'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात शेतकऱ्यांच्या रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या' ; सामनातून भाजपवर निशाणा
X
'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात शेतकऱ्यांच्या रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. हा स्वातंत्र्याचा 'रक्त महोत्सव' म्हणायचा का? हे काय सुरू आहे आपल्या देशात?' अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
सोबतच प्रियांका गांधी यांची लढाई शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठीच आहे. प्रियांका गांधी यांना अटक करुन त्यांचा आवाज आणि शेतकऱ्यांचा आक्रोश दडपून टाकता येईल, असे जर सरकारला वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. असं आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्या सरकारचा धिक्कार असो! असंही सामनातून म्हटले आहे. या सरकारने सर्व सरकारी संपत्ती खासगी लोकांना विकून टाकली आता शेतजमिनींचा लिलाव सुरू झाला आहे. आणि या मनमानीविरोधातच शेतकरी उभा ठाकला आहे. पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकायला हवे. प्रियांका गांधी यांची लढाई शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठीच सुरू आहे. नव्या ईस्ट इंडिया कंपनीकडे देश सोपवला जाऊ नये यासाठीचा लढा देणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्या सरकारचा धिक्कार असो! अशी संतप्त भावना सामनातून व्यक्त करण्यात आली आहे.
योगी सरकारने प्रियांका गांधी यांना अटक केली, मागील 36 तासांपासून त्यांना सीतापूरमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले होते. ज्या घाणेरड्या जागेत प्रियांका गांधी यांना नजरकैद करून ठेवले होते त्या जागेत प्रियांका गांधी यांना स्वतः साफसफाई करावी लागत होती. हातात झाडू घेऊन कचरा काढणाऱ्या प्रियांका गांधी यांचा एक व्हिडीओ जगभरात व्हायरल झाल्याने आपल्या देशाची छिःथू होत आहे असं सामनातून म्हटले आहे.
देशासाठी असीम त्याग करणाऱ्या व पाकिस्तानचे तुकडे करुन हिंदुस्थानच्या फाळणीचा सूड घेणाऱ्या महान इंदिरा गांधींच्या प्रियांका गांधी 'नात' आहेत, याचे तरी भान प्रियांका गांधी यांना बेकायदेशीरपणे कैद करणाऱ्यांनी ठेवायला हवे होते असं सामनात म्हटले आहे






