Home > News Update > CAA च्या रस्त्यावरच्या लढाईला, आता भाजपचं डिजीटल उत्तर

CAA च्या रस्त्यावरच्या लढाईला, आता भाजपचं डिजीटल उत्तर

CAA च्या रस्त्यावरच्या लढाईला, आता भाजपचं डिजीटल उत्तर
X

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात निदर्शनं झाल्यानंतर घाबरलेल्या सत्ताधारी भाजपने त्यांच्या बाजूने पाठिंबा मिळविण्यासाठी अनेक प्रयत्न सुरु केले आहेत. या कायद्याच्या समर्थनार्थ देशातील प्रत्येक राज्यातील भाजपचे नेते या कायद्याच्या समर्थनार्थ रॅली काढून या कायद्याच्या बाजूने वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

यासाठी पक्षाने आपल्या प्रत्येक मंत्र्याला, खासदाराला, आमदाराला, पदाधिकाऱ्यांना यांना घरोघरी जाण्यास सांगितले आहे. पक्षाच्या वतीनं देशभरात पत्रकार परिषद घेतल्या जात आहेत. हे सर्व केल्या नंतरही पक्षाला असं वाटलं असेल की, हे सर्व करुनही काही कमी राहिली असेल म्हणून या कायद्याला समर्थन मिळवण्यासाठी त्यांनी एक नंबर जाहीर केला आहे.

या नंबरला मिस्ड कॉल करण्याचे आवाहन खुद्द अमित शहा यांनी केलं आहे. आता हे करण्यामागे कदाचित भाजपाला असं वाटत असावं की, या कायद्याला देशातच नाही तर देशाच्या बाहेर विरोध केला जाऊ शकतो. म्हणून पक्षाने ही योजना आणली असावी.

मात्र, या नंबरवर जास्त मिस्ड कॉल यावेत म्हणून वेगळी शक्कल कोणीतरी लढवल्याचं दिसून येत आहे.

त्यामुळं हा नंबर सोशल मीडियावर जाहीर करतात लोकांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. कारण पक्षाने जो नंबर जाहीर केला होता. त्यानंबरवर आता लोक विनामूल्य इंटरनेट टाटा सहित एकटे असाल तर बोलण्यासाठी कॉल करा यासारख्या ऑफर देत आहेत. भाजपने 8866288662 हा नंबर जाहीर केला आहे.

सोशल मीडियावर या क्रमांकाबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळं या नंबरला सोशल मीडियावर तमाशा चं स्वरूप आलं असलं तरी या नंबर ला अधिक पाठींबा मिळावा म्हणून हा नंबर असा व्हायरल करण्यात आला तर नाही ना? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

3 जानेवारी रोजी देशाचे गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या ट्विटर आणि फेसबुक अकाउंटवर या कायद्याच्या बाजूने पाठिंबा मागितला होता. शाह यांनी यासाठी ट्विटर वर एक नंबर शेअर केला होता.

मैं सभी देशवासियों से अपील करता हूँ कि प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी द्वारा पाकिस्तान, बांग्लादेश और अफगानिस्तान से आए अल्पसंख्यकों को न्याय व अधिकार देने वाले CAA पर अपना समर्थन देने के लिए 8866288662 पर missed call दें।#IndiaSupportsCAA pic.twitter.com/BYPuoU2oIN

— Amit Shah (@AmitShah) January 3, 2020

हा नंबर शेअर करताना असं या ट्विट म्हटलं आहे.

‘मी देशाच्या सर्व नागरिकांना या निमित्ताने अपील करतो की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी पाकिस्तान, बांग्लादेश आणि आफगानिस्तान येथून आलेल्या अल्पसंख्यांकाना न्याय व अधिकार देण्यासाठी CAA ला समर्थन देण्यासाठी 8866288662 ला मिस्ड कॉल द्या, असे मी आवाहन करतो.'

अमित शहा यांच्यानंतर भाजपच्या सर्व नेत्यांनी हा नंबर सोशल मीडियावर व्हायरल करण्यास सुरवात केली. आणि लोकांना कायद्याच्या समर्थनार्थ या नंबरवर मिस कॉल देण्यास सांगितले. परंतु काही तासांनंतर, ट्विटरवरील काही लोकांनी हा नंबर घेतला आणि त्यांनी या नंबरबद्दल काय ट्विट केले ते पहा.

