Home > News Update > सोलापूर लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीची भूमिका ठरणार महत्वाची

सोलापूर लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीची भूमिका ठरणार महत्वाची

सोलापूर लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीची भूमिका ठरणार महत्वाची
X

सोलापूर : लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत तर भाजपने राज्यातील वीस उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत भाजपने सोलापूर लोकसभेचा उमेदवार जाहीर केला नाही. त्यामुळे येथे भाजपमधून उमेदवारीसाठी मोठी चढाओढ सुरू आहे. परंतु गेल्या निवडणुकीत या मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अर्ज दाखल केला होता. प्रकाश आंबेडकरांची उमेदवारी काँग्रेसला भारी पडली होती आणि भाजपाचा विजय सुककर झाला होता. त्यामुळे २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत देखील वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असून या मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघ राखीव असून येथून विद्यमान आमदार यशवंत माने,राष्ट्रवादी काँगेस पक्ष ( अजित पवार गट ), सोलापूर शहर उत्तर विधासभा मतदारसंघातून विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख भाजपाचे आहेत. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसच्या ताब्यात असून येथून विद्यमान आमदार प्रणिती शिंदे आहेत. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी आहेत. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघावर भाजपचे वर्चस्व असून येथून विद्यमान आमदार सुभाष देशमुख आहेत. पंढरपूर विधानसभा मतदारसंघ देखील भाजपाच्या ताब्यात असून येथील विद्यमान आमदार समाधान आवताडे आहेत.

2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल

२०१९ साली भाजपकडून जयसिध्देश्वर स्वामी यांनी अर्ज भरला होता. त्यांना या निवडणुकीत 5 लाख 24 हजार 985 मते पडली होती. तर काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांना 3 लाख 66 हजार 377 मते मिळाली होती. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची भूमिका निर्णायक ठरली होती. २०१९ साली एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीची युती होती. या मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांना 1 लाख 70 हजार 7 मते पडली होती. तर नोटाला 6 हजार 191 मते मिळाली होती.

या निवडणुकीत भाजपचे उमेदवार जयसिध्देश्वर स्वामी 1 लाख 58 हजार 608 मतांनी विजयी झाले होते. त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला होता. तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर होते. या निवडणुकीत एकूण 10 लाख 84 हजार 514 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तर 58.57 टक्के मतदान झाले होते.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील समस्या

 • सोलापूर शहर गिरणी कामगारांचे शहर असून येथे कामाच्या संधी उपलब्ध नसल्याने येथील अनेक कुटुंबे पुणे, मुंबई, हैद्राबाद येथे स्थलांतर होत आहेत. स्थलांतर रोखण्यासाठी उपाययोजना होणे गरजेचे
 • याच शहरात बिडी कामगार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्या समस्या सोडणे आवश्यक आहे
 • हातमाग कापड उद्योग येथे असून त्याला ऊर्जितावस्था देणे गरजेचे
 • सोलापूर शहराला पाण्याचा प्रश्न सातत्याने भेडसावत असल्याने त्याकडे लक्ष देण्याची गरज
 • सोलापूर शहराच्या आसपास आयटी पार्क उभे राहणे गरजेचे
 • विमानतळाचा प्रश्न अनेक वर्षांपासून रेंगाळला असून तो सोडवणे गरजेचे
 • अक्कलकोट मतदारसंघातील कर्नाटक सीमेला लागून असलेल्या गावांना प्राथमिक सोयी सुविधा देणे आवश्यक
 • दक्षिण सोलापूर तालुक्यात एमआयडीसी चा प्रश्न सोडवणे आवश्यक
 • मोहोळ मतदारसंघातील मोहोळ शहराला पाण्याचा प्रश्न भेडसावत असून तो सोडवणे गरजेचे
 • मंगळवेढा मतदारसंघातील 35 गावाचा पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. तो सोडवणे गरजेचे
 • पंढरपूर मतदारसंघात पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा विकास कामे रखडली आहेत. त्याकडे लक्ष देण्याची गरज
 • पंढरपूर शहरात एमआयडीसी चा प्रश्न सोडवणे गरजेचेलोकसभा निवडणुकीसाठी विविध पक्षांकडून चर्चेत असलेली नावे

भाजपा : विद्यमान खासदार जयसिध्देश्वर स्वामी, अमर साबळे, शरद बनसोडे, राम सातपुते, गुणरत्न सदावर्ते, विजयकुमार देशमुख

काँग्रेस : प्रणिती शिंदे

आरपीआय : आरपीआय रामदास आठवले गटाकडून या मतदारसंघावर दावा ठोकण्यात आला असून त्यांनी महायुतीतून रामदास आठवले यांनी ही जागा रिपाई ला सोडण्याची मागणी केली आहे.

वंचित बहुजन आघाडी : वंचित बहुजन आघाडीकडून गेल्या वेळेस प्रकाश आंबेडकर यांनी अर्ज भरला होता. यावेळेस कोण अर्ज भरणार याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

सकल मराठा समाज : सकल मराठा समाजाच्या वतीने देखील उमेदवार उभे करण्यात येणार आहेत.

एमआयएम : या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी बरोबरच एमआयएम पक्षाची भूमिका महत्वाची ठरणार आहे. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम पक्षाचा फटका काँग्रेस पक्षाला बसू शकतो.

बोगस जात प्रमाणपत्राचा प्रश्न ऐरणीवर

या लोकसभेच्या निवडणुकीत बोगस जात प्रमाणपत्राचा प्रश्न ऐरणीवर आला असून खऱ्या अनुसूचित जातीच्या उमेदवाराला उमेदवारी देण्याची मागणी होवू लागली आहे. या लोकसभेच्या निवडणुकीत मोठी उलथापालथ पहायला मिळणार असून कोण विजयी होणार याची चर्चा जोरदार सुरू आहे. असे असले तरी सोलापूर उत्तर विधानसभा मतदार संघ,दक्षिण विधानसभा मतदार संघ,अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ,पंढरपूर विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार आहेत. तर मोहोळ मतदारसंघावर अजित पवार गटाचे वर्चस्व असून येथे विद्यमान आमदार यशवंत माने आहेत. काँग्रेस पक्षाला ही निवडणूक जड असून शहर मध्य विधानसभा मतदार संघाच्या आमदार प्रणिती शिंदे लोकसभेच्या तयारीला लागलेल्या आहेत. यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Updated : 14 March 2024 7:47 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top