मालेगाव बॉम्बस्फोटातील दुसरा आरोपीही लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात
Max Maharashtra | 27 April 2019 1:59 PM IST
X
X
2008 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आणखी एका आरोपीने लोकसभा निवडणूकीसाठी अर्ज दाखल केला आहे. मेजर रमेश चंद्रा उपाध्याय (निवृत्त) यांनी शुक्रवारी उत्तर प्रदेशातील बलिआ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेच्या तिकीटावर ते निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी असलेल्या प्रज्ञा सिंह ठाकूर या देखील निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्या भोपाळ येथून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.
बॉम्बस्फोटात आरोपी असलेल्या साध्वींना उमेदवारी दिल्यामुळं विरोधकांनी भाजपला घेरलं आहे. त्यांच्या उमेदवारीला आव्हानही देण्यात आलं आहे. त्यामुळं साध्वी त्यांच्या प्रचारसभांतून स्वत:वरील आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. हे करत असतानाच साध्वी यांनी मुंबई हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
‘हेमंत करकरे यांनी मला खूप त्रास दिला. मला शिवीगाळ केली. मला बॉम्बस्फोट कटात गोवले. सुरक्षा आयोगाचा सदस्य असलेल्या एका चौकशी अधिकाऱ्यानं मला सोडण्याचे आदेश त्यांना दिले होते. मात्र, करकरे मला अडकवण्यावर ठाम होते. काहीही करून पुरावे गोळा करेन. पण तुला सोडणार ना ही, असं करकरे म्हणाले होते. 'करकरे हे कुटिलतेनं वागत होते. ते देशद्रोही, धर्मद्रोही होते,’ असं साध्वी म्हणाल्या. 'करकरेंचा वंशनाश होईल असा शाप मी दिला होता. ज्या दिवशी मी जेलमध्ये गेले, तेव्हा त्यांच्या घरी सुतक सुरू झालं होतं. दहशतवाद्यांनी त्यांना मारल्यानंतर ते सुतक दूर झालं,’ असं धक्कादायक वक्तव्य साध्वी यांनी केलं होतं.
त्यानंतर देशभरातून टीका झाल्यानंतर साध्वी प्रज्ञासिंह यांनी माफी मागितली होती.
रमेश उपाध्याय यांनी करकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. करकरे यांनी प्रज्ञा आणि इतरांवर अत्याचार केला होता, त्यामुळे त्यातील 12 पैकी 11 आरोपी योग्य प्रकारे चालू शकत नाही. असा दावा उपाध्याय यांनी केला आहे.
विशेष म्हणजे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह सध्या प्रकृतीच्या कारणास्तव जामीनावर आहेत. त्यांनी सोमवारी भोपाळ लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करायला येताना साध्वी व्हीलचेअरवर आल्या होता. मात्र, मतदारसंघात प्रचार करताना प्रज्ञासिंह यांच्या पायात अचानक ताकद आली आणि त्या ठेका धरत नृत्य करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे रमेश उपाध्याय यांचा या प्रकरणातील आरोपींना चालता येत नाही या दाव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
भावनेच्या भरात जर आम्ही करकरेंना देशद्रोही म्हणत असू तर तो आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. करकरे देशद्रोही आहेत की नाही. हे न्यायपालिका आणि तपास यंत्रणांनी ठरवावे. कुठल्याही पोलिसांला शहिदाचा दर्जा दिला जात नाही. हा दर्जा केवळ स्वातंत्र्य सैनिक आणि जवानांना दिला जातो असं ही उपाध्याय म्हणाले.
उपाध्याय यांनी २०१२ साली उत्तरप्रदेश मधून विधानसभेची निवडणूक लढवली होती. आता ते लोकसभेची निवडणूक लढवत आहेत.
Updated : 27 April 2019 1:59 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire