Home > News Update > धक्कादायक! तब्बल अडीच महिने मृत व्यक्तीचे अवयव शवविच्छेदन गृहातच होते पडून

धक्कादायक! तब्बल अडीच महिने मृत व्यक्तीचे अवयव शवविच्छेदन गृहातच होते पडून

धक्कादायक! तब्बल अडीच महिने मृत व्यक्तीचे अवयव शवविच्छेदन गृहातच होते पडून
X

भूम तालुक्यातील माणकेश्वर येथील सरकारी रुग्णालयात अडीच महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या शवविच्छेदनादरम्यान मृत व्यक्तीचे काढून घेतलेले अवयव तब्बल अडीच महिने अत्यंत दुरवस्थेत शवविच्छेदन गृहातच पडून असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.सामाजिक कार्यकर्ते गणेश अंधारे यांनी हा प्रकार समोर आणला आहे.

गणेश अंधारे यांनी संबंधित सरकारी रुग्णालयाला भेट दिली असता, त्यांना रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहात काही प्लास्टिकच्या बरण्यात मृत व्यक्तींचे अवयव , तसेच त्यांच्या अंगावरील रक्ताने माखलेले कपडे आढळून आले, दरम्यान याबाबत माहीती घेतल्यानंतर त्यांना या शवविच्छेदन गृहात तब्बल अडीच महिन्यापूर्वी अपघातात मृत्यू झालेल्या दोन युवकांचे शवविच्छेदन झाल्याची माहिती मिळाली, दरम्यान तब्बल अडीच महिने या युवकांचे अवयव याच शवविच्छेदन गृहात पडून होते, सोबतच शवविच्छेदन झाल्यानंतर याठिकाणी कोणत्याही प्रकारची स्वच्छता करण्यात आलेली नव्हती. वास्तविक पाहता मृत व्यक्तीच्या अवयवाची नियमानुसार विल्हेवाट न लावता एक प्रकारे त्यांची अवहेलना करणाऱ्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पीपल्स राईट्स फाउंडेशनचे गणेश अंधारे यांनी केली आहे.

यावेळी बोलताना गणेश अंधार म्हणाले की, या धक्कादायक प्रकारामुळे सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा आणि हृदयशून्यपणा दिसून येत आहे, या चीड आणणाऱ्या प्रकारासाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांबरोबर मुख्य वैद्यकीय अधिकारी जबाबदार आहेत, शवविच्छेदन केल्यानंतर शवविच्छेदन गृहाची स्वच्छता झाली आहे की नाही? मृत व्यक्तीच्या पार्थिवाची व्यवस्थित विल्हेवाट लागली आहे की नाही ? हे बघणे त्यांचे कर्तव्य होते. मृत व्यक्तीचे अवयव आणि त्यांच्या अंगावरील कपडे तब्बल अडीच महिने शवविच्छेदन गृहात पडून राहण्यास मुख्य वैद्यकीय अधिकारी जबाबदार असून त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी पीपल्स राईट्स फाउंडेशनच्यावतीने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

दरम्यान या संपूर्ण घटनेची चौकशी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी करून मृत व्यक्तींना मरणोत्तर न्याय मिळवून द्यावा असं अंधार यांनी म्हटले आहे.

Updated : 24 Sep 2021 12:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top