Home > News Update > "सत्य परेशान हो सकता है, पराजित नही !"; किरण काळेंच्या समर्थनार्थ शहरभर लावले फलक

"सत्य परेशान हो सकता है, पराजित नही !"; किरण काळेंच्या समर्थनार्थ शहरभर लावले फलक

सत्य परेशान हो सकता है, पराजित नही !; किरण काळेंच्या समर्थनार्थ शहरभर लावले फलक
X

अहमदनगर आयटी पार्कच्या पोलखोल प्रकरणावरून विनयभंगाचा गुन्हा दाखल असणाऱ्या शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या समर्थनार्थ काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, अहमदनगर महिला काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेस, नगर शहर ब्लॉक काँग्रेस, नगर शहर ब्लॉक युवक काँग्रेस, नगर शहर उद्योग व वाणिज्य काँग्रेस विभाग आदी विविध फ्रंटल, सेल यांच्यावतीने नगर शहरामध्ये एमआयडीसी आणि विविध ठिकाणी किरण काळे यांच्या समर्थनार्थ "सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही !" असे फलक लावले आहेत.

या फलकांवरील निषेधाच्या संदेशाची शहरभर चर्चा सुरू झाली आहे. "नीच" राजकारण करत खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करणाऱ्या "त्यांचा" जाहीर निषेध ! असे या फलकावर नमूद करण्यात आले आहे.

शहर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे याबाबत म्हणाले की, किरण काळे हे स्वच्छ आहेत. काँग्रेसचे सर्व पदाधिकारी त्यांच्या बरोबर आहेत.आयटी पार्कची पोलखोल करताना काँग्रेसची टीम त्यांच्याबरोबर होती त्यावेळी असा कुठलाही प्रकार किरण काळे यांनी केलेला नाही. ते सर्व प्रकारच्या पोलीस कारवाईला तसेच अटकेला देखील सामोरे जाण्यासाठी तयार आहेत. मात्र शहराच्या आमदारांच्या या कृत्याची किळस येत असून असे किळसवाणे कृत्य करणारे लोकप्रतिनिधी शहरासाठी घातक आहेत असं गारदे यांनी म्हटले आहे.

आयटी पार्क पोलखोल प्रकरणात विनयभंगाचा खोटा गुन्हा राष्ट्रवादीच्या आमदारांनी पोलीस यंत्रणेवर राजकीय दबाव आणत दाखल करायला लावल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मागील चार दिवसांपासून या विषयावरून नगर शहरामध्ये आरोप-प्रत्यारोपांची राळ उठत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यातील हा संघर्ष रोज तीव्र होताना पाहायला मिळत आहे.

दरम्यान, किरण काळे हे फरार असल्याच्या वावड्या राष्ट्रवादीकडून उठवल्या जात असतानाच काळे यांनी स्वतः त्यावर प्रसिद्धीपत्रकाद्वारे दोन दिवसांपूर्वी मी इथेच असल्याचे स्पष्ट केले होते.

दरम्यान काँग्रेसकडून करण्यात आलेल्या फलक बाजीमुळे अहमदनगरमधील काँग्रेस - राष्ट्रवादीतील वाद टोकाला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Updated : 8 Sep 2021 6:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top