Home > News Update > श्रीलंकेत बुरखा बंदी आणि हजारांच्यावर इस्लामिक शाळा बंद होणार

श्रीलंकेत बुरखा बंदी आणि हजारांच्यावर इस्लामिक शाळा बंद होणार

जागतिक पातळीवर नवीन वादाला तोंड फोडणारा निर्णय श्रीलंकेच्या सरकारने घेतला आहे.

श्रीलंकेत बुरखा बंदी आणि हजारांच्यावर इस्लामिक शाळा बंद होणार
X

श्रीलंकेमध्ये मुस्लिम स्त्रियांना बुरखा वापरण्यास बंदी घालण्याचा निर्णय श्रीलंकेचे गृहमंत्री सरथ वीरास्केरा यांनी जाहीर केला आहे. याचबरोबर हजारांपेक्षा जास्त इस्लामिक शाळा बंद करण्याचा निर्णयसुद्धा घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यासंदर्भातला प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

काही मुस्लिम महिला त्यांचा संपूर्ण चेहरा झाकला जाईल असा पेहराव करत असल्याने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे वीरास्केरा यांनी सांगितले आहे. सुरुवातीच्या काळात मुस्लिम महिला आणि मुली बुरखा परिधान करत नव्हत्या. पण आताच हा धार्मिक अतिरेकीपणा वाढल्याचे दिसते, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आम्ही यावर बंदी आणणारच असेही त्यांनी सांगितले आहे.

त्याचबरोबर वीरास्केरा यांनी सांगितले की हजारांच्यावर मुस्लिम मदरशांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोऱणाची अंमलबजावणी होत नसल्याने त्यांच्यावरही बंदी आणण्याचा विचार सरकार करत आहे. कुणीही शाळा सुरू करुन मुलांना वाटेल ते शिकवू शकत नाही असेही त्यांनी म्हटले आहे. श्रीलंकेच्या सरकारने गेल्यावर्षी कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या मुस्लिमांच्या पार्थिवांचे दफन करण्याऐवजी दहन केले होते. यावर अमेरिका आणि काही आंतरराष्ट्रीय संघटनांनी टीका केल्यानंतर हा निर्णय बदलण्यात आला होता.

Updated : 13 March 2021 1:52 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top