासना म्हणजे, ज्ञानाची साधना, गुणांची, सद्गुणांची उपासना होय. आम्हीं मात्र उपवास आणि उपवासाचे पदार्थ याचाच जास्त विचार करत असतो.

असो, हल्ली गणेशोत्सव घरगुती असो वा सार्वजनिक, सगळीकडे गणेशपूजेच्या या मूळ उद्देशाकडे दुर्लक्ष होताना दिसते. आज जेव्हा अवघे जग डिजिटल युगात’ स्थिरावले आहे, तेव्हा तर आपल्या सगळ्यांच्या उत्कर्षासाठी गुणाधिष्ठित, विचारी आणि विवेकी समाजाची गरज प्रकर्षाने जाणवते. ज्या समाजात बुद्धीची, बुद्धिमत्तेची साधना होते, बुद्धिमंतांची कदर असते, तोच समाज पुढे जातो, हे चीन, जपान युरोप-अमेरिकेच्या उदाहरणावरून आपण पाहिले आहे. पण त्यातून आम्ही काहीच शिकलो नाही. म्हणून बागेश्वर धाम बाबा सारखे लोक, देवाधर्माच्या नावानं सगळ्यांना टोप्या घालून हसत राहतात.

आपण थोडा विचार करून पहा, तुम्हाला कळेल की,

गणेश ही तर बुद्धिदाती देवता आहे. एकदंत विचारवंत भगवंत आहे. मुख्य म्हणजे तो उत्तम लेखक आहे. खरं तर

त्याच्या प्रतिमेमध्येच त्याच्या देवपणाचे रहस्य दडलेले दिसते. गणपतीने एकदा नव्हे अनेकदा स्वत:च्या बुद्धीची, पराक्रमाची चुणूक दाखवून स्वत:चे अनोखेपण सिद्ध केले होते, पण जेव्हा पृथ्वी प्रदक्षिणेची स्पर्धा लागली होती, त्यावेळी गणपतीने आपल्या आई-वडिलांना पृथ्वीमोलाचे ठरवून प्रदक्षिणा घातली, म्हणून तो अग्रपूजेचा मानकरी बनला. तो लोकांची विघ्ने दूर करणारा विघ्नहर्ता गणनायक आहे. लोकांच्या संकटात तो धावून जातो, म्हणून तो अनादी कालापासून पासून लोकांचा पुढारी आहे.

आजच्या बुद्धिमान तरुण पिढीने गणपतीची ही विविध रूपे समजून घेतली पाहिजेत.

गणेश चरित्रात सामावलेली

मातृ-पितृभक्ती, देशप्रेम, जनसेवेची कळकळ लक्षात घेऊन आपण सर्वांनी समाजहितासाठी प्रेरित होणे गरजेचे आहे. विशेषत #गणराज्य आणि #गणराया च्या एकपणाचाही विचार करावा, जेणेकरून भक्तीला सामाजिक कार्यात विसर्जित करून समाजातील मनुष्यबळ, द्रव्यबळ उपेक्षितांकडे वळवले तर मोठे बदल होतील. उदाहरणच दयायचं तर, टिटवाळा येथील गणेश भक्तांनी मोठ्या प्रेमाने आणि परिश्रमाने उभारलेले भव्य रूग्णालय पहा. गणेश भक्तीने प्रेरित झालेल्या प्रमोद दलाल परिवाराने दिलेली किंमती जागा आणि त्यावर मोठ्या निष्ठेने डॉक्टर आणि परिसरातील मंडळींनी एकत्र येऊन केलेलं काम अनुकरण करण्यासारखे आहे. या रुग्णालयात अत्याधुनिक सुविधांच्या माध्यमातून रुग्णांवर आलेले आजाराची विघ्न दूर केले जाते. यापेक्षा वेगळी गणेश भक्ती काय असू शकते ?

गणपती ज्ञानासोबत सुख संपत्तीची देवता आहे, हे आपण नेमकं विसरलेले असतो.गणपती मूर्तीच्या शेजारी ऋद्धी-सिद्धी उभ्या असलेल्या दिसतात. त्या प्रतीकाचा अर्थ अगदी सहजसोपा आहे. संगणक क्षेत्रात काम करणाऱ्या मोजक्या कॉम्प्युटर तज्ञांनी मात्र संगणकामागील समृद्धीचे संपत्तीचे तत्व नेमके जाणून घेतले आणि त्यांची किती भरभराट झाली. ते आपण सारे जाणतो. म्हणूनच संगणक तज्ञांनी जे संगणेश तत्त्व जाणून घेतले, तो नेमका अर्थ आम्ही समजून घेतला पाहिजे. गणपती शेजारी ऋद्धी-सिद्धीची उपस्थिती सांगते की, बुद्धीची, ज्ञानाची उपासना करणा-यांना सुख-समृद्धी, यशकीर्ती लाभते. खर तर महात्मा फुले यांनी शिक्षणाचे हेच महत्त्व अधिक स्पष्ट शब्दात सांगितलं होतं. पण आम्ही केवळ देवाला नमस्कार करून ज्ञानप्राप्तीची मागणी करणारे, अतिशहाणे लोक तिकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. भारतातील सर्वसामान्य लोकांना ज्ञानाची दारे उघडी करून देणारे थोर समाजसेवक महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी खऱ्या अर्थाने हा समाज विकासाचा "ज्ञानमार्ग" प्रशस्त केला. म्हणूनच जेव्हा त्यांनी सांगितले होते की,

"विद्येविना मती गेली।

मतिविना नीती गेली।

नीतिविना गती गेली।

गतिविना वित्त गेले।

वित्ताविना शूद्र खचले।

इतके अनर्थ एका अविद्येने केले।।"

तेव्हा खऱ्या अर्थाने लोकांना ज्ञानाचे, शिक्षणाचे महत्त्व कळले आणि भारत देशी ज्ञानाची पहाट झाली होती. परंतू केवळ पदवी मिळाली म्हणजे ज्ञान प्राप्त झाले असे नाही. तुमच्या बौद्धिक जाणीवा किती विकसित झाल्या, किती समाजाभिमुख झाल्या आणि मुख्य म्हणजे विवेकाची धारणा किती झाली

यावर तुमची ज्ञानाची पातळी ठरते.

आजच्या संक्रमण काळात, जेंव्हा समाजाचे सगळे घटक, आमदार, नगरसेवक असो, किंवा ग्राम पंचायती मधील चपराशी, सगळेच आर्थिक, मानसिक आणि शारीरिक ताणतणावाचा सामना करताना दिसताहेत. परिणामी, सगळ्यांना देवाचा आधार घ्यावासा वाटतो. काही हरकत नाही. पण केवळ देवाच्या भरोशावर न राहता, "प्रयत्नांती परमेश्वर" या सर्वमान्य विचाराने भक्तीची वाट चालणे , हेच संतांचे सांगणे आहे. मग अशा वेळी आम्ही सगळ्यांनी डोळस बुद्धीने आराधना करणे समाजाच्या सर्वागीण विकासासाठी आवश्यक आहे, असे तुम्हाला वाटत नाही का ?

परिस्थितीकडे अगदी निरखून, बारीक डोळ्याने पाहणारा, बुद्धीदाता गणपती सुद्धा त्याच्या मंगलमुर्तीतून, त्याच्या कीर्तीतून तेच सांगतोय, पण लक्षात कोण घेतो ?

Updated : 13 Feb 2024 5:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top