तुकाराम मुंढे नागपूरचे आयुक्त, भाजपविरुद्ध उद्धव ठाकरेंची खेळी?

तुकाराम मुंढे, Tukaram Mundhe, IAS, news, marathi news, maxmaharashtra

राज्यात सत्तापालट झाल्यानंतर आता शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या सरकारनं केल्या आहेत. राज्य सरकारने २२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांच बदली नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. नवी मुंबई आणि नाशिक महापालिकेतील कडक कारभारानंतर तुकाराम मुंढे यांची बदली फडणवीस सरकारच्या काळाता एडस नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर करण्यात आली होती. पण आता भाजपची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी मुंढे यांची बदली करण्यात आलीये. सत्ताधारी भाजपला अडचणीत आणण्यासाठीच तुकाराम मुंढे यांची बदलीची खेळी खेळण्यात आल्याची चर्चा आता सुरू झालीये.

14 वर्षात 14 ठिकाणी बदल्या

आपल्या आक्रमक शैलीसाठी तुकाराम मुंढे राज्यात ओळखले जातात. त्यांच्या या शिस्तप्रियतेमुळे ते फार काळ कुठेच टिकले नाहीत. मुंढे 2005च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सेवेत आल्यानंतर प्रोबेशननंतर 2006 मध्ये त्यांनी सोलापूरचे आयुक्त म्हणून कामाला सुरूवात केली. आतापर्यत 14 वर्षात त्यांच्या तब्बल 14 वेळा बदल्या झाल्या आहेत.

धडाकेबाज कार्यशैलीमुळे मुंढे य़ांचे कायम लोकप्रतिनिधींशी खटके उडालेत. त्यामुळे वर्ष-दीड वर्षांपेक्षा जास्त काळ ते कुठल्याच पदावर टिकले नाहीत. मात्र, प्रत्येक ठिकाणी मुंढेनी आपल्या कामाचा, शिस्तीचा ठसा उमटवला. कर्मचाऱ्यांना शिस्त लावणे, प्रसंगी कारवाई करणे, यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल कायम नाराजी राहिलीये. पुणे,नवी मुंबई इथे तर तुकाराम मुंढे यांच्याविरुध्द आंदोलनं झाली आहेत. तीन महानरपालिकांनी अविश्वास ठराव पारीत करण्याचा विक्रमसुध्दा मुंढे यांच्या नावावर आहे.

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त असतांना त्यांनी थेट गणेश नाईक यांच्यासोबत पंगा घेतला. तर त्यानंतर पुण्यात परिवहन आयुक्त असतांना नगरसेवकांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतल्यामुळे त्यांचे नगरसेवकांशी खटके उडाले. नाशिकमध्ये पालिका आयुक्तपदी असतांना शहरातील अतिक्रमण हटवणे आणि अनेक महत्वाच्या निर्णयांवर मुंढेनी परस्पर निर्णय घेतले. त्यामुळे संपूर्ण नाशिक महानगरपालिका मुंढे यांच्याविरोधात गेली. अखेर महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीचे संचालक म्हणून त्यांची नियुक्ती केली गेली. त्यामुळे गेले २ वर्षे मुंढे अज्ञातवासात होते. आता सत्ताबदलानंतर भाजपचा गड समजल्या जाणाऱ्या नागपूरला त्यांना महानगरपालिका आयुक्तपदी पाठवलं जात आहे. त्यामुळे यामागे उद्धव ठाकरे सरकारची नेमकी काय खेळी आहे, हे लवकरच दिसेल.

तुकाराम मुंढे यांची धावती कारकीर्द

 1. 2006-07 – महापालिका आयुक्त, सोलापूर
 2. 2007 – प्रकल्प अधिकारी, धारणी
 3. 2008 – उपजिल्हाधिकारी, नांदेड
 4. 2008 – सीईओ, नागपूर जिल्हा परिषद
 5. 2009 – अति. आदिवासी आयुक्त, नाशिक
 6. 2010 – के. व्ही. आय. सी. मुंबई
 7. 2011 – जिल्हाधिकारी, जालना
 8. 2011-12 – जिल्हाधिकारी, सोलापूर
 9. 2012 – विक्रीकर विभाग, सहआयुक्त, मुंबई
 10. 2016 – महापालिका आयुक्त, नवी मुंबई
 11. 2017 – पिंपरी-चिंचवड परिवहन, पुणे
 12. 2018 – महापालिका आयुक्त, नाशिक
 13. 2018 – नियोजन विभाग, मंत्रालय