Home > News Update > पुराच्या गारठ्यात शिवाजी विद्यापीठाच्या आपुलकीची ‘ऊब’

पुराच्या गारठ्यात शिवाजी विद्यापीठाच्या आपुलकीची ‘ऊब’

पुराच्या गारठ्यात शिवाजी विद्यापीठाच्या आपुलकीची ‘ऊब’
X

कोल्हापूरचं शिवाजी विद्यापीठ म्हणजे इथल्या स्थानिकांच्या अस्मितेचा, अभिमानाचा विषय आहे. स्थानिक लोकजीवनाच्या आदराचा परमोच्च बिंदू म्हणजे शिवाजी विद्यापीठ आहे. सध्या कोल्हापूरवर कोसळलेल्या आपत्तीच्या प्रसंगी शिवाजी विद्यापीठ सुद्धा इथल्या नागरिकांचं जीवनमान पूर्वपदावर आणण्यासाठी हरेक तऱ्हेने प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून आपत्तीच्या क्षणी तातडीने पूरग्रस्तांसाठी निवारा कॅम्प सुरू करून तिथे सुमारे साडेतीनशे आपत्तीग्रस्तांची अतिशय उत्तम सोय विद्यापीठानं केली. त्यांच्या राहण्या-खाण्यासह आरोग्य-वैद्यकीय सुविधांचीही दक्षता घेतली. त्याला दातृत्वशाली, सेवाभावी नागरिक, संस्था यांची मोलाची मदत झाली.

त्याचप्रमाणं कोल्हापूर शहरातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे सावट ओळखून गेल्या चार दिवसांत शिवाजी विद्यापीठाच्या जलशुद्धीकरण केंद्रामधून सुमारे दहा लाख लीटरहून अधिक पाणी शहरवासीयांना उपलब्ध करून देण्यात आलं. कोल्हापूर जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी आणि महापुरामुळे शहराला पाणीपुरवठा करणारी महानगरपालिकेची जल शुद्धीकरण यंत्रणा पाण्याखाली जाऊन नादुरुस्त झाली. त्यामुळे सभोवती पुराचे पाणीच पाणी असूनही नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली.

शहरातील ही परिस्थिती लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठानं गेल्या चार दिवसांपासून महानगरपालिका प्रशासनाच्या सहकार्याने आपल्या जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी पालिकेच्या टँकरसह त्यांनी भाड्यानं घेतलेल्या टँकरमधून शहराला पाणीपुरवठा करण्यास सुरवात केली. यामुळं शहरवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. या काळात दिवसाला सरासरी दोन ते अडीच लाख लीटर या प्रमाणं आतापर्यंत सुमारे दहा लाख लीटरच्या घरात पाणीपुरवठा करण्यात विद्यापीठ व पालिका प्रशासनाला यश लाभलंय.

शिवाजी विद्यापीठाने गेल्या चार वर्षांत ‘जलयुक्त विद्यापीठ’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने सातत्यानं प्रयत्न केलेत. तीन मोठे जलाशय, आठ विहीरी सहा शेततळी आदींच्या माध्यमातून सुमारे चाळीस कोटी लीटरची साठवण क्षमता निर्माण करण्यात यशस्वी झालेलं शिवाजी विद्यापीठ गेल्या दोन वर्षांत पाण्याच्या संदर्भात पूर्णतः स्वयंपूर्ण झालंय. पूर्वी पाण्यासाठी महापालिकेच्या यंत्रणेवर अवलंबून असणारं विद्यापीठ गेल्या दोन वर्षांपासून पालिकेकडून पाणी घेत नाही. यामुळं विद्यापीठाच्या खर्चातही मोठी बचत झालीय. त्यापुढं जाऊन विद्यापीठानं आपल्या कॅम्पसवर आर.ओ. जल शुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित केलाय. यामुळं कॅम्पसवर कुलगुरूंपासून ते उपाहारगृहात आलेल्या अभ्यागतापर्यंत प्रत्येकाला समान दर्जाचं शुद्ध पाणी प्यावयास मिळतं.

या पार्श्वभूमीवर, यंदा विद्यापीठाने महापूर स्थितीत पाणीटंचाईग्रस्त असलेल्या कोल्हापूर शहराला आपल्या क्षमतेनुसार दिवसाला सरासरी दोन ते अडीच लाख लीटर इतकं शुद्ध पाणी पुरविण्यात यश मिळवलंय. महापालिकेच्या टँकरसह सर्वसामान्य नागरिकांची सुमारे चारशे ते पाचशे वाहनं कॅम्पसवरुन दैनंदिन पिण्याचं पाणी घेऊन जाताहेत. आपत्तीच्या परिस्थितीत विद्यापीठानं शहरवासियांना दिलेला हा दिलासा खरंच मोठाय!

जिल्ह्याच्या अनेक भागांत पूर आल्याने आणि तेथील पिकेच्या पिके पाण्याखाली गेल्याने मुक्या जनावरांचा चारा-वैरणीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन गेल्या चार दिवसांत सुमारे चाळीस ट्रॉली इतका चारा विद्यापीठाच्या कॅम्पसवरुन आपत्तीग्रस्त भागातील जनावरांसाठी विद्यापीठानं उपलब्ध करून दिलाय.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील यांच्यातील सामाजिक जाणिवेमुळंच या साऱ्या बाबी शक्य झाल्यात, हे नाकारता येणार नाही. त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझे अनेक सहकारी शिक्षक, वसतीगृहांचे रेक्टर, प्रशासकीय अधिकारी कर्मचारी अथक आणि अखंडितपणे काम करताहेत... या साऱ्यांच्या सामाजिक बांधिलकीलाही या निमित्ताने सलाम!

- अलोक जत्राटकर

Updated : 15 Aug 2019 1:33 PM GMT
Next Story
Share it
Top