ट्विटरवर ट्रेन्ड होतोय #ShivSena_Cheats_Maharashtra
X
भाजपनं राज्यात सत्ता स्थापन करण्यात असमर्थता दाखवली आहे. त्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यातला दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलंय. त्यानंतर ट्विटरवर #ShivSena_Cheats_Maharashtra हा हॅशटॅग ट्रेन्ड होतोय.
राज्यात जो निकाल लागला तो भाजप-शिवसेना महायुतीला मिळालेला कौल होता. त्यामुळे राज्यात महायुतीचं सरकार स्थापन व्हायला हवं होतं. मात्र शिवसेनेनं महाराष्ट्राची फसवणूक केली आहे असा सूर या ट्रेन्डमधून उमटत आहे. अर्थात या ट्रेन्डमध्ये सहभागी असणारे सर्वजण हे भाजपशी संबंधित आहेत. भाजपचे नेते आणि कार्यकर्ते आहेत.
या ट्रेन्डमध्ये शिवसेनेनं कसा धोका दिला हे सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे जुने व्हिडीओ पोस्ट करण्यात येत आहेत. याशिवाय देवेंद्र फडणवीस यांनी ५ वर्षांत केलेल्या वेगवेगळ्या विकासकामांचे दावे करण्यात येत आहेत. शिवाय उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना ट्रोल करण्यात येत आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडून राहिली. भाजपकडून मुख्यमंत्रीपद मिळणार नाही असं स्पष्ट झाल्यानंतर सेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार याचा वारंवार पुनरुच्चार केला आहे. शिवसेना उद्या सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे.






