Home > मॅक्स ब्लॉग्ज > मनसेनं ‘बाणा’ जपलाय

मनसेनं ‘बाणा’ जपलाय

सत्तेसाठी पक्षाच्या विचारधारेपलीकडे जाऊन राजकीय तडजोडी करण्याच्या राजकीय गदारोळातून अलिप्त राहत मनसेने आपला ‘बाणा’ जपलाय का ? वाचा मॅक्स महाराष्ट्रचे वरिष्ठ पत्रकार आनंद गायकवाड यांचे सखोल विश्लेषण

मनसेनं ‘बाणा’ जपलाय
X


सत्तेसाठी आवश्यक त्या सर्व तडजोडी करणं ही राजकारणातली अपरिहार्य गोष्ट आहे. काँग्रेस, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या सर्वांनी तडजोडी केलेल्या आपण पाहिल्या आहेत. मात्र, महाराष्ट्राच्या राजकारणात राज्यस्तरावर अजून तरी तडजोडी न करण्याचा बाणा कायम ठेवलाय. त्यामुळं महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणात झालेला चिखल पाहता मनसेनं आता अधिक आक्रमकतेनं पक्षसंघटन वाढवल्यास २०२४ मध्ये मनसे गेमचेंजर ठरू शकतो, हे चित्र सध्याच्या राजकीय घडामोडीतून पुढे येतंय.

बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच शिवसेनेला जय महाराष्ट्र करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करून राज ठाकरे यांनी स्वतंत्र वाटचालीला सुरूवात केली. त्यानंतर पहिल्याच विधानसभेला सामोरं जात १३ आमदार निवडून आणण्याची किमया राज ठाकरेंनी केली होती. अर्थात त्यावेळी मराठीचा मुद्दा त्यांनी राज्यभर तापवला होता. मुद्दा जरी महाराष्ट्राशी निगडीत होता, तरी त्याचे पडसाद संपूर्ण देशात उमटले. विशेषतः उत्तर भारतात त्याचे पडसाद अधिक उमटले. मात्र, त्यानंतर नाशिक महापालिकेतील सत्ता वगळता मनसेला फारसा प्रभाव दाखवता आला नाही. सध्याच्या विधानसभेत मनसेचे राजू पाटील हे एकमेव आमदार आहेत.

राज ठाकरे यांचं महत्त्व लक्षात घेता त्यांना कुठल्याही राजकीय पक्षासोबत युती-आघाडी करता आली असती. तसे प्रस्तावही त्यांना आले असतील. मात्र, या सगळ्या प्रस्तावांना झुगारून देत राज ठाकरेंनी स्वबळावर वाटचाल करण्याचं सध्यातरी ठरवलेलं दिसतंय. कारण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वच प्रमुख पक्षांनी विचारसरणी, ध्येयधोरणं बाजूला ठेवत सत्तेसाठी तडजोडी केल्या. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना कुठल्याही सरकारमध्ये मंत्री करणं राज ठाकरेंना सहज शक्य होतं. मात्र, त्यांनी तसं केलं नाही. जवळचा फायदा बघण्यापेक्षा दूरचं नुकसान पाहणं अधिक गरजेचं असतं नेमकं हेच त्यांनी ओळखलेलं दिसतंय. म्हणूनच फोडाफोडी, तडजोडी या राजकारणात न पडता त्यांनी स्वबळावरच वाटचाल करणं पसंत केलंय. मात्र, मराठीच्या मुद्द्यावरून ते हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे वळाले आहेत. भाजप, शिवसेनेसारखे पक्ष हिंदुत्वाच्या मुद्द्याला धरूनच राजकारण करत असतांना मनसेच्या हिंदुत्वाचा मुद्दा लोकांना किती भावणार हे भविष्यात कळेलच.

एक मात्र खरं की, महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी २०१९ नंतर केलेल्या तडजोडी, वाटाघाटी होत असतांना त्याचवेळी मनसेनं या पक्षांविरोधात आक्रमकपणे भूमिका घेतली असती तर कदाचित आज महाराष्ट्रात मनसेला उभारी मिळाली असती. विशेषतः कोरोनानंतर मनसेला विस्तारासाठी अधिक संधी होती, त्या संधीचं सोनं करण्यात मनसे कमी पडलेली दिसत आहे. मतदान करतांना लोकं जी काही निकष लावत होती, त्या सर्वच निकषांना २०१९ नंतर मनसे सोडून सर्वच राजकीय पक्षांनी तिलांजली दिलेली आहे.

सर्वच राजकीय पक्षांशी चांगले संबंध असूनही वेळप्रसंगी त्यांनी नरेंद्र मोदींपासून ते देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरेंपासून ते एकनाथ शिंदेंपर्यंत शरद पवारांपासून ते अजित पवारांपर्यंत सर्वांवरच न डगमगता टीका केलीय. तर दुसरीकडे जेव्हा याच नेत्यांकडून चांगले निर्णय किंवा कामं झाली तेव्हा तोंडभरून कौतुकही केलेलं आहे. आता हे सगळं असूनही राज ठाकरेंना राजकीय मर्यादा माहिती आहेत. त्या मर्यादेत राहूनच त्यांनी राजकारण केलेलं आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी गमावलेली जागा भरून काढण्याची ही मनसेला मोठी संधी आहे. ही संधी ओळखून मनसेनं आतापासूनच रान पेटवलं तर २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत मनसे पक्ष मोठा गेमचेंजर म्हणून पुढे येऊ शकतो.

Updated : 16 July 2023 12:08 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top