Home > News Update > बोल्टचा उच्चांक मोडून भारताचा श्रीनिवास गौडा जगातला वेगवान धावपटू ठरेल काय?

बोल्टचा उच्चांक मोडून भारताचा श्रीनिवास गौडा जगातला वेगवान धावपटू ठरेल काय?

बोल्टचा उच्चांक मोडून भारताचा श्रीनिवास गौडा जगातला वेगवान धावपटू ठरेल काय?
X

कर्नाटकातील कंबाला ह्या पारंपरिक शर्यतीचा एक विडिओ प्रसारित झाला आणि श्रीनिवास गौडाकडे जगाचं लक्ष गेलं. जागतिक दर्जाचा धावपटू उसैन बोल्ट याचाही उच्चांक गौडाने मोडला असल्याचा दावा समाज माध्यमातून जोरदारपणे करण्यात आला. त्याची दखल केंद्र सरकारने घेतली आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाने गौडाला आपणहून निमंत्रण दिलंय, पण गौडा ते स्वीकारायच्या मनस्थितीत नसल्याची बातमी आहे. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमी निराश झाले आहेत.

कंबाला ही कर्नाटकातील एक प्रतिष्ठित शर्यत आहे. म्हशी किंवा बैलांच्या जोडीसोबत ह्या शर्यतीत धावावं लागतं. तुलू भाषेत कंबालाचा अर्थ चिखलाने भरलेलं शेत असा होतो. 2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जालिकुटू शर्यतीवर बंदी आणली होती. त्यानंतर काही काळ कंबाला शर्यतही अडचणीत आली होती. प्राणिमित्र संघटनांचा अशा शर्यतींना आक्षेप होता. पण काही कडक निर्बंध घालून कर्नाटक सरकारने परवानगी दिली. त्याच कंबालातून श्रीनिवास गौडा हा पिळदार शरीरयष्टी लाभलेला एखाद्या सिनेमाचा नायक शोभावा युवक देशासमोर आला.

श्रीनिवास मूळचा दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मुदाबिद्री गावचा असून, तो बांधकाम मजूर आहे. गेली सात वर्षे तो कंबाला शर्यतीत भाग घेत आहे. पण यंदाचा त्याचा शर्यतीत धावतानाचा विडिओ समाज माध्यमात मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाला आणि श्रीनिवास गौडा हे नाव जगभर गेलं. त्याचं आणखी एक कारण म्हणजे बोल्टशी झालेली तुलना.

100 मीटर अंतर 9.58 सेकंदात कापण्याचा जागतिक विक्रम बोल्टच्या नावावर आहे. कंबाला शर्यतीत तेच अंतर श्रीनिवासने अवघ्या 9.56 सेकंदात कापल्याचा दावा करण्यात येत आहे. अर्थात, आंतरराष्ट्रीय स्तरावर वेळ मोजण्याचे काटेकोर मापदंड आहेत. त्यामुळे स्वत: कंबाला शर्यतीच्या आयोजकांनाच श्रीनिवासची तुलना बोल्टशी करण्याची घाई करू नये, असं वाटतंय. भारताचे क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी उद्योगपती आनंद महिंद्र यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना हीच गोष्ट अधोरेखित केलीय. पण भारतातील कोणतंही कौशल्या दुर्लक्षित राहू नये, यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं रिजिजू यांनी म्हटलंय.

श्रीनिवास ह्याला सरकार स्वतची क्षमता सिद्ध करण्याची संपूर्ण संधी देईल, असं नमूद करताना मंत्रीमहोदयांनी भारतीय क्रीडा प्राधिकरणाला निर्देश दिलेत. त्यानुसार बंगळुरू येथील प्रशिक्षण केंद्रात श्रीनिवासची रीतसर चाचणी घेण्यात येणार आहे.

श्रीनिवास मात्र या चाचणीसाठी फारसा उत्सुक नाही. दोन्ही स्पर्धात फरक असल्याचं मत त्याने विनम्रपणे नोंदवलंय. कंबाला शर्यतीत टाचांवर तर इतर स्पर्धात बोटांवर धावावं लागतं, शिवाय, कंबाला शर्यतीत सहभागी प्राण्यांचीही भूमिका महत्वाची असते, असं त्याने म्हटल्याचं काही वृत्तसंस्थांनी मांडलंय.

आज श्रीनिवासचं बंगळुरूला येणे अपेक्षित होतं. एकदोन दिवस त्याला आराम करू दिल्यानंतर चाचणी घेण्याचं नियोजन क्रीडा प्राधिकरणाने केलंय. पण सरकारने घेतलेल्या पुढाकारला श्रीनिवास गौडा कसा प्रतिसाद देतो, याकडे देशाचं लक्ष लागून आहे.

Updated : 17 Feb 2020 7:17 AM GMT
Next Story
Share it
Top