कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात तडीपार चोराचा धुमाकूळ
X
कल्याण लोहमार्ग पोलिसांनी सराईत तडीपार चोरट्याला शहाड रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशाचे पाकीट चोरून पळून जाण्याचा प्रयत्नात रंगेहाथ अटक केली आहे .फज्जू उर्फ इमरान सय्यद असं या चोरट्याचं नाव आहे .
शनिवारी सकाळच्या सुमारास चेतन जाधव हा इसम लोकलने कल्याण ते शहाड दरम्यान प्रवास करत होता .याच दरम्यान त्यांच्या डब्यात फज्जू उर्फ इमरान होता. लोकल शहाड स्टेशनवर येताच इमरानने डाव साधत जाधव यांना धक्का देऊन त्यांच्या खिशातील पाकीट चोरले व प्लॅटफॉर्म वर उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पाकीट चोरल्याचे जाधव यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केला, यावेळी प्लॅटफॉर्मवर ड्युटीवर असलेल्या कल्याण लोहमार्ग पोलीस कर्मचाऱ्यांचे व रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांचे लक्ष गेलं, त्यांनी तात्काळ प्रसंगावधान राखत फज्जूचा पाठलाग करत त्याला अटक केली.या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात फज्जू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान फज्जू उर्फ इमरान हा सराईत चोरटा असून त्याच्या विरोधात कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात 7 गुन्हे दाखल असून इतर पोलीस ठाण्यात देखील गुन्हे दाखल आहेत, 24 फेब्रुवारी 2020 पासून त्याला मुंबई ,मुंबई उपनगर,ठाणे ,रायगड, पालघर जिह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार तडीपार करण्यात आले होते.






