Home > News Update > वाबळेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांचे निलंबन

वाबळेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांचे निलंबन

वाबळेवाडी गावातील आदर्श शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे गुरुजी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला

वाबळेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांचे निलंबन
X

पुणे // राज्यात आदर्श शाळा म्हणून नावारूपला आलेली वाबळेवाडीची जिल्हा परिषद शाळा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वाबळेवाडी गावातील आदर्श शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे गुरुजी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबणाची करावाई करण्यात आली आहे.

दरम्यान वाबळेवाडी शाळेची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली. त्यासाठी दत्तात्रय वारे गुरुजी यांनी अथक परिश्रम घेतले. मात्र, वारे गुरुजी यांना स्थानिक राजकारणातून निलंबनाला सामोरं जावं लागलंय, असा आरोप शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींनी केला आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत शाळेत थांबणाऱ्या या गुरुजींना कामात अनियमितता असा आरोप ठेवून निलंबित केल्याने चर्चेला उधाण आलं आहे. गावकऱ्यांनी लाखो रुपये जमा केले कंपन्यांकडून निधी मिळवला, त्याचा हिशोब गावकऱ्यांनी ठेवला.या व्यवहाराशी मुख्याध्यापकांचा काहीच संबंध नाही परंतु ओढून-ताणून त्यांना या आर्थिक व्यवहारात जबाबदार धरून निलंबित करण्यात आल्याचे बोलले जात आहे .

दरम्यान,ज्येष्ठ कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी याबाबत बोलताना म्हटले आहे की, विद्येचे माहेरघर म्हणवणाऱ्या पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेने या उपक्रमशील शिक्षकाला निलंबित करून तमाम प्रयोगशील शिक्षकांचा अपमान केला आहे.

शिरूर तालुक्यातील शिक्रापूरपासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेले 50 ते 60 उंबरच्या वाबळेवाडी गावात ही शाळा असून सात वर्षापूर्वी दोन गळक्या खोल्या, पडक्या भिंती असलेली जिल्हा परिषद शाळा आज देशाचा हेवा वाटावा अशी झाली. याच शाळेत मुले शिक्षणाचे धडे गिरवत होते. शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांनी ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने शाळेचा कायापालट केला होता. मात्र, आता या शाळेला वादांचं ग्रहण लागलंय.

Updated : 20 Dec 2021 4:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top