News Update
Home > News Update > भाजपच्या 'ट्विटर' सेनेची दाणादाण उडत आहे: सामना

भाजपच्या 'ट्विटर' सेनेची दाणादाण उडत आहे: सामना

भाजपच्या ट्विटर सेनेची दाणादाण उडत आहे: सामना
X

'ट्विटर'चे राजकीय महत्त्व भाजपसाठी संपले आहे. भाजपच्या खोटय़ानाटय़ा प्रचारास 'अरे ला कारे' जोरात सुरू आहे.अनेक ठिकाणी 'ट्विटर'च्या रणमैदानातून भाजपला, त्यांच्या सरकारला माघार घ्यावी लागत आहे आणि त्यांच्या 'ट्विटर' सेनेचीही दाणादाण उडत आहे. 'ट्विटर'चा अतिरेकाचा वापर करून भाजप व मोदी 2014 साली विजयी झाले होते. हे कोणत्या नियमात बसत होते? असा खडा सवाल आज सामना संपादकीय मधून उपस्थित करण्यात आला आहे.

ट्विटरवरून सुरू असलेल्या वादावर आजच्या सामना संपादकीय मधून भाजपवर खरपूस टीका करण्यात आली आहे. ट्विटर ही काही हिंदुस्थानसाठी जीवनावश्यक वस्तू किंवा अत्यावश्यक सेवा नाही. जगातल्या अनेक देशांत 'ट्विटर'चा 'ट'ही लोकांना माहीत नाही. चीन, उत्तर कोरियात ट्विटर नाहीच. आता नायजेरियानेही या समाजमाध्यमाची त्यांच्या देशातून हकालपट्टी केली आहे. ट्विटरवरून आता हिंदुस्थानातदेखील वादळ उठले आहे. कालपर्यंत हे ट्विटर म्हणजे भाजप किंवा मोदी सरकारसाठी त्यांच्या राजकीय लढय़ाचा किंवा प्रचाराचा आत्मा होता.

आता भाजपला ट्विटरचे ओझे झाले असून हे ओझे कायमचे फेकून द्यावे या निर्णयाप्रत मोदींचे सरकार आले आहे. देशातील सर्व मीडिया, प्रचार-प्रसारमाध्यमे आज मोदी सरकारच्या पूर्ण नियंत्रणाखाली आहेत, पण ट्विटरसारखी माध्यमे बेलगाम आहेत. त्यावर मोदी सरकार किंवा भाजपचे नियंत्रण नाही. त्यांना हिंदुस्थानचा कायदा लागू नाही. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने समाजमाध्यमांसाठी एक कठोर नियमावली जारी केली आहे. त्या नियमावलीचे पालन करा, अन्यथा कारवाईस सामोरे जा, असा इशारा मोदी सरकारने देऊनही ट्विटरवाले ऐकायला तयार नाहीत. आमचा कायदा व आमचे न्यायालय अमेरिकेत. तुमच्या भूमीचा कायदा मान्य नसल्याचे हे ट्विटरवाले सांगतात. समाजमाध्यमांवर गेल्या काही वर्षांपासून चिखलफेकीचा, बदनामी मोहिमांचा कार्यक्रम सुरू आहे. त्याची निर्मिती, दिग्दर्शन, नेपथ्य, कथा-पटकथा सर्वकाही भाजपचेच होते. फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्ऍप या माध्यमांचा मनसोक्त वापर करण्याची रीत इतर राजकीय पक्षांना माहीत नव्हती तेव्हा या कार्यात (2014) भाजपने नैपुण्य प्राप्त केले होते. त्या काळातील प्रचारात भाजपच्या फौजा जमिनीवर कमी, पण सायबर क्षेत्रांतच जास्त खणखणाट करीत होत्या असंही सामना संपादकीय मधून सुनावण्यात आलं आहे.

