Home > News Update > सर, दुःखद अंतःकरणानं तुम्हाला अखेरचा "जय महाराष्ट्र!" - डॉ. समीरण वाळवेकर

सर, दुःखद अंतःकरणानं तुम्हाला अखेरचा "जय महाराष्ट्र!" - डॉ. समीरण वाळवेकर

सर, दुःखद अंतःकरणानं तुम्हाला अखेरचा जय महाराष्ट्र! - डॉ. समीरण वाळवेकर
X

सर, आज तुमच्या जाण्यानं मन विद्ध झालंय. तुमच्या सोबत घालवलेली अनेक वर्षं अविस्मरणीय आहेत.तुमचा खूप महत्वाचा प्रवास मला जवळून पाहता आला.अर्थात माध्यमकर्मी असल्यामुळेच, आणि दूरदर्शन मुळेच. विशेषतः मुख्यमंत्रीपद आणि लोकसभेच्या अध्यक्षपदाची कारकीर्द. वाट सोपी नव्हती.शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळापासून अगदी काही वर्षांपूर्वी पर्यंत खूप संघर्ष करावा लागला, पण तुम्ही डगमगला नाहीत. तुमच्या चतुर स्वभावाची, कुशाग्र बुद्धिमत्तेची,राजकीय डावपेचांची, एकनिष्ठता, व्यावसायिक उद्योजकतेची त्या सहवासात, अनुभवात सतत प्रचिती येत गेली. विविध वाहिन्यांची भाऊगर्दी नसताना फक्त दूरदर्शन असताना बातम्यांचा संपादक म्हणून मला तुमचा मोठा सहवास लाभला. तुमच्याबरोबर खूप फिरता आलं.

तुम्ही विश्वासानं अनेक ठिकाणी मला सोबत घेऊन जायचा ! कार्यालयात, घरी, गाडीत असो की विमानात, अनेक खाचाखोचा, त्यांचे अन्वयार्थ, मतितार्थ, राजकीय, सामाजिक परिणाम समजाऊन सांगायचात. नगरसेवक, महापौर, आमदार, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय मंत्री, लोकसभाध्यक्ष. प्रदीर्घ सहा दशकांची जबरदस्त राजकीय कारकीर्द! शिवसेनेचया सथापनेपासून बाळासाहेबांच्या कायम सोबत.तुमच्या मुख्यमंत्रीपदी नेमल्या जाण्या आधी पासून ते राजिनाम्या पर्यंत, तुम्ही लोकसभाध्यक्ष असताना सुदधा अनेक क्षणांचा मी साक्षीदार होतो.कित्येकदा तुमच्या पहिल्या प्रतिक्रिया घेताना तुमची मनातील घालमेल लपवून चेहरा कर्तव्यकठोर ठेवायचात, आणि योग्य वाटेल, सतसद्विवेक बुद्धिस पटेल तेच करून मोकळे व्हायचाच! कित्येकदा कॅमेरा बंद करायला लाऊन मनातली खदखद व्यक्त करून निघून जायचात! तुम्हाला लोकसभाध्यक्ष करण्यासाठी प्रमोद महाजनांनी तुमच्या नावाचा बाळासाहेबांकडे धरलेला आग्रह आणि तुमची झालेली निवड, लोकसभेतील अनेक पेचप्रसंग सोडवण्या पर्यंत प्रत्येक वादळी क्षणी तुमचा अनुभव, वाजपेयीजी अडवाणींजींसारख्या दिग्गजांबरोबरचा सहवास,राष्ट्रीय हितास सर्वोच्च प्राधान्य, सुसंस्कृत स्वभाव, संवेदनशीलता आणि प्रसंगी कर्तव्य कठोरपणा मला प्रत्यक्ष अनुभवता आला. मिश्कीलपणा, हजरजबाबी स्वभाव, आणि सभ्यपणा सोबतच तुमच्यातला जातीवंत शिक्षक समोरच्यावर जरब बसवत असे.

कोणालाच कोणतीहि अवास्तव वचनं नाहीत,जमेल तितकंच बोलणं आणि कायद्याच्या चौकटीत निर्णय घेणं! शब्दात कधी तुम्ही अडकायचा नाहीत, बाळासाहेबांचा शब्द अंतिम असला, तरी घेतलेली पदाची शपथ कधी विसरला नाहीत. काही निर्णय इच्छेविरुद्ध घ्यावे लागले, पण पक्षांतर्गत पातळीवर निर्णय ठामपणे मांडत राहिलात, राजीनाम्याला कधीच घाबरला नाहीत! कॅमेरयापुढेहि अनेकदा तो खिशातून काढून दाखवलात!स्पष्ट सल्ले देत गेलात, ठाम मतं मांडत गेलात. त्याची किंमतही तुम्हाला मोजावी लागली. आदेश मिळताक्षणी राजिनामा राज्यपालांकडे सोपवून मोकळे झालात! इतर पक्षातील धुरिणांशी सर्वात उत्तम संबंध राखलेत. एक माणुस म्हणून तुम्ही संवेदनशील होतातच, पण खूप कष्टातून वर आलेले उद्योजक म्हणूनही यशस्वी झालात. समाजकारण, राजकारणातल्या सर्वोच्च पदांवर विराजमान झालात, पण तुमचे पाय जमिनीवर होते. कोहिनूर च्या रुपानं तुम्ही तरुणांना तांत्रिक शिक्षण देऊन रोजगाराला लावलं, नंतर तर नोकऱ्या करणारे नाही तर देणारे उदयोजक होण्याचा सल्ला दिलात.


आयुष्याच्या उत्तरार्धात अपमान झाले तरी पक्षातल्या, राजकारणातल्या विरोधकांशी, शत्रुंशीहि त्यांची प्रतिष्ठा ठेऊन वागलात! आपली सुसंस्कृत पातळी, पक्षनिष्ठा, विचारांची बांधिलकी कधीच अखेर पर्यंत सोडली नाहीत.

तुमच्या स्वभावातील पैलूंवर, कारकीर्दीवर, सहवासातील अनुभवांवर वेगळं लिहावंच लागेल.तुमचा सहवास खूप शिकवून गेला, राजकारणा विषयीच्या जाणीवा समृद्ध करून गेला. आत्मसन्मान, स्वप्रतिष्ठेपेक्षा काहीच मोठं नसतं, हेहि सांगून गेलात!शिवसेनेच्या इतिहासात तुम्ही बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू लढवय्या शिलेदार, सुसंस्कृत, अनुभवी,धुरंधर, चाणक्यच होता! तुमच्या जाण्यानं शिवसेनेचंच नव्हे, तर महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे.सर, दुःखद अंतःकरणानं तुम्हाला अखेरचा "जय महाराष्ट्र!"

Updated : 23 Feb 2024 8:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top