हा नंबर सेव्ह करुन मला कॉल करा, असं सृष्टी शर्मा यांनी ट्विटवर म्हटलं आहे. तर दुसरीकडे विनीता हिंदुस्थानी नावाच्या ट्विटर हँडलने ट्विट केलं आहे की, हा तिचा नंबर आहे, आणि ती फ्री आहे. तुमच्या कॉलची प्रतीक्षा करीत आहे. या दोनही ट्विट चे स्क्रीनशॉट खूप व्हायरल होत आहेत.

Courtesy : Social Media

आंचल नावाच्या ट्विटर वरुन ट्विट केले आहे की, एकटे आहेत का, माझ्याशी मैत्री कराल का? अशाच प्रकारे पवन दुर्रानी नावाच्या व्यक्तीने केलेल्या ट्विटचा स्क्रीनशॉट देखील व्हायरल होत आहे. त्यात म्हटले आहे की ज्यांना विराट कोहली वर्षाचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून नामांकित व्हायचे आहे. त्यांनी या नंबरवर मिस कॉल द्या.

Courtesy : Social Media

सुशांत कुमार राय आणि हार्दिक भावसार नावाच्या ट्विटर हँडलने लिहिले आहे की, हा त्याच्या जुन्या प्रियसीचा नंबर आहे आणि त्यावर लोक मिस कॉल करू शकतात.

Courtesy : Social Media

ट्विट चोर नावाच्या ट्विटर हँडलने ट्विट केले आहे की, या क्रमांकावर कॉल करा, क्विझ खेळा आणि दहा लाखांपर्यंत पैसे मिळवा.

या नंबरवर मिस कॉल देऊन नेटफ्लिक्सला 6 महिने सबस्क्रिप्शन फ्री मिळू शकते असं देखील ट्वीट काही लोकांनी केलं आहे. त्यानंतर स्वत: नेटफ्लिक्सनं यावर स्पष्टीकरण दिलं आहे. हे सर्व खोटं असल्याचं नेटफ्लिक्सनं स्पष्टीकरण दिलं आहे.

नोकरीसाठी संपर्क साधण्यासाठी बर्‍याच लोकांनी हा नंबर दिला, काही लोक म्हणाले की मोदी जी 10 लाखांचे वितरण करीत आहेत, त्यांना मिळाले आहे, तुम्हाला हवे असल्यास या नंबरवर तुम्ही मिस कॉल करू शकता.

लेखक आणि दिग्दर्शक अविनाश दास यांनी अशाच एका ट्वीटचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे. भक्त अशी गोळा केली जात आहेत. असं त्यांनी त्यांच्या ट्विट मध्ये म्हटलं आहे.

त्यामुळं या कायद्याला मिस्ड कॉल द्वारे समर्थन मिळवण्यासठी अशा प्रकारे ट्विट केले जात य़ाहेत का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो. अशा प्रकारे समर्थन मिळणार का?

देशाच्या बर्‍याच भागातील लोक या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत, आंदोलन करत आहेत, पोलिसांच्या कारवाईला सामोरे जात आहेत. आणि सरकारला आपण या कायद्याच्या विरोधात असल्याचं छाती ठोकपणे सांगत आहे.

अशा परिस्थितीत रस्त्यावरची लढाई भाजप ने डिजीटल स्वरुपात लढण्याचा प्रयत्न केला. समर्थन मिळवण्यासाठी दिलेला नंबर अशा प्रकारे व्हायरल करण्यात आला आहे. यावरुन लोकांच्या भावना कायद्याच्या विरोधात असल्याची जाणीव तर भाजपला झाली नाही ना? जरी भाजपने या मिस्ड कॉल वरुन या कायद्याला इतक्या लोकांचं समर्थन आहे. असं जाहीर जरी केलं तरी भाजपच्या या यादीवर मेंदू शाबूत असलेली लोक विश्वास ठेवतील का?

एकंदरीत, जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशासाठी निश्चितच हे चांगलं लक्षण नाही. मोबाईल मिस्ड कॉलवर समर्थन मिळवून हा देश निश्चित चालत नाही. हा देश इथल्या लोकांच्या मतावर चालतो.डॉ. राम मनोहर लोहिया यांनी म्हटलं आहे की,

अगर सड़कें खामोश हो जांए तो संसद आवारा हो जाएगी

आता संसदेने पारीत केलेला हा कायदा इथल्या जनतेला मान्य नाही. म्हणून ती रस्त्यावर उतरताना पाहायला मिळत आहे. मात्र, सरकार रस्त्यावर उतरलेल्या या लोकांना खामोश करण्याचा प्रयत्न करत आहे.

Updated : 5 Jan 2020 11:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top