Home > News Update > शिंदेसाहेब, आम्हाला आत्महत्यांची परवानगी द्या: नॉनग्रॅण्ट सीएचबी प्राध्यापकांचा एल्गार

शिंदेसाहेब, आम्हाला आत्महत्यांची परवानगी द्या: नॉनग्रॅण्ट सीएचबी प्राध्यापकांचा एल्गार

शिंदेसाहेब, आम्हाला आत्महत्यांची परवानगी द्या: नॉनग्रॅण्ट सीएचबी प्राध्यापकांचा एल्गार
X

कालच शहाजीराजे महाविद्यालय खटाव जिल्हा सातारा येथील सीएचबी प्राध्यापक गुंजाळकर यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. ती आत्महत्या नसून संस्थात्मक खून आहे असे आम्ही मानतो. आज महाराष्ट्रातील हजारो तरूण सीएचबी प्राध्यापक आत्महत्येच्या वाटेवर आहेत. असे एकेकांनी आत्महत्या करण्यापेक्षा आम्हाला सामूहिक आत्महत्येची परवानगी देण्यात यावी, जेणेकरून आपल्या तिजोरीचा अधिकचा भार कमी होऊन प्राध्यापक भरतीचा प्रश्न कायमचा निकाली निघेल,अशी मागणी नॉनग्रॅण्ट सीएचबी प्राध्यापकांनी केली आहे.

गेल्या दहा-बारा वर्षांपासून महाराष्ट्रात प्राध्यापक भरती पूर्णपणे बंद आहे. आज महाविद्यालयांमध्ये केवळ तीस टक्के अनुदानित प्राध्यापक उरले आहेत. बाकी सत्तर टक्के कारभार आमच्यासारख्या नॉनग्रॅण्ट सीएचबी प्राध्यापकांच्या जीवावर चालू आहे. शिक्षकच अस्थिर असल्याने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कुठून मिळणार? त्यामुळे महाराष्ट्रातील शिक्षणव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. सरकारी अनास्थेमुळे बहुतेक महाविद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यातही ज्या किरकोळ जागा भरल्या जातात तिचे एका जागेसाठी 50 ते 60 लाखांचा रेट आहे. आम्ही गोर गरीब शेतकऱ्यांच्या मुलांनी एवढी रक्कम कुठून आणायची?

शिवाय सीएचबीच्या आठ दहा हजाराचा पगार महागाईच्या या प्रचंड भडक्यात कापरासारखा उडून जातो. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात शिक्षक म्हणून उदात्त भावनेने काम करत असल्यामुळे चोऱ्या/लांड्या लबाड्या करून स्वतःचे व कुटुंबाचे पोट भरण्याचे पाप आम्हाला जमत नाही. नेट/सेट/पीएचडी पर्यंत पोहोचण्यासाठी आमचे अर्धे आयुष्य खर्ची गेले आहे. आता हातातला खडू टाकून धड नांगरही धरता येत नाही नि धड एखादा व्यवसायही टाकता येत नाही. मग आम्ही जगावे तर कसे जगावे? रोज असे थोडे थोडे मरण्यापेक्षा एकदाच मरून गेलेले चांगले. किमान या अपमानास्पद जगण्यातून तरी कायमची सुटका होईल.

तरी मेहरबान साहेबांनी आमच्या म्हणण्याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. यापूर्वीच्या कुठल्याही सरकारने व त्यांच्या मुख्यमंत्र्याने आमच्याकडे लक्ष दिलेले नाही. आपण कष्टकऱ्यांचे, कामगारांचे व सर्वसामान्यांचे नेते म्हणवता, त्यामुळे आपल्याकडून आम्हाला फार अपेक्षा आहेत. परंतु आपणही आमच्याकडे दुर्लक्ष केले तर उद्या या उच्चशिक्षित नॉनग्रॅण्ट तरुण प्राध्यापकांच्या हातात लेखणी ऐवजी बंदूक आली आणि ते महाविद्यालया ऐवजी गडचिरोलीच्या जंगलात गेले तर आश्चर्य वाटायला नको. त्याकरिता आपणास कळकळीची विनंती आहे की आपण एक तर एमपीएससी मार्फत शंभर टक्के प्राध्यापक भरती करून तरुणांना जगण्यासाठी अवकाश उपलब्ध करून द्यावा. अन्यथा सामुहिक आत्महत्येची परवानगी द्यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.

या निवेदनामधे डॉ. सुदाम नारायण राठोड, नाशिक, डॉ. मनोज रामजी मुनेश्वर, नांदेड, प्रा. सिद्धार्थ बाबुराव नवतुरे, औरंगाबाद, प्रा. रामप्रसाद वाव्हळ, औरंगाबाद, डॉ. महेश माधव वाघ, नाशिक, डॉ. कैलास देवराव सलादे, नाशिक, डॉ. विवेक कोरडे आणि नितीन घोपे यांच्या सह्या आहेत..

Updated : 12 Aug 2022 12:12 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top