Home > News Update > चोर समजून आदिवासी महिलांना पोलिसांची मारहाण? ; पोलीस उपायुक्तांचे चौकशीचे आदेश

चोर समजून आदिवासी महिलांना पोलिसांची मारहाण? ; पोलीस उपायुक्तांचे चौकशीचे आदेश

चोर समजून आदिवासी महिलांना पोलिसांची मारहाण? ; पोलीस उपायुक्तांचे चौकशीचे आदेश
X

विरार // पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या सहा आदिवासी महिलांना चोर समजून पोलिसांनी बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश पोलीस उपायुक्तांनी दिलेत.

पोलिसांनी या चार आदिवासी महिलांना चोरीच्या केवळ संशयावरून ताब्यात घेतले होते. त्यांना मारहाण केली आणि चूक लक्षात आल्यानंतर त्यांना सोडून दिले. एवढेच नाही तर त्यांना ताब्यात घेतल्याची कोणतीही नोंद पोलीस दफ्तरी करण्यात आली नाही, असा आरोप आदिवसी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कासा परिसरात राहणाऱ्या बेबी नारायण वावरे, दीपिका दिनेश वावरे, विमल माणक्या पुंजारा, सोनम सबू भोईर, सीता संताराम भोईर, तारूसुभाष डोकफोडे असं या सहा आदिवासी महिलांची नावं आहेत. वसईच्या पापडी तलाव, कोळीवाडा या ठिकाणी राहतात आणि मोलमजुरीचे काम करतात. या महिला शुक्रवारी पापडी येथे बाजारात गेल्या होत्या. बाजार करताना काही नागरिकांनी त्या चोरी करण्यासाठी आल्याची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान पोलिसांनी या महिलांना पापडी येथील पोलीस चौकीत नेले. तेथील सहायक पोलीस निरीक्षक वाघ आणि अन्य एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना लाठीने मारहाण करून पुन्हा बाजारात दिसू नका, अशी धमकी दिली. दरम्यान या महिलांनी घटनेची माहिती आदिवासी संघटनांना दिली. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना जाब विचारला असता केवळ समज देण्यासाठी त्यांना ताब्यात घेतले असून त्यांना मारहाण केली नसल्याचा दावा पोलिसांनी केला. दरम्यान वसई-विरार महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रातील वैद्यकीय तपासणीत महिलांच्या दंडावर मारहाणीच्या खुणा आढळल्याचेही कार्यकर्त्यांनी सांगितले.

दरम्यान श्रमजीवी संघटना आणि लालबावटा संघटनेने

संबंधित पोलिसांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी २५ नोव्हेंबरला वसई पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा आदिवासी कार्यकर्ते कॉम्रेड शेरू वाघ यांनी दिला.

Updated : 23 Nov 2021 1:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top