Home > News Update > आषाढी एकादशीसाठी एसटी महामंडळ सज्ज…

आषाढी एकादशीसाठी एसटी महामंडळ सज्ज…

आषाढी एकादशीसाठी एसटी महामंडळ सज्ज…
X

आषाढी एकादशीनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना होणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळ पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. दोन वर्षे कोरोनाच्या संकटानंतर यंदा पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी एसटी महामंडळातर्फे सुमारे ४ हजार ७०० विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी बुधवारी केली.

६ जुलै ते १४ जुलै, २०२२ दरम्यान या विशेष गाड्या धावणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहोळ्यासाठी (८ जुलै रोजी) २०० बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात्रेसाठी मुंबईसह, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या सहा प्रदेशांतून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त महाराष्ट्रातून पंढरपूर येथे जाणारे वारकरी तसेच भक्तांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करतानाच लाखो भाविक प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्यासाठी एसटीचे चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी तसेच अधिकारी वर्गही अहोरात्र कार्यरत राहणार आहेत, अशी माहितीही मंत्री, ॲड. परब यांनी दिली.

गेली दोन वर्षे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे रवाना होणाऱ्या पालख्यांचा सोहळा साधेपणाने करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या. त्यानुसार कोरोनाचे संकट असतानाही आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्य सरकारने राज्यातील मानाच्या पालख्या बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी एसटी महामंडळाने विशेष बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या. कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर दोन वर्षांनतर यंदा वारी सोहोळा होणार आहे. पंढरपूरची आषाढी यात्रा हा महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेचा जिव्हाळ्याचा विषय आहे. यामध्ये एसटीच्या प्रवाशी वाहतुकीला अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूर पर्यंत घेऊन जाणे तसेच विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सुखरूपपणे घरी आणून सोडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी एसटीवर असते. त्यापार्श्वभूमिवर एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. शेखर चन्ने यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पंढरपूर येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीत विविध मुद्यांवर उहापोह करीत आढावा घेण्यात आला. त्यानंतर आज एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी पंढरपूर यात्रेसाठी सुमारे ४७०० गाड्या सोडण्यात येणार असल्याचे जाहिर केले. औरंगाबाद प्रदेशातून १२००, मुंबई ५००, नागपूर १००, पुणे १२००, नाशिक १००० तर अमरावती येथून ७०० अशा प्रकारे यात्रेसाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

चार तात्पूरर्ती बस स्थानके उभारणार

पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून गाड्या सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पूर्ती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यान, यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक… अशा विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार असून जास्तीत जास्त भाविक-प्रवाशांनी, एसटीच्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बसस्थानकांचे नियोजन

पंढरपूर येथे यात्रेसाठी येणाऱ्या व जाणाऱ्या भाविकांसाठी पुढीलप्रमाणे बस स्थानके व जिल्हानिहाय सोडण्यात येणाऱ्या बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.


आषाढी एकादशीसाठी एसटी महामंडळ सज्ज…

१. चंद्रभागा बसस्थानक - मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे विभाग व पंढरपूर आगार

२. भिमा यात्रा देगाव - औरंगाबाद, नागपूर व अमरावती प्रदेश

३. विठ्ठल कारखाना - नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर

४. पांडुरंग बसस्थानक - सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग

Updated : 15 Jun 2022 1:18 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top