Home > Max Political > ‘पावसाचा आनंद मुख्यमंत्र्यांना झाला नसावा’

‘पावसाचा आनंद मुख्यमंत्र्यांना झाला नसावा’

‘पावसाचा आनंद मुख्यमंत्र्यांना झाला नसावा’
X

“पेरणी सुरु असताना किंवा त्यापूर्वी येणाऱ्या पावसाचा आनंद वेगळाच असतो. पावसाचा आनंद मातीशी संबंध असणाऱ्या लोकांनाच होतो. त्यामुळे पावासाचा आनंद जसा शेतकऱ्यांना झाला, तसा तो मुख्यमंत्र्यांना झाला नसावा. ते शेतकरी आहेत की नाही याबाबत आपल्याला कल्पना नाही” असे म्हणत साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

निवडणूकीच्या पूर्वी साताऱ्यात शरद पवारांची भर पावसात झालेली सभा चांगलीच गाजली होती. त्या सभेनंतर सर्वत्र शरद पवारांचीच चर्चा होती. त्याचा परिणाम मतदानावर देखील झालेला दिसून आला. मुख्यमंत्र्यांनी 'वर्षा' निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना 'पावसात भिजावे लागते हा आमचा अनुभव कमी पडला', अशी मार्मिक टिप्पणी केली होती. त्यावर पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

सातारा लोकसभा निवडणूकीविषयी बोलताना ते म्हणाले, “उदयनराजेंनी विकासाची काम करण्यासाठी पक्षांतर करत असल्याचे सांगितले होते. परंतु हे सबळ कारण नव्हते. सर्वसामान्य जनतेने तीन वेळा निवडून देऊनही त्यांच्या हाताला काम नव्हते. याचाच राग लोकांच्या मनात होता. त्यामुळे पर्यायी उमेदवार मिळावा आणि त्याला आपण मत द्यावं अशी उर्मी तरुणांच्या आणि अनुभवी लोकांच्या मनात होती.

त्यामुळे मी बहुमताने निवडून आलो. उदयनराजेंनी आता तरुणांना हाती घेऊन मोठे कारखाने आणून तरुणांना रोजगार दिला आणि शेतकऱ्यांच्या धान्याला भाव मिळवून दिला आणि पुन्हा नव्याने चळवळ सुरू केली तर त्यांचं नेतृत्व आणखी बराच काळ चालेल. त्यांनी लोकांमध्ये जावं, त्यांचा विश्वास परत मिळवावा. राष्ट्रवादी काँग्रेस मध्येच राहून त्यांनी काम केलं असतं तर त्यांना याहीपेक्षा मोठी संधी मिळाली असती. संधीच्या शोधात पक्षांतर करणं हे कदाचित लोकांना आवडलं नाही.”

https://youtu.be/0ukzg6xgZUo?t=3

Updated : 31 Oct 2019 7:27 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top