Home > News Update > शिवसेनेनं मराठवाडा वाऱ्यावर सोडला आहे का?

शिवसेनेनं मराठवाडा वाऱ्यावर सोडला आहे का?

शिवसेनेनं मराठवाडा वाऱ्यावर सोडला आहे का?
X

कोरोनाच्या (corona) संकटामुळे राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत. यात औरंगाबाद (Aurangabad) महापालिका निवडणुकीचाही समावेश आहे. पण आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे अनेकांनी आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केली आहे. निवडणूक कधी होईल हे जरी अजून ठरले नसले तरी शिवसेनेसाठी (Shiv Sena) ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. कारण गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मराठवाड्याकडे सत्तेत आल्यानंतर शिवसेनेचे दुर्लक्ष झाल्याची चर्चा आहे.

शिवसेनेचे मराठवाड्याकडे दुर्लक्ष

एकीकडे भाजपने (BJP) राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत मराठवाड्याला प्रतिनिधित्व दिले आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही इथून उमेदवार देत आपली रणनीती स्पष्ट केली आहे. शिवसेनेने संदीपान भुमरे (Sandipan Bhumre)आणि अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना मंत्रिपद दिले असले तरी त्यानंतर मराठवाड्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसतेय.

अब्दुल सत्तार हे निवडणुकीच्या तोंडावर पक्षात दाखल झाले असले तरी त्यांना मंत्रिपद दिल्याने शिवेस़नेच्या निष्ठावंतांमध्ये नाराजी आहे. त्यातच खैरेंसारखा दिग्गज नेता लोकसभेतल्या पराभवानंतर फारसा सक्रीय दिसत नाहीये. राष्ट्रवादीमधून शिवसेनेत आलेले जयदत्त क्षीरसागर (Jaydutt Kshirsagar) यांचा स्वतःचा एक बेस असला तरी पक्षाने त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी दिलेली नाही. त्यामुळे शिवसेना सत्तेत आल्यानंतर औरंगाबाद महापालिकेच्या निमित्ताने पक्षाची पहिलीच अग्नी परीक्षा असेल. त्यासाठी मराठवाड्यात शिवसेनेने खास रणनीती आखण्याची गरज राजकीय विश्लेषक करत आहेत.

शिवसेनेला मराठवाड्यात OBC चेहरा गरजेचा

शिवसेनेला मराठवाड्यात भाजपला शह द्यायचा असेल तर एक चेहरा असणे गरजेचे आहे. त्यातही संपूर्ण मराठवाड्याच्या राजकारणावर बीड जिल्ह्यातील राजकारण परिणाम करते. त्यामुळेच सर्वच राजकीय पक्ष बीड जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळत राहिल असा प्रयत्न करतात. मराठवाड्यातील ओबीसी मतांचा विचार करता भाजपला शह देण्यासाठी शिवसेना जयदत्त क्षीरसागर यांचा विचार करु शकते.

क्षीरसागर यांच्यामुळे भाजपकडे जाणारी ओबीसी मतं शिवसेनेकडे वळू शकतात अस़ही काही विश्लेषकांना वाटते. भाजपच्या पक्षांतर्गत राजकारणामुळे पंकजा मुंडे (Pankaja Munde) अस्वस्थ आहेत, तर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्या या संघर्षाचा फायदा शिवसेनेला होऊ शकतो, पण त्यासाठी पक्षाने आता एका सक्षम नेतृत्वाची निवड करण्याची गरज आहे.

Updated : 5 Jun 2020 2:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top