Home > News Update > म्हणून नाले भरले! मुख्यमंत्री महापालिकेच्या मदतीला

म्हणून नाले भरले! मुख्यमंत्री महापालिकेच्या मदतीला

म्हणून नाले भरले! मुख्यमंत्री महापालिकेच्या मदतीला
X

तुफान पावसामुळे अवघी मुंबापुरी कोलमडून गेलीय. नालेसफाई, पावसाळापूर्व सज्जता या सर्वाची पोलखोल झालीय. एकीकडे पावसाचा सडकून मारा तर दुसरीकडे महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचा बुरखा जनता आणि विरोधक फाडत आहेत. अशाप्रकारे चहूबाजूंनी चक्रव्यूहात अडकलेल्या मुंबई महापालिकेला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावले आहेत.

पावसाचं प्रमाण जास्त असल्याने नाले भरले, असे सांगून मुख्यमंत्री महापालिकेची कातडी वाचवत आहेत. मालाडमध्ये भिंत कोसळून १८ जणांचा मृत्यू झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख राहत असलेल्या वांद्रे येथील कलानगर परिसरात पाणी साचल्याने तेथेही लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे विरोधकांनी शिवसेनेने करून नाही तर भरून दाखविले, अशी टीका होत आहे. यावर पाणी तुंबलंय की नाही याच्या राजकारणात न जाता, मुंबईकरांना तातडीने दिलासा कसा देता येईल हे पाहणं महत्त्वाचं आहे. नालेसफाई झाली नाही असं म्हणता येणार नाही.

पावसाचं प्रमाण अत्यंत जास्त आहे, त्यामुळे नाले दुथडी भरून वाहत आहेत. तसेच भरती असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचण होतेय, असं माध्यमापुढे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेची पाठराखण केली आहे. मुख्यमंत्र्यांनी पालिकेच्या आपत्कालीन विभागाला भेट देऊन शहरातील व्यवस्थापनेचा आढावाही घेतला.

Updated : 2 July 2019 7:18 AM GMT
Next Story
Share it
Top