अनिल परब यांना पुन्हा EDची नोटीस, हजर राहावे लागणार
X
एकीकडे शिवसेनेला राज्यसभे पाठोपाठ विधान परिषद निवडणुकीत धक्का बसलेला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी अनिल परब यांना पुन्हा एकदा EDची नोटीस आली आहे. अनिल परब यांना २१ जून रोजी म्हणजे मंगळवारी EDसमोर हजर राहावे लागणार आहे.
दापोलीमधील रिसॉर्ट प्रकरणी सध्या EDतर्फे चौकशी सुरू आहे. याआधी अनिल परब यांना दोनवेळा EDची नोटीस आली आहे. दुसऱ्या नोटीस आली तेव्हा परब हे शिर्डीला पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे गेले असल्याने EDसमोर हजर झाले नव्हते. पण आता EDने तिसऱ्यांदा नोटीस बजावली आहे. त्यामुळे अनिल परब इडीसमोर हजर होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत शिवसेनेच्या अनेक नेत्यांना EDने चौकशीसाठी बोलावले आहे. यामध्ये अनिल परब, मुख्यमंत्र्यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर, भावना गवळी, यशवंत जाधव यांच्यासह आणखी काही नेत्यांवर केंद्रीय यंत्रणांना कारवाई केली आहे.
दरम्यान चौकशीमध्ये ईडीला संपूर्ण सहकार्य करत असल्याची प्रतिक्रिया अनिल परब यांनी याआधी दिली आहे. तसेच भाजपने राजकीय सूडबुद्धीने महाविकास आघाडीतील नेत्यांविरुद्ध केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापर केला आहे, असाही आरोप शिवसेना आणि इतर नेत्यांनी वारंवार केला आहे. अनिल परब यांना या आधी एकदा ईडीने १०० कोटी रुपये वसुलीच्या प्रकरणातही नोटीस बजावली होती.