हिंदुस्थानातील ट्विटरसह सर्वच समाजमाध्यमांचे जणू आपणच मालक आहोत व सायबर फौजांच्या माध्यमांतून आपण कोणतेही युद्ध, निवडणूक जिंकू शकतो, विरोधकांना उद्ध्वस्त करू शकतो, असा एकंदरीत तोरा होता. पाकिस्तान, कश्मीरच्या बाबतीत सर्जिकल स्ट्राईकचे युद्ध फिके पडेल असे मोठे युद्ध भाजपच्या सायबर फौजाच खेळत होत्या. जणू अर्धे पाकिस्तान आता मोदी सरकारच्या ताब्यात आलेच आहे. आगामी काळात कराची, इस्लामाबादवर विजयी ध्वज फडकविण्याची तयारी सुरू असल्याचा माहोल भाजपच्या सायबर फौजांनी जगभरात निर्माण केला. हाच माहोल गरमा गरम करून''ब्लू टिक के लिए मोदी सरकार लड रही है –कोविड टिका चाहिए तो आत्मनिर्भर बनो!''हा शब्दबाण घायाळ करणारा आहे.

ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना अर्धा तास वाट पाहायला लावली यावर भाजप, पंतप्रधान कार्यालयाने नाराजी व्यक्त करताच तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी ट्विटरवर झोकात लिहिले, ''मोदीजी, देशाची जनता गेल्या सात वर्षांपासून खात्यात 15 लाख जमा होण्याची वाट पाहत आहे. आपणास अर्धा तास वाट पाहावी लागली तर मनावर का घेता?'' हे व असे अनेक शब्दबाण सरकार किंवा भाजपवर सुटत आहेत आणि भाजप त्याबाबतीत आक्रोश करीत आहे. विरोधकांची बदनामी करण्यासाठी लाखो फेक ट्विटर अकाऊंट उघडून आतापर्यंत मोठाच खेळ सुरू होता. तेव्हा कोणतेही नियम व कायदे आडवे आले नाहीत. महाराष्ट्रात शिवसेना, काँगेस व राष्ट्रवादीची तरुण पोरे सायबर लढाईत तरबेज झाली असून प्रत्येक युद्धात भाजपच्या बदनामी मोहिमांना हाणून पाडले जात आहे.

पंतप्रधान मोदी व त्यांचे केंद्रीय सरकार कोरोना काळात कसे अपयशी, कुचकामी ठरले आहे हे जगभरात पोहोचवण्याचे काम यावेळी 'ट्विटर'सारख्या माध्यमांनी केले. गंगेत वाहत जाणारी प्रेते, वाराणसी, गुजरातमध्ये अखंड पेटत राहिलेल्या चिता, ऍम्ब्युलन्सच्या स्मशानाबाहेरील रांगा हे भयावह चित्र जगभरात गेले व त्यामुळे भाजप सरकारची कार्यपद्धती उघडी पडली ती याच 'ट्विटर'सारख्या समाजमाध्यमामुळे. याच 'ट्विटर'मुळे जगातील 'न्यूयॉर्क टाइम्स', 'वॉशिंग्टन पोस्ट'सारखी वृत्तपत्रे हिंदुस्थानविषयी नक्की काय म्हणतात ते समजू लागले. ही अशी पोलखोल झाल्यामुळेच 'ट्विटर' हे एक जागतिक षड्यंत्र आहे, ट्विटर म्हणजे देशाला बदनाम करण्याचा, अस्थिर करण्याचा 'परकीय हात' आहे, असे आपल्या राज्यकर्त्यांना वाटू लागले तर ते स्वाभाविक आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूची संख्या वाढली आणि सामान्य नागरिकांचे हाल झाले. मात्र मोदी सरकार वास्तव आणि काल्पनिक जगातला फरक ओळखू शकत नाही. कोरोनाचे संकट थांबविण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी मोदी सरकार श्रेय घेण्याच्या प्रयत्नात होते असे विचार 'नोबेल' विजेते अर्थशास्त्र्ाज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांनी मांडले. आता डॉ. सेन हे 'ट्विटर'चे हस्तक, परकीय हात असल्याचे सांगून त्यांनाही कायदेशीर नोटीस मारणार काय? 'ट्विटर'चे राजकीय महत्त्व भाजपसाठी संपले आहे, असा निष्कर्ष सामना संपादकीय मधून शेवटी काढण्यात आला आहे.

Updated : 7 Jun 2021 3:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top