Home > News Update > Sindhudurg : ठाकरे गटाला फारसं यश मिळालं नाही – आमदार निलेश राणे

Sindhudurg : ठाकरे गटाला फारसं यश मिळालं नाही – आमदार निलेश राणे

हा एकट्याचा नव्हे, जनतेचा विजय– आमदार निलेश राणे शिवसेना (शिंदे गट)

Sindhudurg : ठाकरे गटाला फारसं यश मिळालं नाही – आमदार निलेश राणे
X

सिंधुदुर्ग: नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांच्या निकालांनंतर शिवसेना (शिंदे गट) आमदार निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देताना ठाकरे गटावर टीका केली आहे. “या निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) ला फारसं यश मिळालं नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

निलेश राणे म्हणाले, “हा विजय कोण्या एकाचा नसून जनतेचा विजय आहे. जनतेने आम्हाला आशीर्वाद दिले. जिल्हाप्रमुख सामंत, आमचे नेते, मुख्य नेते सन्माननीय एकनाथ शिंदे, नारायण राणे तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे हा विजय मिळाला आहे. जनतेने निवडून दिलंय, म्हणून हा खरा जनतेचा विजय आहे.”

पैसे वाटपाच्या आरोपांवर प्रत्युत्तर

विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या पैसे वाटपाच्या आरोपांवर बोलताना राणे म्हणाले, “आज विजयाचा दिवस आहे. गेली २५ दिवस तुमचे विषय होते, आज आमच्या कार्यकर्त्यांना आनंद साजरा करू द्या.”

कणकवली नगराध्यक्ष निवडणुकीवर भाष्य

कणकवली नगराध्यक्ष निवडणुकीबाबत प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “आज भावना मिश्र आहेत. एका डोळ्यात आनंद आहे, तर दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहेत. मालवणचा विजय पूर्ण समाधान देणारा आहे, मात्र कणकवलीत आमची माणसं पराभूत झाली याचं दुःख आहे. आम्ही तिथे सपोर्ट केला होता, मात्र नाती आणि कुटुंबीय संबंधही होते. संदेश पारकर जिंकले, त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो.”

ते पुढे म्हणाले, “निवडणूक असते, कोणी जिंकतं, कोणी हरतं. पण जनतेने आम्हाला निवडून दिलं याचं समाधान आहे. आता आमच्यावर जबाबदारी वाढली आहे. पुढील पाच वर्ष लोकांना ठोस परिणाम देण्यासाठी आम्ही मेहनत घेऊ आणि जनतेला अपेक्षित असलेलं शहर देण्याचा प्रयत्न करू.”

ठाकरे गटावर टीका

ठाकरे गटावर टीका करताना निलेश राणे म्हणाले, “त्यांच्याकडे कोणताही अजेंडा नव्हता, व्हिजन नव्हतं. कशासाठी निवडणूक जिंकायची याचा प्लॅनच नव्हता. त्यामुळे त्यांचा पराभव निश्चित होता. कार्यकर्ते त्यांना सोडून गेले, नेतृत्वाचा अभाव होता आणि गटबाजी मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे ते एकसंघपणे लढू शकले नाहीत.”

जिल्हा परिषद निवडणुकांबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, “सध्या फक्त नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांचे निकाल लागले आहेत. योग्य वेळी त्यावर बोलू.”

Updated : 21 Dec 2025 3:52 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top