Home > News Update > अतिवृष्टीचा फटका, बुलडाण्यात एकाच दिवसात 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

अतिवृष्टीचा फटका, बुलडाण्यात एकाच दिवसात 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

अतिवृष्टीचा फटका, बुलडाण्यात एकाच दिवसात 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
X

बुलडाणा : गेल्या तीन-चार वर्षांपासून सतत होणारी नापिकी. त्यातच याहीवर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, आणि डोक्यावर कायम असलेला कर्जाचा डोंगर. यामुळे बुलडाणा जिल्ह्यात काल एकाच गावातील शेतकरी पुत्र आणि शेतकऱ्याने आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटना समोर आली,यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

बुलडाणा तालुक्यातील खूपगाव येथील सिद्धेश्वर जाधव या 45 वर्षीय शेतकऱ्यांकडे चार एकर शेती आहे, सततच्या नापिकीमुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढला होता, त्यांच्याकडे एचडीएफसी बँकेचे जवळपास दीड लाख रुपये आणि त्यांनी ट्रॅक्टर घेतल्याने पाच ते सहा लाख रुपये कर्ज होते त्याचे हप्ते बाकी असल्याचे त्यांच्या भावाने सांगितले आहे, यावर्षी अतिवृष्टीमुळे त्यांचे पूर्ण चार एकरातील सोयाबीन पीक नष्ट झाल्याने ते गेल्या तीन चार दिवसापासून चिंतेत होते, त्यामुळे कर्जाचे हप्ते कसे फेडायचे, मुला - मुलींचे शिक्षण कसे पूर्ण करायचे. या चिंतेतून त्यांनी आत्महत्या केली असं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. 29 सप्टेंबर रोजी त्यांनी विषारी औषध प्राशन केले, त्यांच्यावर दोन दिवस बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र काल 1 ऑक्‍टोबर रोजी त्यांची रुग्णालयात प्राणज्योत मालवली त्यांच्या मागे आई वडील, पत्नी व दोन मुले आहेत.

तर दुसरीकडे याच गावातील शेतकरी पुत्र संदीप लक्ष्मण नावकर यांनी देखील सततच्या नापिकीला कंटाळून गळफास घेऊन काल आत्महत्या केली, संदीपचे वडील अपंग आहेत आणि आई देखील नेहमीच आजारी राहत असल्याने कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी ही संदीपवर होती, संदीप यांच्या वडिलांच्या नावावर जवळपास दोन एकर शेती आहे आणि यंदा अतिवृष्टी झाल्याने शेतातील सोयाबीन पीक पूर्णपणे सडून नष्ट झाले, त्यांच्यावर देखील सेंट्रल बँकेचे कर्ज असल्याचे सांगण्यात येत आहे, आई वडिलांचा आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पैसे नाहीत, त्यातच सततची नापिकी या सर्वाला कंटाळून संदीपने गळफास घेऊन आत्महत्या केली. आहे, त्याच्या पाठीमागे आई - वडील, पत्नी एक सात वर्षाचा मुलगा आहे.

बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक निसर्गाने पुन्हा एकदा हिरावून घेतले आहे, त्यामुळे शेतकरी राजा त्या संकटांना तोंड देताना आता पुरता हताश झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यासोबतच त्यांच्या शेती पिकाला योग्य भाव देण्याची मागणी देखील केली जात आहे.

Updated : 2021-10-03T19:00:55+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top