Home > News Update > शरद पवार – अमित शाह यांच्या कथित भेटीने शिवसेना अस्वस्थ?

शरद पवार – अमित शाह यांच्या कथित भेटीने शिवसेना अस्वस्थ?

शरद पवार – अमित शाह यांच्या कथित भेटीने शिवसेना अस्वस्थ?
X

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कथित भेटीच्या चर्चेने शिवसेना अस्वस्थ असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून या भेटीवर चर्चा करण्यात आलेली आहे. भाजपवर निशाणा साधताना सरकारला अजिबात धोका नाही असाही दावा करण्यात आला आहे. सामनाच्या अग्रलेखात काय टीका करण्यात आली आहे ते पाहूया...

पवार आणि अमित शहा यांच्यामध्ये गुप्त खलबते झाल्याच्या अफवेने दोनेक दिवस चर्चा तर होणारच. या गुप्त बैठकीचा संबंध राज्यातील महाविकास आघाडी सरकारशी लावला जात आहे. अहमदाबादेत भेट झाली म्हणजे दोन नेत्यांचे राज्यातील सरकारबाबत काय ते नक्कीच ठरले असणार व ठाकरे यांचे सरकार दोन दिवसांत गेलेच म्हणून समजा, असा दावा काही लोकांनी केला. मुळात सत्य असे आहे की, अशा प्रकारची कोणतीही गुप्त भेट, गुप्त खलबते झाल्याचा साफ इन्कार पवारांकडून करण्यात आला. देशाचे गृहमंत्री जे कोणी असतील, ते त्यावेळी अहमदाबादेत असतील. ते आणि शरद पवारांसारखे नेते हे समजा एकमेकांना भेटत असतील तर त्यात गैर काय? पण त्यासाठी रात्रीच्या अंधारात रहस्यमय पद्धतीने कोण कशाला भेटतील? ज्या उद्योगपतीच्या घरी ही भेट वगैरे झाल्याचे सांगितले जाते त्याची गुप्त घरे दिल्ली-मुंबईतही आहेत व ही गुप्त भेट अहमदाबादपेक्षा मुंबई-दिल्लीतच अधिक सोयीची झाली नसती काय? पवार-शहांची भेट झाली नाही. त्या न झालेल्या भेटीबद्दल अहमदाबादेत स्वतः अमित शहा यांना पत्रकारांनी भेटीबद्दल विचारले तेव्हा शहा म्हणाले, ''अशा गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात.''महाराष्ट्रात चंद्रकांत पाटील वगैरे नेते तर त्याच पतंगाच्या मांजावरून इतके वर गेले की, ''मोदी-शहा, नड्डा घेतील तो निर्णय आपल्याला मान्य,'' असे सांगून आणखी एका पहाटेच्या शपथविधीच्या स्वप्नरंजनात दंग झाले. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सरकार आलेच अशा थाटात काहीजण वावरू लागले. शरद पवार यांनी शहांची भेट घेतली की नाही हा प्रश्न सोडा,पण विरोधी पक्ष सत्तेसाठी कसा उतावीळ होऊन वळवळ करीत आहे,ते या निमित्ताने दिसले.

मुळात राजकारणात आता काहीच गुप्त वगैरे नसते. जे गुप्त असते ते सगळय़ांत आधी सार्वजनिक होते. शहा-पवारांची बैठक गुप्त होती तर मग बातमी फुटली कशी? अशी गुप्त बैठक तर शहा व उद्धव ठाकरे यांच्यात झालीच होती. त्या गुप्त बैठकीत जे ठरले त्यानुसार न घडल्याने भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले. जसे महाराष्ट्रात ठाकरे सरकार मजबूत आहे तसे भाजपचे विरोधी बाकांवरील स्थान बळकट आहे. त्यामुळे कोणत्याही गुप्त बैठका किंवा खलबतांमधून ठाकरे सरकारला सुरुंग लागेल व विरोधी बाकांवरून सत्ताधारी बाकांवर जाता येईल या भ्रमातून विरोधकांनी बाहेर पडले पाहिजे. पुन्हा भल्या पहाटे मिठाचा खडा टाकून दूध नासवायचा प्रयत्न एकदा भलेही झाला, मात्र आता तसा काही नासवानासवीचा प्रकार होऊ शकणार नाही. एक वेळ दुधात पडलेला मिठाचा खडा बाहेर काढता येईल, पण गुळाच्या ढेपेला होणे कठीण, असा सध्याचा सिद्धांत आहे. शरद पवार यांच्याभोवती संभ्रमाचे वातावरण निर्माण करायचे व गुळाची ढेप वितळवून टाकायची, असे भाजपचे षड्यंत्र असेल तर ते मूर्खांच्याच नंदनवनात फिरत आहेत.

महाविकास आघाडीचे सरकार उत्तम गतीने व नीतीने चालले आहे. लहान सहान वावटळी येतात आणि जातात. त्या वावटळीने झाडाची पानेही गळत नाहीत. इतके झाडाचे बुंधे आणि मुळे मजबूत आहेत.

Updated : 31 March 2021 3:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top