मुद्दा सुधारित नागरिकत्व विधेयकाचा वाचा..

मुद्दा होता सुधारित नागरिकत्व विधेयकाचा. ‘हैदराबाद प्रकरणा’वर राहुलनी केलेल्या वक्तव्याला धरून भाजपने जाणीवपूर्वक आणि अत्यंत बुद्धिभेद करत इराणीबाईंना राहुलवर हल्ला करायला सोडले. तो नियोजित भाग होता. त्यांचा तमाशा देशाने पाहिला. मेन्स्ट्रीम मीडियात बातमी मात्र नागरिकत्व विधेयकाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनांचीच होती. कारण दुसरा विषय तोवर नव्हता. काल रामलीला मैदानावर ‘भारत बचाव आंदोलना’मध्ये गडगडलेली अर्थव्यवस्था, बेरोजगारी वगैरे मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल करणाऱ्या सभेत राहुल गांधींनी उत्तम भाषण केलं. अर्थव्यवस्थेचा बोजवारा, बेरोजगारी वगैरे खऱ्या मुद्द्यावर देशात चर्चा होण्यापेक्षा धार्मिक मुद्द्यावर देशात हलकल्लोळ सुरू आहे, असा भाषणाचा सार होता. कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारा होता.

मात्र, याच भाषणाच्या अगदी सुरवातीला इराणीबाईंच्या हल्ल्यावरून ‘सावरकरांना’ धरून त्यांनी केलेलं वक्तव्य मात्र मीडियाने उचललं. आणि मूळ मुद्दा आणखी भरकटत गेला. इथं खरी मेख आहे. जे भाजपला अपेक्षित होत ते झालं.
‘सावरकर’ हा विषय गेल्या काही वर्षात कडीपत्त्यासारखा झाला आहे. हिंदुत्व अजेंड्याच्या आगीवर आणि भाजपच्या चुलीवर देशाच्या भांड्यात नेमकं काय शिजतय हे कळू नये म्हणून लक्ष हटविण्याचे जिरे-मोहरी आणि तत्सम फोडणीचे अनेक मुद्दे वेळोवेळी वापरले गेले आहेत. या आगीला मीडियाने नेहमीच हवा दिलेली आहे. पैकी एक कडीपत्ता विषय म्हणजे ‘सावरकर’…!

जो फोडणीत टाकल्यावर नुसताच चटपटीत आवाज येतो. मात्र मूळ होणाऱ्या पदार्थातून अर्थातच काम नसल्याने नंतर बाजूला काढून टाकला जाणार असतो. काँग्रेसने या विषयाला उगचंच भाव देऊ नये. स्वतःवर ओढवून घेणं तर हे कटाक्षाने टाळावे, जे त्यांनी काल केलं. व्यक्तिशः राहुल गांधी कितीही बरोबर बोलले असले तरी त्यांची वेळ चुकीची होती. राजकारणात वेळेला खुप महत्व असतं. CAB वरून उसळलेलं वातावरण उगचंच फोडणीच्या क्षुल्लक वासावर चर्चा करायला सुरू झाले.

ज्या मीडियाने गेल्या गेल्या 6 वर्षात भाजपच्या या चुलीला हवा देण्याचे काम केलं त्याच भाषणात राहुल गांधींनी मीडियाला विनंतीही केली की त्यांनी आपली जबाबदारी ओळखायला हवी. मीडियाने काल पूर्ण ‘भारत बचाव आंदोलन’ एका कडीपत्ता विषयाची हेडलाईन देऊन निपटलं. काँग्रेसने आतातरी शहाणं व्हावं.

विनायक होगडे..