Home > News Update > हप्तेखोर पोलिसाच्या जाचाला कंटाळून नवऱ्याची ११. वर्षाच्या मुलीसह आत्महत्या

हप्तेखोर पोलिसाच्या जाचाला कंटाळून नवऱ्याची ११. वर्षाच्या मुलीसह आत्महत्या

हप्तेखोर पोलिसाच्या जाचाला कंटाळून नवऱ्याची ११. वर्षाच्या मुलीसह आत्महत्या
X

शहापूर येथील आसनगाव येथे राहणाऱ्या विकास सूर्यकांत केदारे यांनी आपली अकरा वर्षाची मुलगी आर्या सोबत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहिती नुसार विकासची पत्नी सोनाली हिने सात महिन्यांपूर्वी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली आहे. याबद्दल सोनालीच्या माहेरच्या नातेवाईकांनी विकास आणि त्याची आई पुष्पलता आपल्या मुलीच्या आत्महत्येस जबाबदार असल्याची तक्रार शहापूर पोलीस स्टेशन मध्ये केली होती. या तक्रारीचा तपास शहापूर पोलीस स्टेशन मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक (ASI) आर बी क्षीरसागर हे करत होते. पोलीस तपासात विकास व त्यांची आई पुष्पलता यांना अटक होऊन पुष्पलता यांना दोन महिन्यात जामीन झाला तर विकासला चार महिन्यांनी जामीन झाला. जेल मधून सुटल्या नंतरही विकासची मनस्थिती नीट नव्हती. त्याने उल्हासनगरचे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रगडे यांना स्वतःला झालेला त्रास वेळोवेळी सांगितला होता. यात प्रामुख्याने तपास अधिकारी आर बी क्षीरसागर हे त्रास देत असून गुन्हा दाखल न करण्यासाठी लाखो रुपयांची मागणी करीत आहेत व आपल्याकडे इतके पैसे नाहीत ही आपली हतबलता देखील बोलून दाखवली होती.

विकास केदार यांनी मृत्यू पूर्वी जी चिट्ठी लिहिली त्यात पोलीस तपास अधिकारी यांना लाखो रुपये देण्यास नव्हते म्हणून आपल्यावर खोटा गुन्हा दाखल झाला, त्यात आपल्या आईला जेल मध्ये जावे लागले याचा अधिक धक्का आपल्याला असून. माझ्या मागे मुलगी आर्या हिला बघणारे कुणी नाही आणि मी आपली आई व बहीण यांच्यावर तिचे ओझे टाकू इच्छित नसल्याचे चिट्ठी म्हटले आहे.

तपास अधिकारी आर बी क्षीरसागर याने जो माझ्यावर अन्याय केला त्याचा तळतळाट त्याला भोगावा लागणार असे देखील चिट्ठी नमूद असून आपण जाऊन आता सोनालीला माझा काय दोष आहे हे विचारणार आहोत.

पोलिसांना द्यायला पैसे नसल्याने अनेक जण जेल मध्ये खितपत पडले असल्याचे देखील चिट्ठीत लिहिले आहे. याप्रकरणी समाजसेवक शिवाजी रगडे यांनी शहापूर पोलीस ठाण्यात भेट दिली असून जो पर्यंत विकास केदारे व मुलीच्या आत्महत्येस जबाबदार असलेला पोलीस अधिकारी आर बी क्षीरसागर यांच्या विरोधात गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत दोघांचे मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगितले .

त्यावेळी शहापूरचे पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी याप्रकरणी शिवाजी रगडे यांच्या सोबत बोलून आपण याप्रकरणात सखोल तपास करून दोषी व्यक्ती कायद्याच्या समोर आणू असे आश्वासन दिल्यावर दोघांचे मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतले. मृतांच्या वर उल्हासनगर सम्राट अशोक नगर येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. याप्रकरणात पोलीस उप अधीक्षक नवनाथ ढवळे यांनी चार दिवसांचा वेळ तपासा करिता मागितला असून , पोलीस तपासाच्या नंतरच सत्य काय ते समोर येईल.

Updated : 16 March 2022 8:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top